तळहातीं शिर घेउनियाा । दख्खनची सेना लढली
तरि विजयी मोंगलसेना । नचही नामोहरम जाहली.
पडली मिठी रायगडला । सोडविता नाहीं सुटली.
राजरत्न राजाराम
कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेवून
परते सरसेनापतीची । घोडदौड संताजीची ||१ ||
मिरजेवर पातशहाची । शहाजणें वाजत होती
हाणिल्या तयांवर टापा । फाडून टाकिलीं पुरतीं
मारिली टांच तेथून । घेतला पन्हाळा हातीं
तों कळलें त्या वीराला
जिंजीला वेढा पडला
पागेसह वेगे वळला
चौखूर निघे त्वेषाची । घोडदौड संताजीची || २ ||
झुल्फिकार खान लढवय्या । कातरली झुल्फें त्याची
धुळधाण केली तेथें । किती अमीर उमरावांची
उसळली तेथुनी मांड । मग त्या कर्दनकाळाची
जिंजीचा धुरळा मिटला
जालना प्रांती तो उठला
चोळीतो शत्रु नेत्राला
गेली हां हां म्हणतांची । घोडदौड संताजीची || ३ ||
वाजल्या कुठें जरी टापा । धुरळ्याची दिसली छापा
छावणीत गोंधळ व्हावा । “संताजी आया ! आया !”
शस्त्रांची शुद्धी नाही । धडपडती ढाला घ्याया
रक्तानें शरीरें लाल
झोपेनें डोळे लाल
जीवाचे होती हाल
शत्रूला ऐशी जाची । घोडदौड संताजीची || ४ ||
गिरसप्पा वाहे ‘धों धों’ । प्रतिसारिल त्याला कोण ?
शिशिराचा वारा ‘सों सों’ । रोधील तयाला कोण ?
हिमशैल-खंड कोसळतां । तयाला प्रतिरोधील कोण ?
होता जो गंगथडीला
आला तो भीमथडीला
एकाच दिसात उडाला
करि दैना परसेनेची । घोडदौड संताजीची || ५ ||
पुरताच बांधिला चंग । घोड्यास चढविला तंग
सोडी न हयाचे अंग । भाला बरचीचा संग
औरंगाचा नवरंग । उतरला जाहला दंग
तुरगावर जेवण जेवी
तुरगावर निद्रा घेई
अंग ना धरेला लावी
भूमीस खूण टापांची । घोडदौड संताजीची || ६ ||
न कळे संचरलें होते । तुरुंगासहि कैसें स्फुरण
उफळाया बघती वेगें । रिकिबींत ठेवितां चरण
जणु त्यांस हि ठावें होतें । युद्धी “जय कि मरण”
शत्रूचे पडतां वेढे
पाण्याचे भरतां ओढे
अडती न उधळती घोडे
चालली अशी शर्थीची । घोडदौड संताजीची || ७ ||
नेमानें रसद लुटावी । ‘नेमाजी शिंदे’ यांनीं
सांपडती हय गज तितुके । न्यावे ‘हैबतरावांनीं ’
वाटोळें सर्व करावें । ‘आटोळे’ सरदारांनीं
‘खाड खाड' उठती टापा
झेपांवर घालीत झेपा
गोटावर पडला छापा
आली म्हणती काळाची । घोडदौड संताजीची || ८ ||
चढत्या घोड्यानिशी गेला । बेफाम धनाजी स्वार
करि कहर बागलांणात । ओली न पुशी समशेर
बसवितो जरब यवनांना । बेजरब रिसालेदार
वेगवान उडवित वाजी
तोंडावर लढतो गाजी
धावून येई संताजी
पळती मोंगल बघतांची । घोडदौड संताजीची || ९ ||
नांवाचा होता ‘ संत ’ । जातीचा होता शूर !
शीलाचा होता ‘ साधू ’ । संग्रामीं होता धीर !
हृदयाचा ‘ सज्जन ’ होता, । रणकंदनिं होता क्रूर !
दुर्गति संभाजीची
दैना राजारामाची
अंतरीं सर्वदा जाची
उसळे रणशार्दूलाची । घोडदौड संताजीची ||१०||
मर्दानी लढवय्यांनीं, । केलेल्या मर्दुमकीचीं
मर्दानी गीतें गातां, । मर्दानी चालीवरचीं
कडकडे डफावर थाप । मर्दानी शाहीरांची
देशाच्या आपत्कालीं
शर्थीचीं युद्धें झालीं
गा शाहीरा ! या कालीं
ऐकूं दे विजयश्रीची । घोडदौड संताजीची ||११||