रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

September 12, 2011

बापुजींची प्राणज्योती

ती पहा, ती पहा, बापुजींची प्राणज्योती
तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहती

झुंजला राजासवे हा, रंगला रंकासवे हा
पेटता देहेही आता, दिव्यता दावून जाती

चंदनाचे खोड लाजे, हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडताती

पृथ्वीच्या अक्षांशि लाली, पृथ्विच्या रेखांशि लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या, दशदिशांना कापताती

नाव ज्याचे ऐकुनीया थरकली सिंहासने
ना जरी तलवार हाती, हा अहिंसेचा पुजारी

सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवे हा
मृत्युच्या अंतीम वेळी, नाम रामाचे मुखी

सिंधु गंगा आणि यमुना, धन्य झाली अस्थिनी
राख तूझी भारताच्या, तिलक झाली रे ललाटी- मनमोहन नातू


मनमोहन यांनी ही कविता गांधीहत्येनंतर लिहिली असे पाठय़पुस्तकात अभ्यासल्याचे अनेकांना आठवत असेल. पण या कवितेमागे एक किस्सा असा आहे कि;

गरज पडेपर्यंत निश्चिंत राहायचे आणि गरज पडली की ती भागविण्यासाठी उपाय शोधायचे, हा मनमोहनांचा खाक्या. असेच एकदा कविराज नेहमीप्रमाणे आर्थिक संकटात सापडल्यावर आपल्या काही कविता घेऊन 'हिज मास्टर्स व्हॉइस’च्या ध्वनीमुद्रकेसाठी गाणार्‍या गायकाकडे गेले. गायकांनी त्यांच्या कविता पाहिल्यादेखील नाहीत. ‘तुम्हाला किती पैसे हवे आहेत?’ त्यांनी विचारले. ‘फक्त एका आठवडय़ापुरत्या रेशनसाठी साडेसात रुपये हवे आहेत. त्यावर एक पैसादेखील नको.’


गायक त्यांना म्हणाले, ‘मला तुमच्या प्रेमाबिमाच्या कविता नकोत. घरी जाऊन निवांतपणे गांधीजींवर (नुकतीच गांधीहत्या झाली होती) एक कविता लिहा. गांधीजींवर चांगली कविता लिहिलीत तर दुप्पट म्हणजे पंधरा रुपये देईन. मनमोहन लगेच म्हणाले, ‘घरी कशाला जायला पाहिजे? आत्ता इथेच लिहून देतो.’ जवळच बसलेल्या गायकाच्या मुलीच्या पेन्सिलीने त्यांनी भराभर कविता लिहिली.

ती पहा, ती पहा । बापूजींची प्राणज्योती ।
तारकांच्या सुमनमाला । देव त्यांना वाहताती ll

गायकांने लगेच त्यांना रोख पंधरा रुपये दिले आणि या कवितेचे सर्व हक्क तोंडीच घेऊन टाकले. पुढे पाठय़पुस्तकात ही कविता घेतली गेली. कवितेची ध्वनिमुद्रिका प्रचंड खपली. या गाण्याने रेकॉर्ड ब्रेक केले. गायकाने आणि रेकॉर्डच्या विक्रेत्याने त्यावर हजारो रुपये कमावले. पण कवीला मात्र मिळाले होते फक्त पंधरा रुपये! पण त्याबद्दल त्यांना यत्किंचीतही दु:ख झाले नाही. किंबहुना त्या दिवशीची त्यांची रेशनची गरज भागली, याबद्दल त्यांना कृतज्ञताच वाटली.


(संदर्भ : लोकरंग - ऑगष्ट २०११)

No comments: