[भुजंगप्रयात]
तुझीया मनीं चांगलें व्हावयाचें;
तरी आज हो पर्व हें सोनियाचें !
असे वागले मोठमोठे शहाणे;
उद्यां काय होईल तें कोण जाणे ? ll १ ll
धरीत्रीवरी काल जीवंत ठेले;
तयांतील पाहा किती आज मेले !
तुला ही अवस्था नसे का वहाणें ?
उद्यां काय होईल तें कोण जाणे ? ll २ ll
पुढें हें करूं, तें करूं पुण्य साधूं;
धनें मेळवूं, मंदिरें थोर बांधूं;
भ्रमीं वेड या शुद्ध आहे रहाणें;
उद्यां काय होईल तें कोण जाणे ? ll ३ ll
दरिद्री, मुके आंधळे, पाहतोसी;
असे नेम का कीं तसा तूं न होसी ?
अकस्मात ये हें जिणें दीनवाणें;
उद्यां काय होईल तें कोण जाणे ? ll ४ ll
नसे आळसासारखा चोर लोकीं;
अमोलीक आयुष्य तो चोरतो कीं ;
'उद्यां हो उद्यां' हे तयाचे बहाणे;
उद्यां काय होईल तें कोण जाणे ? ll ५ ll
म्हणोनी तुला वाटतें जें करावें;
करायास तें आज वा लाग भावें;
दुजा आजच्या सारखा वेळ नाही;
विचारोनि चित्ती खरें काय पाहीं ll ६ ll
— विनायक कोंडदेव ओक
No comments:
Post a Comment