A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

12 February 2014

लमाणांचा तांडा

चालला चालला लमाणांचा तांडा
एका गावाहून दुजा गावाला
संपली येथली उसाची गु​र्‍हाळे, संपला येथला अन्नाचा शेर
आता दुजे गाव !
आता दुजा मळा !
चला पाहू चला.....
नवीन चाकरी, नवीन भाकरी ! ​ ll​ll

चालला चालला लमाणांचा तांडा
पाठीवरी सारे घेउनी बिर्‍हाड
मरतुकडी ही खंगलेली घोडी
खंगलेले बैल……
यांच्या पाठीवर देखा हा संसार
चार वितींची ती उभवाया घरे घेतल्या चटया
घेतले खाटले (त्यांचा हा पलंग), घेतली गाठोडी,
​​​घोड्याच्या​ पाठीशी उलटे खाटले अन त्यात घातले रांगते मूल !
घेतली गाडगी, मडकी, डबडी, .....
(चुलीला दगड मिळतील तेथे—
नकोत ते घ्याया बांधुनिया संगे !! —)
घोड्याशेजारून संसारामागून रस्ता हुंगत हि
धापा टाकणारी चालली कुतरी ​ ll​ll

चालला चालला लमाणांचा तांडा
घोड्याशेजारून संसारामागून चालले बापई ! चालल्या बायका !
असंस्कृत मुद्रा..... दीनवाण्या मुद्रा..... अगतिक मुद्रा.....
कटिखांद्यावरी यांच्याही लादले 'संसाराचे ओझे'
पहा पाठीवरी बांधली बोचकी
पहा काठीवरी आणखीही काही
उरलासुरला बांधला संसार ​ ll​ll

चालला चालला लमाणांचा तांडा.....
आणि तांड्यातील, पाहिलीत का ती एक लमाणीण
ओझ्याने अगदी वाकली आहे, थकली आहे
तिच्या खांद्यावर, तिच्या काठीवर
जड जड सारे गुळाचे गाठोडे, देवाचे गाठोडे बांधले आहे.
—परी काठीच्या त्या एका टोकाला अन
राघूचा पिंजरा बांधला आहे........
जीवाने जपल्या मायेने पोसल्या राघूचा पिंजरा बांधला आहे.....
अस्थिर संसारी विकीर्ण जीवन
त्यात एकली ही कोमलता-खूण !
—ओझ्याने वाकल्या लमाणाच्या स्त्रीने
डोळ्यांपुढे राही अशा रीतीने हा बांधला पिंजरा
—तेवढीच तिच्या आत्म्याची ओळख.....
मनाचे भोजन
तेवढीच तिच्या लमाणजातीच्या
मानव्याची खूण !! ​ ll​ll

—चालला चालला लमाणांचा तांडा
एका गावाहून दुजा गावाला.....


— वि. म. कुलकर्णी

No comments: