A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

4 January 2010

इंच इंच लढवूं

उतुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवूं
अभिमान धरुं, बलिदान करूं, ध्वज उंच उंच चढवूं ll धृ ० ll

परक्यांचा येता हल्ला,
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड,
होतील इथें ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवूं ll १ ll

बलवंत उभा हिमवंत,
करी हैवानांचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड अडवूं ll २ ll

जरि हजार अमुच्या ज़ाती
संकटामधें विरघळती
परचक्र येतसे जेव्हां,
चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवूं ll ३ ll

राष्ट्राचा दृढ निर्धार,
करु प्राणपणेंप्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त,
जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू ll ४ ll

अन्याय घडो शेजारी,
की दुनियेच्या बाजारीं
धावून तिथेही जाऊ,
स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू ll ५ ll



— वसंत बापट

3 comments:

unmesh said...

वसंत बापटांची एक कविता आपल्या संग्रहा साठी टंकित करून पाठवत आहे बालभारतीत होती का ते आठवत नाही परंतु १० वी ११वित कधीतरी होती आम्हाला होती एवढे नक्की आठवते.

केवळ माझा सह्यकडा
===============
भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा ,मनांत पूजिन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिंवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ , प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गही साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे ,तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजुनी वाहतसे लाव्हा सगळा
कबीर माझा, तुळसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो "एका " हृदयी एकवटे
जनाबाइच्या ओवी मध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणीच्या डोहामधली गाठ ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकांठी भावभक्तीची पेठ खुले

रामायण तर तुमचें माझें भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
हृदयाच्या हृदयांत परंतु बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजुन हृदयामाजीं
बच जाये तो और लढे
पाउल राहील सदा पुढे

तुम्हास तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी राहिल गांठी मरहट्याचा हट्ट खरा
तुमचेंमाझें ख्यालतराणे दोघे ऐकू गझला
होनाजीची सोनलावणी वेड लावते परि मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले,मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफावर कडकडतां परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरी दरीमधुनी घुमला
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहांत अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासशी धृढ नातें

कळे मला काळाचे पाउल द्रुतवेगानें पुढती पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकची उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरून अवघ्या विश्वातें कवळी
माझ्या घरची विशाल दारे, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकळासाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात
कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत
~वसंत बापट
कविता संग्रह -सेतू प्रथमावृत्ति मे १९५७

unmesh said...

इंद्रायणीच्या डोहामधली गाठ ओली ती ओली
हि ओळ अशी हवी
>इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
टाईप करताना चूक झाली क्षमस्व

Suresh Shirodkar said...

उन्मेषजी,

बापटांची "सह्यकडा" कविता पाठवल्याबद्दल अत्यंत आभारी आहे.