A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

3 April 2010

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखांत गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे; याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखांत गेले.


- नारायण सुर्वे (ऐसा गा मी ब्रह्म)

पोटापुरता पसा पाहिजे

पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ॥ ध्रु ॥

हवाच तितुका पाडी पाउस देवा, वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा, मायमाउली काळी
एका वितीच्या भूकेस पुरते, तळहाताची थाळी ॥ १ ॥

महालमाड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने, जतन कराया काया
गोठविणारा नको कडाका, नको उन्हाची होळी ॥ २ ॥

सोसे तितुके देई, याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देइ वा दु:ख ईश्वरा, रंक करी वा राजा
अपुरेपणाही नलगे, नलगे पस्तावाची पाळी ॥ ३ ॥


 ग. दि. माडगूळकर

चैत्र पाडवा

शुभारंभ करी शक गणनेचा
करुनी पराभव दुष्ट जनांचा
शालिवाहन नृपति आठवा
चैत्रमासिचा गुढीपाडवा

किरण कोवळे रविराजाचे
उल्हासित करते मन सर्वांचे
प्रेमभावना मनी साठवा
हेचे सांगतो गुढीपाडवा

घराघरांवर उभारुया गुढी
मनामनांतील सोडून अढी
संदेश असा हा देई मानवा
चैत्र प्रतिप्रदा-गुढीपाडवा

जुन्यास कोणी म्हणते सोने
कालबाह्य ते सोडून देणे
नव्या मनूचे पाईक व्हा
हेच सांगतो गुढीपाडवा

नववर्षाचा सण हा पहिला
वसंत ऋतूने सुरू जाहला
प्रण करुया मनी नवा
हेच सांगतो गुढीपाडवा


— मंगला गोखले

1 April 2010

कशासाठी? पोटासाठी!

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळूं आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कूकुक्‌ शीट झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी. ll १ ll

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी ll २ ll

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगांत
मागें मागें धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलांत
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी ? पोटासाठी ! ll ३ ll


- माधव जूलीयन

प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावुं तूज आतां मी कोणत्या उपायीं ?

तूं माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आतां कसे करू मी ?
गेली दुरी यशोदा, टाकुनी येथ कान्हा,
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीही वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;
नैष्ठुर्य त्या सतीचे, तूं दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीप्य साधण्यातें.

नाही जगांत झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा, लाभे अतां मला ही,
आईविणे परी मी, हा पोरकाच राही.
सारे मिळे परंतू, आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती, माझ्या अखंड पेटे.

आई, तुझ्या वियोगे, ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.
किंवा विदेह आत्मा, तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा, की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची, होई न शांत आई
पाहुनीया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही
वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीही पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !



माधव जूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)

22 March 2010

अस्मान कडाडून गेला

ही अशी उडी बघताना,
कर्तव्य मृत्यु विस्मरला
बुरुजावर फ़डफ़डलेला,
झाशितील घोडा हसला
वासुदेव बळवंताच्या,
कंठात हर्ष गदगदला
दामोदर डोले वरला,
मदनलाल गाली फ़ुलला
कान्हेरे खुदकन हसला
क्रांतीच्या केतूवरला - "अस्मान कडाडून गेला" "अस्मान कडाडून गेला"

दुनियेत फ़क्त आहेत
विख्यात बहाद्दर दोन
जे गेले आईकरिता,
सागरास पालांडून
हनुमंतानंतर आहे - "ह्या विनायकाचा मान" "ह्या विनायकाचा मान"



 –  मनमोहन नातू

6 February 2010

शहाणी बाहुली


या बाई या,
बघा बघा कशी माझी बसली बया ll १ ll

ऐकू न येते,
हळूहळू अशी माझी छबी बोलते ll २ ll


डोळे फिरवीते,
टुलूटुलू कशी माझी सोनी बघते ll ३ ll

बघा बघा तें,
गुलूगुलू गालांतच कशी हंसते ll ४ ll

मला वाटते,
हिला बाई सारें काहीं सारें कळते ! ll ५ ll

सदा खेळते,
कधी हट्ट धरुनि न मागे भलते ll ६ ll

शहाणी कशी !
साडी चोळी नवी ठेवी जशीच्या तशी ll ७ ll


कवि : दत्तात्रय कोंडो घाटे

4 February 2010

माझी मराठी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवीत !

ज्ञानोबांची, तुकयांची
मुक्तेशांची, जनाईची
माझी मराठी चोखडी
रामदास, शिवाजींची !

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची !

डफ-तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी !
मुजऱ्याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर,
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर !

नव्या प्राणाची 'तुतारी'
कुणी ऐकवी उठून
मधुघट अपी कुणी
कुणी माला दे बांधुन !

लेक लाडका एखादा
गळां घाली वैजयंती
मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा
कुणी नजराणा देती

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे—
सात्विकाची— कांचनाची !

कृष्णा-गोदा-सिंधुजळ
हिची वाढविती कांती
आचार्यांचे आशिर्वाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी !


— वि. म. कुलकर्णी

बालभारती पाठयपुस्तकात फक्त पांचच कडवी होती.

लेजिम




दिवस सुगीचे सुरु जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी-मन प्रफुल्ल झाले...,
छन झुन, खळ झण–झण खळ,
झुन झिन, लेजिम चाले जोरात !

चौघांनीं वर पाय ऊचलले
सिंहासनीं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफवाले...,
ट्प ढुम, ढुम ढुम,
डफ तो बोले, लेजिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करुं लागली
पटक्यांची वर टोंके डूललीं 
रांग खेळण्या सज्ज जाहली...,
छन खळ, ढुम ढुम,
छन छन, पट ढुम, लेजिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं
लेझिम चाले मंडल धरुनी
बाजुस, मागें, पुढे वाकुनी...
खळ खळ, छन छन,
झण छन, खळ झन, लेजिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेजिम चाले
वेळाचे त्या भान न ऊरले
नादभरानें धुंध नाचले...,
छन छन, ढुम ढुम, 
खळ छन,ढुम ढुम, लेजिम गुंगे नादांत !

सिंहासन ते डुलूं लागलें
शाहिर वरती नाचुं लागलें
गरगर फिरले लेजिमवाले...
छन छन, खळ खळ,
झण झण, छन छन, लेजिम चाले नादांत !

दिनभर शेती श्रमुनी खपले
रात्रीसाठी लेजिम चाले
गवई नलगे, सतारवाले...,
छन छन, खळ खळ,
झण झण, छन झन, रात्र संपली नादांत !

पहांट झाली - तारा थकल्या,
मावळतीला चंद्र उतरला
परी न थकला लेजिम-मेळां...,
ढूम झन,
खळ खळ,लेजिम खाली ...,

"चला जाऊंया शेतांत" !!
  

— श्रीधर बाळकृष्ण रानडे

टीप : पाठ्यपुस्तकात फक्त चारच कडवी आहेत.