A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

26 August 2014

जन पळभर म्हणतिल

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ? ll ध्रु० ll

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे आपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ? ll १ ll

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ? ll २ ll

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ? ll ३ ll

रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मज शिवाय ? ll ४ ll

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ? ll ५ ll


— भा. रा. तांबे

12 August 2014

गढी

गढी आहे.
गढीवर घुबड आहे
पण ते केवळ बुजगावणे आहे.

देवाच्या दयेने गढी खचण्यासाठी
सतराशे साठ पिढ्या जाव्या लागतील.

गावात गढी असली म्हणजे
इतरांना कुणाच्या तरी पायाशी
आश्रितासारखे बसल्याची भावना होते.

गढी खालून कोरशील
हळुहळु लपतछपत
तर अंगावर अवचित कोसळून
सहकार्‍यांसकट संपण्याची श्क्यता.

गढी एकदाच
उडवायची असेल धडाक्याने
तर थोडा धीर धार,
नेमकेपणाने वार कर.

पण कसेही करून गढी गेलीच पाहिजे.
लोकांना पटवून दे
गढी कोसळवण्याची आवश्यकता
आणि कारणे.

अगदी … गढीच्या बुडात
लाखमोलाचा खजिना आहे
असे सांगितलेस तरी चालेल…

गढी जाणे महत्वाचे !


— नारायण कुलकर्णी कवठेकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

9 August 2014

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळु द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परी उरातिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
<        > कधीही तारांचा संभार ll १ ll

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही ! आम्हाला कसले कारागार?
<        > अहो हे कसले कारागार? ll २ ll

पदोपदी पसरूनि निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
<        > होता पायतळी अंगार ll ३ ll

श्वासांनो, जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार
<        > तयांना वेड परी अनिवार ll ४ ll

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनि गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
<        > आई, वेड्यांना आधार ll ५ ll

कशास आई, भिजविसि डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
<        > आई, खळखळा तुटणार ll ६ ll

आता कर ओंकारा, तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
<        > मरणा, सुखेनैव संहार ll ७ ll


— कुसुमाग्रज

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

15 July 2014

तहान

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान;
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण.

व्हावे एवढे लहान
सारी मने कळों यावी;
असा लाभावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी.

सर्व काही देता यावे
श्रेय राहू नये हाती;
यावी लाविता कपाळी
भक्तिभावनेने माती.

फक्त मोठी असो छाती
दुःख सारे मापायला;
गळो लाज, गळो खंत,
काही नको झाकायला.

राहो बनून आकाश
माझा शेवटला श्वास;
मनामनांत उरावा
फक्त प्रेमाचा सुवास !


- मनोहर महादेव देशपांडे

8 July 2014

धूळपेरणी

असो, बरकत धूळपेरणीला,
लागला मातीचा जीव झुरणीला.

हिरव्या पिसांचा ध्यास घरणीला,
टिपूर मोत्यांची आस मोरणीला.

येऊ नये कधी दिवस जाचक,
कासावीस डोळे बनले चातक.

कोरडे नक्षत्र पूर पापणीला,
आलेलं आभूट दूर दाटणीला

मिळता डोळ्यांना मेघुट इशारे,
मातीच्या कणांना फुटले धुमारे.


— अशोक कौतिक कोळी


धूळपेरणी = पावसाळा सुरु होण्यापूर्वी केलेली पेरणी   आभूट = ढगाळ आकाश    मेघुट = ढग दाटून येणे 

5 July 2014

रानवेडी

पोर डोंगराव भाळली
त्याच्या नादी लागुनिया
अख्ख्या रानात पांगली ॥धृ.॥

रानगवताची फुलं
तिच्या कानामंदी डूल
अन् चाईचा मोहर
गळ्यामंदी गळसर
अहो टनटनी फुलली
तिच्या नाकामंदी फुली
अन् बुरांडीची फुलं
तिनं केसांत माळली ॥१॥

पोर माळावर खेळली
अन् वार्‍यासंग बोलली
वड-पारंबीचा झुला
तीचा गेला आभाळाला
पानसाबरीचं बोंड खाल्लं
लाल झालं तोंड
अहो हसता हसता
मऊ गवताव लोळली ॥२॥

गायी दांडाच्या वाटानं
चाली यंगत नेटानं
ढोल ढगांचा वाजला
नाच मोराचा पाहिला
आली पाऊस पहाळी
तव्हा गडदीक पळाली
पावसानं भिजवली
तरी उन्हात वाळली ॥३॥

तिचं मन डोंगरात
तिला दिलं शहरात
आता गच्चीवर जाते
दूर डोंगर न्याहाळते
त्याचा आठव येऊन
येतो हुंदका दाटून
त्याला हात जोडताना
दोन आसवे गाळली॥४॥


तुकाराम धांडे,
इगतपुरी, नाशिक


चाई = एका वेलीचे नाव       बुरांडी = एका फुलाचे नाव       पानसाबरी = निवडुंग           पळाली = पावसाची सर      यंगत = चढत किंवा डोंगर वरवर चढणे

6 May 2014

माझ्या शब्दांनो

माझ्या शब्दांनो !
जे मूकपणे जुलूम सहत असतील
त्यांच्या ओठांत प्रलयाची आग व्हा !
जे निमूटपणे गुलामीत जगत असतील
त्यांच्या राक्तपेशींत सुरुंगासारखे पेटत रहा !

माझ्या शब्दांनो !
जे अन्याय-अत्याचारांचे ठेकेदार आहेत
त्यांच्यावर विजांचे अग्निलोळ होऊन बरसा !
लेखण्यांनो, तुम्हां माझे रक्तदान.
बेदरकार झुंजत रहा !

माझ्या प्रिय शब्दांनो !
माझ्या काळजाचे घोष व्हा !
माझ्या अश्रूंचे शिलालेख व्हा !
माझ्या मुक्तीचे शिल्पकार व्हा !
माझ्या क्रांतिकणांनो !
या विशाल बोधिवृक्षाचे
तुम्ही कोटी कोटी पर्ण व्हा !


— शरणकुमार लिंबाळे

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

1 May 2014

फिर्याद

लोकहो ! तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का ?

माझ्या अंगांगावर झिरपतात
अपमानाच्या खोल जखमा
आमची इज्जत लुटली लुटली जात आहे
जातीयतेच्या धर्मांध व्यासपीठावर,
आमचं शील जळत आहे
धर्मग्रंथाच्या पानापानांवर
हजारो द्रौपदींचे वस्त्रहरण होत असता
बंधूंनो, भीष्म-पांडवांसारखे फक्त
खाली मान घालून बसू नका.
आतातरी डोळ्यांवरची पट्टी उघडा
हा पराजित इतिहास बदलण्यासाठी
आव्हान देणारे बलदंड हात तुम्ही तरी द्याल का ?

लोकहो, तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल हा ?
अपमानाची भीक झोळीत टाकणा​र्‍या 
त्या अभद्र भुतकाळाला
या पेटलेल्या वर्तमानाचा सुरुंग लावा.
जळून जाऊ द्या ही शतकांचे दास्य पत्करणारी
लाचार अगतिक मने.
इथला प्रत्येक प्रकाशकिरणाला
अंधाराचाच शाप आहे,
हे आकाशसुद्धा फितूर आहे
त्या काळ्याकुट्ट ढगांना.
ही धरतीसुद्धा सामील आहे
पूर्वनियोजित कारस्थानांना
ही अत्याचारी परंपरा मिटवणारे
जिद्दीने रणांगणावर लढणारे
पराक्रमी सामर्थ्य तुम्ही तरी द्याल का ?
लोकहो तुमच्या न्यायालयात मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल कां ?

हि माही फिर्याद
आमच्या कर्मठ संस्कृतीवर आहे
जिने आम्हांला बंद कोठडीत कैद केले आहे,
जिने आम्हांला बहिष्कृत आयुष्यांचे दान दिले आहे.
हे जहर मिसळलेलं अशुद्ध जीवन आम्ही नाकारत आहोत.
या क्रूर शापातून मुक्त होण्यासाठी
उज्ज्वल अशी मंगल प्रभात तुम्ही तरी द्याल का ?
लोकहो, तुमच्या न्यायालयात मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का ?


— हिरा बनसोडे

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

30 April 2014

आता

झडत झडत सगळीच झडलीत पाने आता
कुणाकुणासाठी रडावे झाडाने आता ?

कुठल्या कुठल्या आठवणीं येताहेत आता
अवघा समुद्रच उधाणलांय आता.

गातागाताच रडायला होते आता
ओठांत शब्दच थिजून गेलेत आता !

चालता चालता चालणेच थांबलेय आता
वाटाच चालून येताहेत अंगावर आता !

किती किती ही गर्दी, गोंगाट नुसता
माझी मलाच हांक ऐकू येत नाही आता !


— लक्ष्मीकांत तांबोळी

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)