कां भटकसि येथें बोलें l कां नेत्र जाहले ओले
कोणीं का तुला दुखवीलें l सांग रे! ll १ ll
धनि तुझा क्रूर कीं भारी l का माता रागें भरली
का तुझ्यापासुनी चुकली l सांग रे ! ll २ ll
हा हाय कोंकरू बचडें l किति बें बें करुनी अरडे
उचलोनि घेतलें कडे l गोजिरें ! ll ३ ll
मग थोपटुनी म्यां हातें l आणिलें गृहातें त्यातें
तों नवल मंडळीना तें l जाहलें. ll ४ ll
गोजिरें कोंकरू काळें l नउ दहा दिनांचें सगळें
मउमऊ केश ते कुरळे l शोभले. ll ५ ll
लाडक्या कां असा भीसी l मी तत्पर तव सेवेसी
कोवळी मेथि ना खासी l कां बरे ? ll ६ ll
बघ येथें तुझियासाठी l आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी l कां बरें ? ll ७ ll
हळु दूध थोडके प्यालें l मग त्वरें तोंड फिरवीलें
कोंकरुं बावरुन गेलें l साजिरें ! ll ८ ll
लटकून छातिशी निजलें l तासही भराभर गेले
विश्व हें मुदित मग केलें l रविकरें ll९ ll
घेउनी परत त्या हस्ती l कुरवाळित वरचेवरती
कालच्या ठिकाणावरतीं l सोडिलें. ll१० ll
तों माता त्याची होती l शोधीत दूर शिशुसाठीं
दगडांचे तरुंचे पाठीं l हाय रे ! ll ११ ll
हंबरडे ऎकूं आले l आनंदसिंधु ऊसळले
स्तनिं शरासारखें घुसलें l किति त्वरें ! ll १२ ll
— वि. दा. सावरकर
No comments:
Post a Comment