A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

13 April 2013

नवी पिढी

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

ही वडिलांची वाडी तुमची, तुम्हांस ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको अम्हांला जीर्ण गढी ॥१॥

देव्हाऱ्यातिल गंधफुलांतच झाकुन ठेवा ती पोथी
अशी बुद्धीला भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी कुणाला शिळी कढी? ॥२॥

शेषफणेवर पृथ्वी डोले ! मेरूवरती सूर्य फिरे !
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो ! चंद्र राहूच्या मुखी शिरे !
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

दहा दिशांतुन अवकाशातुन विमान अमुचे भिरभिरते
अणुरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पूजावी जुनी मढी ॥४॥


— वसंत बापट

2 April 2013

इच्छा

रोज वाटे एका फुला
कधी उडता येईल मला ?
इथं तिथं जाता येईल
भारी भारी मज्जा होईल

पाकळी पाकळी लागतां पसरू
फुलच झालं फुलपाखरु
इकडून तिकडे उडत जाता
कोण त्याला अडविल आता ?

एक वात मिणमिणत
मनात असते गुणगुणत
जर का मला उडतां येईल
भारी भारी मज्जा होईल

गुणगुणत असतां सुटले भान
वातीला फुटले पंख छान
राहील आतां कशी घरात
काजवा होऊन गेली वात

पडल्या जागी तळ्यातलं पाणी
एकच विचार मनात आणि
आमचा आपला तळ खाली
पक्षी तेवढे उंच आभाळी

म्हणुन त्याची वाफ झाली
तळं सोडून वर निघाली
वाफेला मग पंख फुटले
ढग होऊन उडत सुटले.

मलाही वाटतं घोडा व्हावं,
माळावरुन दौडत जावं
कधी वाटतं होऊन मासा
पाण्यात पोहत राहीन खासा.

कधी वाटतं पक्षी व्हावं
आकाशातून उंच उडावं
कधीच नाही का होणार असं
जसं मनात येतं तसं


— रवींद्रनाथ टागोर
(अनुवाद : पु. ल. देशपांडे)


(सौजन्य: दिपा जोशी)

तिसरं आणि चौथं कडवं पाठपुस्तकात नाही.

1 April 2013

माझी आई

घंटा वाजता बंद होय शाळा,
घरी जायाची घाई फार बाळा.

फुले रंगीत फांद्यांवरी आली
'थांब ना रे', बाळास त्या म्हणाली.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.'

फुलपाखरु तिथे एक आले,
ट्ट खेळाचा खूप खूप चाले.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.'

झाड सोडूनी पक्षी येत खाली,
गीत गाऊन त्यास मोह घाली.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.
सखेसोबती तुम्ही सर्व काही,
परी आवडते मला फार आई.'


— अज्ञात

27 February 2013

कावळा व बगळा

कावळा म्हणे मी काळा
पांढरा शुभ्र तो बगळा
दिसतसे ll १ ll

वाहवा तयाची करिती
मजलागीं धिक्कारीती
लोक हे ll २ ll

मग विचार त्याने केला
पैशाचा साबू आणिला
झडकरी ll ३ ll

फासुनी सर्व शरिराला
खडकासी घाशित बसला
नदिवरी ll ४ ll

घाशिले अंग बहु बळें
रक्त त्यामुळें वाहुं लागले
घाबरा झाला
बापुडा शेवटीं मेला ll ५ ll


- रा. देव

25 February 2013

पंचारती

मराठीच्या महाराष्ट्रा
आज स्वागत स्वागत
सह्याद्रीच्या कड्यावरी
वाजे वाऱ्याची नौबत !

काळ-कवाड फोडून
आल्या आल्या साऱ्याजणी,
महाराष्ट्राच्या स्वागता
आज मानाच्या धनिणी !

शकुनाचा हाती दीप
महदंबा आधी येई,
रचे दीपांची आरास
घवळिल्या दिशा दाही !

नामयाच्या जनाईने
केले सडासंमार्जन,
हात अबीर-मंजिरी
गंधे भारिले गगन !

केली जळक्या काडीची
लक्ष्मीबाईने लेखण,
चित्रे रेखिली स्वागता
रंग प्राणाचे भरून !


अहिराणी बहिणाबाई
आणि तव्याची भाकर
ओवाळून टाकायाला
उभी राहिली तत्पर !


देवी अहिलेच्या हाती
पुण्यतीर्थाचा कलश,
नेत्र कराया पवित्र
उभी राहिली सहर्ष !


ओवाळाया महाराष्ट्रा
आज जिजाईच्या हाती,
कोटी सूर्याच्या तेजाने
उचंबळे पंचारती !




— इंदिरा नारायण संत

23 February 2013

मुक्या जिवांचे दु:ख

कोरडे जे शेत आहे
ओलित झाले पाहिजे
मुक्या जिवांचे दु:ख ह्या
बोलीत आले पाहिजे ll

छते ऊन्हाची घराला,
नांदते जीव पोळती
फुफाट्याच्या वाहणा
पायांमधूनी घालती
दाह त्यांच्या वेदनांचे
झेलीत गेले पाहिजे ll १ ll

आभाळ अंतरातले
सोसतांना फाटलेले
अश्रू दो डोळ्यांतले
गाळतांना दाटलेले
महापूरांना बांध ह्या
घालीत गेले पाहिजे ll २ ll

नांगरल्या शेतापरी
काळीज दु:ख साहते
तरी सुगीचे डोलत्या
स्वप्न हिरवे पाहते
अर्थ ह्या स्वप्नातही
पेरीत गेले पाहिजे
मुक्या जिवांचे दु:ख ह्या
बोलीत आले पाहिजे ll ३ ll


— विठ्ठल वाघ

22 February 2013

आठवते ना

आठवते ना-
ओढयाकाठी अपुल्या घरची
गाय घेऊनी धावत होतो
चरावयाला सोडूनिया तिज
पारंब्यावर लोंबत होतो !
आठवते ना-
डोहामधले स्वैर डूंबणे
अंगावरचे ओले कपडे
अंगावरती तसेच सुकणे,
सुकता कपडे पुन्हा पोहणे

आठवते ना-
करवंदाचा चीक बिलगता
बोटे अपुली बसली चिकटून
अन कैऱ्यांच्या दिवसामध्ये
हातकातडीं गेली सोलून
आठवते ना-
हातामध्ये हात घालुनी
अर्धा डोंगर गेलो चढूनी
वर्गामधल्या गोष्टी बोलत
उन्हात फिरलो शेतांमधूनी

मला तरी नित आठवते गा
आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळीमध्ये
उबगुनी जाता देह आणि मन



– वि. म. कुलकर्णी

(Compiled by : Ms. Mrudula Tambe)

11 February 2013

मुलांस बोध

[भुजंगप्रयात]

बरें सत्य बोला यशातथ्य चाला ।
बहू मानिती लोक येणें तुम्हांला ॥
धरा बुद्धि पोटीं विवेकें तुम्ही हो ।
बरा गूण तो अंतरामाजिं राहो ॥१॥

सदा दात घांसोनि तोंडा धुवावें ।
कळाहीन घाणेरडें, बा, नसावें ॥
सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे ।
बहू काळ हा खेळ कामा नये रे ॥२॥

दिसामाजि कांहींतरी तरी तें लिहावें ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें ॥
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करावें ।
बरें बोलणें नित्य जीर्वी धरावें ॥३॥

बहू खेळ खोटाचि आलस्य खोटा ।
समस्तांशिं भांडेल तोची करंटा ॥
बहूतां जनांलागिं जीवें धरावें ।
भल्या संगतीं न्याय तेथें वसावें ॥४॥

विवेकेंविणें सर्वही दंभ झाला ।
बहू नेटका सज्जला साज केला ॥
प्रतीतीविणें बोलणें व्यर्थ होतें ।
विचारेंविणें सर्वही व्यर्थ हो तें ॥५॥

हिशेबी सदा न्याय सांडू नये रे ।
कदाचित अन्याय होता ढका रे ॥
जनीं सांडीतां न्याय रे दु:ख होतें ।
महासौख्य तेही अमस्मात जातें ॥६॥

प्रचीतीविणें बोलणे व्यर्थ वाया ।
विवेकेविणें सर्वहि दंभ जाया ॥
बहू सज्जला नेटका साज केला ।
विचारेंविणें सर्वही व्यर्थ गेला ॥७॥

वरीं चागंला अंतरीं गोड नाहीं ।
तया मानवाचे जिणे व्यर्थ पाहीं ॥
वरीं चांगला अंतरीं गोड आहें ।
तयालागी कोणीतरीं शोधिताहें ॥८॥

सदा अंतरीं गोड तें सांडवेना ।
कदा अंतरीं ओखटे देखवेना ॥
म्हणुनी भला गूण आधी धरावा ।
महाघोर संसार हा नीरसावा ॥९॥

'भला रे भला' बोलती तें करावें ।
बहुतां जनांचे मुखे येश घ्यावें ॥
परी शेवटी सर्व सोडुनि द्यावें ।
मरावे परी कीर्ति रुपेउरावें ॥१०॥



- समर्थ रामदास (नारायण सूर्याजी ठोसर)

8 February 2013

चिमण्यांस !

या चिमण्यांनों, या गS या
अंगणि माझ्या नाचाया
टपटप पाउल वाजूं दे
झपझप पाउल चालूं दे ।।१।।

ही घ्या टाळी वाजवितें
हें घ्या गाणें मी म्हणतें
एकामागुन एक फिरा
हळूच वळवा मान जरा ।।२।।

चटकन उचला तांदूळ
भरकन फिरवा पाऊल
नाच कुणी पाहिल अपुला
लपा ! उठा ! जा, दूर पळा ! ।।३।।



- वनमाळी (वा. गो. मायदेव)