A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

6 January 2010

गोष्टी घराकडिल

(वृत्त - वसंततिलका)


गोष्टी घराकडिल मी वदतां गड्या रे
झालें पहा कितिक हें विपरीत सारें !
आहें घरासचि असें गमतें मनास,
ह्या येथल्या सकल वस्तु उगीच भास ! ll १ ll
ही देख म्हैस पडवीमधिं बांधलेली
रोमंथभाग हळु चावित बैसलेली
मित्रा ! गजामधुनि या पडवीचिया रे
मौजा पहा क्षणभरी रजनीचिया रे ! ll २ ll
डोळ्यांत बोट जरि घालुनि पाहशील
अंधार तो अधिकची तुजला दिसेल !
अंधार जो फलक होतसे अम्हांस
चेतोनिबद्ध जनचित्र लिहावयास ! ll ३ ll
आवाज 'किर्र' रजनी वदतेच आहे,
'घों घों 'असा पवन नादहि बोलताहे;
ऐकें पलीकडुनि बेडुक शेतभातीं
पर्जन्यसूक्त सगळे मनसोक्त गाती ! ll ४ ll
हीं चार पांच चढुनी हळु पायठाणें
या ओसरीवर अतां जपुनीच येणें !
हें ऐक रे 'टकटका' करीतें घड्या
या शांततेत गमतें कुटितेंच टाळ ! ll ५ ll
डावीस हा बघ निरखुनि एक माचा
निद्रिस्थ त्यावरि पिता अतिपूज्य माझा,
त्याचा खरोखर न मी क्षण पुत्र शोभें
तो सर्वदा जरि म्हणे मज पुत्र लोभें ! ll ६ll
तातास या बघुनि या हृदयांत खातें,
होऊन हें हृदय विव्हळ सर्व जातें !
त्याच्या तरी पदयुगावरि या पडूनी
न्हाणूं तयास मग का वद आसवांनी ? ll ७ ll
ताताचिया बघ गड्या उजव्या कडेला
बापू असे तिथ बरें अमुचा निजेला,
अज्ञान तो चपलधी परि बाळ आहे
त्याचेविशीं मम मनीं अतिलोभ राहे ! ll ८ ll
बापू ! गड्या! ध्वज उभा करशील काय ?
तूं देशकारण करुं झटशील काय ?
बापू ! जनांत दिवटी धरशील काय ?
स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय ? ll ९ ll
मित्रा! धरीं सुदृढ हस्त मदीय फार,
दारास आडसर घट्ट असेल थोर,
दाराचिया तर फटींतुन आंत जाऊं
सानंद सुस्थित घरांतील सर्व गाऊ ! ll १० ll
मित्रा ! इथें कितितरी मज हर्ष होई,
येथें हवा मधुर, निश्वसनांत येई
नाहीं कधींहि बुधवारवनांत जैशी
वाटेवरी चतरशिंगिचीया न तैशी ! ll ११ ll
मित्रा ! असा हळुच ये उजवेकडेस
खोली पहा पघळ ही किती ऐसपैस;
निद्रावश स्वजन येथ, बघूनि यास
हर्षाचिया न उकळ्या फुटती कुणास? ll १२ ll
ती एक खाट अवलोक समोर आतां
आहे सुषुप्तिवश तेथ मदीय माता
तीचे कुशींत निजली दिसते मदीय
भीमा स्वसा, बघुनी ती मज हर्ष होय. ll १३ ll
मत्कारणें स्तवुनि देव, निजावयातें
आलीस तूं खचित गे असशील माते!
मोठे त्वदीय उपकार जरा तरी ते
जातील का फिटुनियां तव पुत्रहस्तें ? ll १४ ll
खालीं मदीय भगिनी दिसती निजेल्या
गोष्टी जयांस कथितां न पुऱ्यांच झाल्या !
ती कोण दिसते? – निजली असुनी
जी श्वास टाकित असे अधुनीमधूनी ! ll १५ ll
कान्ताच ही मम !– अहा ! सखये ! मदीय
स्वप्ने, अतां तुज गडे ! दिसतात काय?
आतां असो ! पण पुढें तुजला दिसेन
स्वप्ने तुझी मग समग्र तुला पुसेन ! ll १६ ll
मागील दारिं सखया ! तुळशीस आतां
वन्दू, जिला मम जनीं नमिला स्वमाथा !
सोडूनि गांव वळणें अमुच्या घराचें,
येऊं घरा परत खासगिवालियाचे! ll १७ ll



— केशवसुत

4 January 2010

शतकानंतर आज पाहिली

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट

मेघ वितळले, गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि खुलले... भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ मांडले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये... आरुण मंगल लाट

दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी... झाले आज विराट

पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव-अरुणाचे होऊ आम्ही... प्रतिभाशाली भाट


— वसंत बापट

सैनिकाप्रत

सदैव सैनिका,पुढेच जायचे
न मागुती तुवा,कधी फिरायचे ॥ धृ ॥
सदा तुझ्यापुढे,उभी असे निशा
सदैव काजळी,दिसायच्या दिशा
मधून मेघ हे,नभास ग्रासती
मधेच या विजा,भयाण हासती
दहा दिशांतुनी,तुफान व्हायचे ॥ १ ॥
प्रलोभने तुला,न लोभ दाविती
न मोह-बंधने,पदांस बांधिती
विरोध क्रोध वा,तुला न थांबवी
न मोह भासतो,गजांतवैभवी
न दैन्यही तुझे,कधी सरायचे ॥ २ ॥
वसंत वा शरद,तुला न ती क्षिती
नभात सूर्य वा,असो निशापती !
विदीर्ण वस्त्र हो,मलीन पावले
तरी न पाय हे,कधी विसावले !
न लोचना तुवां,सुखें मिटायचे ॥ ३ ॥
नभात सैनिका,प्रभात येउ दे
खागांसवे जगा,सुखांत गाउ दे
फुलाफुलांवरी,सुवर्ण शोभु दे
जगास शांतता,सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी,तुझे ठरायचे ॥ ४ ॥


— वसंत बापट

Anonymous... यांच्या मदतीने दुरुस्त केलेली आवृत्ती (May 9, 2011)

देव (देवा, तुझे किती)

देवा, तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो.
सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे.
सुंदर हि झाडे, सुंदर पांखरे
किती गोड बरे गाणे गाती.
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी.
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील!!
— ग. ह. पाटील

इंच इंच लढवूं

उतुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवूं
अभिमान धरुं, बलिदान करूं, ध्वज उंच उंच चढवूं ll धृ ० ll

परक्यांचा येता हल्ला,
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड,
होतील इथें ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवूं ll १ ll

बलवंत उभा हिमवंत,
करी हैवानांचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड अडवूं ll २ ll

जरि हजार अमुच्या ज़ाती
संकटामधें विरघळती
परचक्र येतसे जेव्हां,
चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवूं ll ३ ll

राष्ट्राचा दृढ निर्धार,
करु प्राणपणेंप्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त,
जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू ll ४ ll

अन्याय घडो शेजारी,
की दुनियेच्या बाजारीं
धावून तिथेही जाऊ,
स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू ll ५ ll



— वसंत बापट

आजोळी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो !
कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायीठायी हो !

शीळ घालून मंजूळवाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखूळ घुंगूरमाळा हो
गाई किलबील विहंगमेळा हो !
बाजरिच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमवी आंबेराई हो !

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकूलती,
नातु एकूलता,
किती कौतुक कौतुक होई हो !



— ग. ह. पाटील

निरोप

चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई
बाळ, चाललासे रणा
घरा बांधिते तोरण,
पंचप्राणांच्या ज्योतींनीं
तुज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा;
मीहि महाराष्ट्रकन्या
धर्मं जाणते विराचा.

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीस धार.

अशुभाची सावलीहि
नाही पडणार येथे;
अरे मीहि सांगते ना
जीजा, लक्षुमीशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
शिवरायांचे स्वरुप
आठवावे रणांगणी.

घन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन !


— पद्मा गोळे

आईपणाची भीती

आजच्या इतकी आईपणाची
भीती कधीच वाटली नव्हती,
अगतिकतेची असली खंत
मनात कधीच दाटली नव्हती.

विचारलेस आज मला,
"आई, कोणती वाट धरू ?"
गोळा झाले कंठी प्राण
आणि डोळे लागले झरू.

कोणती दिशा दाखवू तुला ?
पूर्व ? पश्चिम् ? दक्षिण ? उत्तर ?
माझ्यासारख्याच भीतीने या
चारी दिशा झाल्या फ़त्तर!

कोठे ज्ञान, यश, सुख ?
काय त्यांच्या खाणाखुणा ?
या-त्या रुपांत दिसतो
सैतानच वावरतांना.

जळी, स्थळी, आकाशीही
अणूबॉम्ब झाकला आहे
प्रत्येक रस्ता माणसाच्या
रक्ताने रे माखला आहे.

आज आईच्या कुशीत सुद्धा
उरला नाही बाळ, निवारा:
द्रौणीच्या अस्त्रासारखा
हिरोशिमाचा बाधेल वारा.

कोठेतरी गेलेच पाहिजे,
गतीचीही आहेच सक्ती;
जायचे कसे त्याची मात्र
कुणीच सांगत नाही युक्ती.

खचू नको, शोध बाळा
तुझा तूच ज्ञानमार्ग;
कोणतीही दिशा घे
पण माणुसकीला जाग.

धीर धर, उचल पाय,
आता मात्र कर घाई;
आणखी एक लक्षात ठेव
प्रत्येकालाच असते आई !


– पद्मा गोळे

श्रावणबाळ


शर आला तो, धावुनी आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
'हा ! आई गे !' , दीर्घ फोडूनी हांक
तो पडला जाऊन झोंक
ये राजाच्या श्रवणी करुणावाणी
हृदयाचे झाले पाणी.
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवें आणुनी नयनी
तो वदला, 'हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा' !

मग कळवळूनी, नृपास बोले बाळ.
'कशी तुम्ही साधीली वेळ'
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असती बसले.
कावड त्यांची, घेउन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला.
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरांत रुतुनी बसला.

मी एकुलता, पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला !
त्यां वृद्धपणी, मीच एक आधार
सेवेस अतां मुकणार
जा, बघतील ते, वाट पांखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही,
दुर्वार्ता फोडुं नका ही,
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी, करा तुम्ही सांभाळ
होउनियां श्रावणबाळ.

परि झांकुनी हे, सत्य कसे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
"घ्या झारी... मी जातो..." त्याचा बोल
लागला जावया खोल.
सोडीला श्वास शेवटला,
तो जीव विहग फडफडला,
तनु-पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा, रडला धायीं धायीं
अडखळला ठायीं ठायीं.


— ग. ह. पाटील

स्वर : श्री. श्रीधर फडके