रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

September 29, 2011

थांब जरासा बाळ !

थांब जरासा बाळ ! II धृ ०II

सुंदर खाशा प्रभातकाळीं,
चहूंकडे हीं फुलें उमललीं,
बाग हांसते वाटे सगळी !
शीतल वारा, या जलधारा कारंजाच्या छान !
थांब जरासा बाळ !

रम्य तडागीं निर्मळ पाणी,
गातीं पांखरे गोजिरवाणीं,
आनंदाची बसलीं ठाणीं,
खरें असे रे ! तरी नको रे मारुं लाडक्या धांव !
थांब जरासा बाळ !

पाहुनी सौख्याचा ठेवा,
सुष्टि करिलही माझा हेवा,
माझ्यापासुनी फसवुनी न्यावा,
यत्न परोपरि, करितील सारीं ! भुलशिल तूं लडिवाळ !
थांब जरासा बाळ !

तर्‍हे-तर्‍हेची फुलें विकसलीं,
रंगी बेरंगीहीं सगळीं,
तूंही शिरतां त्यांच्या मेळी;
माझें मग तें, फूल कोणतें कसें ओळखूं सांग ?
थांब जरासा बाळ,

बघ सुटला हा मोठा वारा,
वायुवृत्ती तव देहही सारा !
उडवुनी नेईल तुला भरारा !
दिगंतराला, जातां बाळा ! पुन्हा कसा मिळणार ?
थांब जरासा बाळ !

स्वच्छ तडागीं प्रतिबिंबातें,
पाहुनी वेडया धरावयातें,
चुकुनी जाशिल पाताळातें,
तयासारखा, क्षणीं पारखा, होशिल बा आम्हांस !
थांब जरासा बाळ !

किती बुडबुडे पाण्यावरती,
इकडून तिकडे तरंगताती,
चंचल लहरी, तूं त्या साथी,
क्षणांत बा रे, लपाल सारे, काळाच्या उदरांत !
थांब जरासा बाळ !

फूलपांखरें ही स्वछंदी,
तूंही त्यांच्यासम आनंदी,
क्षणांत पडशिल त्यांच्या फंदीं !
त्यांच्या संगें, त्यांच्या रंगें, जाशिल उडुनी दूर !
थांब जरासा बाळ !

अशा तुला मग बागडतांना,
भरभर वार्‍यावर फिरतांना,
फुलांत दडतां कीं उडतांना,
कवण उपायीं, आणूं ठायीं, पुन्हां? लाडक्या सांग !
थांब जरासा बाळ !

शब्दवांचुनी मंजुळ गाणें,
अर्थ तयाचा देवची जाणे !
गाईन माझें गोजिरवाणें,
सप्तसुरांपरी या वार्‍यावरी विरुनी जाशिल पार !
थांब जरासा बाळ !

बालरवीचे किरण कोवळे,
कारंजावर पड़ती मोकळे,
रंग खेळती हिरवे पिवळे,
धरावयासी, त्या रंगांसी जाशिल बाळा खास !
थांब जरासा बाळ !

जडावेगळी अमूर्त मूर्ति,
कल्पकतेची कीं तूं स्फूर्ति,
पुण्याची मम आशापूर्ति,
रविकिरणांवरी, जलधारांतरी, तन्मय होशिल पार !
थांब जरासा बाळ !


- राम गणेश गडकरी


सौजन्य : ramganeshgadkari.com

No comments: