शर आला तो, धावुनी आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
'हा ! आई गे !' , दीर्घ फोडूनी हांक
तो पडला जाऊन झोंक
ये राजाच्या श्रवणी करुणावाणी
हृदयाचे झाले पाणी.
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवें आणुनी नयनी
तो वदला, 'हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा' !
मग कळवळूनी, नृपास बोले बाळ.
'कशी तुम्ही साधीली वेळ'
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असती बसले.
कावड त्यांची, घेउन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला.
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरांत रुतुनी बसला.
मी एकुलता, पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला !
त्यां वृद्धपणी, मीच एक आधार
सेवेस अतां मुकणार
जा, बघतील ते, वाट पांखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही,
दुर्वार्ता फोडुं नका ही,
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी, करा तुम्ही सांभाळ
होउनियां श्रावणबाळ.
परि झांकुनी हे, सत्य कसे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
"घ्या झारी... मी जातो..." त्याचा बोल
लागला जावया खोल.
सोडीला श्वास शेवटला,
तो जीव विहग फडफडला,
तनु-पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा, रडला धायीं धायीं
अडखळला ठायीं ठायीं.
— ग. ह. पाटील
स्वर : श्री. श्रीधर फडके
12 comments:
very very emotional and heartly touching.....
ही कविता मला पाचव्या किंवा सहाव्या वर्गात १९६०-१९६१ या वर्षीच्या बालभारती मध्ये होती. पहिल्यांदा जेव्हा गुरूजींनी शिकवली तेव्हा सम्पूर्ण वर्गातील मुलामुलींच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. इतकी ती हृदयाला भेदून जाणारी कविता आजही तेवढीच लोकप्रिय आणि अजरामर आहे
मी लहान असताना वडील मला आपल्या जवळ झोपवून ही कविता ऐकावयचे. आज माझी लहान मुलगी ह्या कवितेसाठी आग्रही असते. कितीतरी वर्ष उलटुन जातील, पण कविता अजरामर आणि सदैव श्राव्य राहील.
हो खरं आहे. मला खुप आवडते.मी स्वतः जवळ जवळ रोज एकदा तरी बोलतेच.
माझे आजोबा लहानपणी मला हीच कविता ऐकवयचे... त्यांच्या कुशीत बसून ही कविता ऐकत ऐकत मी लहानाचा मोठा झालो... आज आजोबा तर नाहीत, पण ही कविता जेव्हा वाचतो, ऐकतो तेव्हा माझ्या आजोबांची खूप आठवण येते
ही कविता माझे आईला शाळेत असताना होती अस ती आजच्या निरर्थक कविता ऐकून सांगतअसते व ती ही कविता आजही तालासुरात म्हणते
माझे वडील लहानपणी ही कविता म्हणायचे.
ही कविता मला 1963 मध्य ४ थित होती फार आवडायची आज माझ वय ६९ आहे
जूने ते सोने,बस आणखी काय वर्णु.माणसीक सुख देतात हे क्षण
मराठी बालभारती, मध्यप्रदेश पाठ्यपुस्तक निगम मध्ये सुद्धा काही कविता होत्या त्यांचा या ब्लॉग मध्ये समावेश करता येईल काय? माझ्या आठवणीतील काही कविता मी पाठवू शकेन.
अशोक साहेब, आपल्याकडे असलेल्या कविता आपण मला मेलवर पाठवल्यास नक्कीच ब्लॉगवर समाविष्ट करता येतील.
ही कविता माझी आई मला ऐकवायची
Post a Comment