सुंदर मी होणार, आतां सुंदर मी होणार !
सुंदर मी होणार । हो । मरणानें जगणार ।धृ.।
वर्षत्रय मम देह मरतसे, तो आतां मरणार.
वर्षत्रय मम प्राण जातसे, तो आतां जाणार ।१।
प्राशुनि माझ्या रुधिरा हंसतो, तो व्याधी रडणार;
व्याधीक्लेशें रडतो तो मम जीवात्मा हंसणार ।२।
हृद्रोगाच्या ज्वाला विझुनी सुख माझें निवणार;
माझा मृत्यू माझा सारा अश्रुपूर गिळणार ।३।
कंटक-पंजर तनु-पीडेचा पिचूनिया फुटणार;
बंदिवान मम आत्मा चातक सुखेनैव सुटणार ।४।
जुनी इंद्रियें, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार;
नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मला फुटणार ।५।
त्या पंखानीं कर्तृत्वाच्या व्योमीं मी घुसणार;
देशहिताच्या पवनसागरी पोहाया सजणार ।६।
प्रतिभाप्रसन्न नव बुद्धीची, चंचु मला येणार;
चंचुरूप मुरलीनें प्रभूचे काव्यगान होणार ।७।
मम हृदयांतरी ज्ञानफुलांचा फुलबगिचा फुलणार;
फुलांत झुलुनी आत्मदेव मम नवानंद लुटणार ।८।
नवें ओज मज, नवें तेज मज, सर्व नवें मिळणार;
जीर्ण जुन्यास्तव कोण अवास्तव सुज्ञ झुरत बसणार ? ।९।
गहानोगहनीं, भुवनोभुवनीं शोधित मी फिरणार,
भूमातेला हुडकून काढुन तद्दर्शन घेणार ।१०।
माझी भरारी विमान उडतें भरकन तिज देणार,
परवशतेचें जाल तोडुनी उडवुनि तिज नेणार ।११।
उडतउडत मग, रडतरडत मग, प्रभुपाशीं जाणार,
'स्वतंत्र तिजला करा' म्हणूनी तच्चरणीं पडणार ।१२।
व्यंग देह हा याने कामुक काम कसे पुरणार ?
पुरले नच तें पुढतीं पुरवुन आणणार शतवार ।१३।
या जन्मीं नच मोद लाभला, खेद मात्र अनिवार,
प्रीती अतृप्ता, तृप्ति अशांता, जन्म मला देणार ।१४।
मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरतीं खुलणार;
सौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्यें घडणार ! ।१५।
तळमळ हरुनी कळकळ देई मृत्यू असा दातार,
कळकळ भक्षुनि जळफळ वितरी रोग असा अनुदार ।१६।
प्रेम हांसतें, हास्य नाचतें, मृत्यूचा परिवार;
शोक क्रंदतो, भय स्फुंदतें, रोगाचा दरबार ।१७।
जगण्यांच्या नव अवताराचा मरणें हा व्यवहार;
जगतें जगणें प्रभुप्रमाणें, मरणें क्षण जगणार ।१८।
मरण्याविरहित जगणें मिळवूं असा करूं निर्धार;
शाश्वत जगण्यामधें, कोठचा दु:खाचा संचार ।१९।
आनंदी-आनंद जाहला, तनुक्रांति होणार !
मरणाचा परमेश्वर मजवर करुणाघन वळणार ! ।२०।
आनंदी-आनंद जाहला, मरतां मी हंसणार;
हांसत मरणे गोविंदाचा प्रेमपंथ ठरणार ! ।२१।
— गोविंद (गोविंद त्रिंबक दरेकर)

1 comment:
Apratim.. Mhanun Hindu sanskruti sangate, brahmhaswarupi vilin hone, hech antim lakshya!!!!
No punarjanm 🤗
Post a Comment