दारिद्र्य मरण यांतुनि मरण बरें, बा, दरिद्रता खोटी;[ गीति ]
मरणांत दुःख थोडें, दारिद्र्यात व्यथा असे मोठी ।।१।।
भोगूनि दुःखें सुख शोभतें जनीं,[ वंशस्थ ]
धनांधकारांत दिवा जसा वनीं.
सुखापुढें होय दरिद्रता नरा,
असोनि देहीं मृततुल्य तो खरा ! ।।२।।
माझें मलाच घर तापद फार झालें,[ वसंततिलका ]
क्षीणार्थ जाणुनि जनीं गृह वर्ज्य केलें.
गेला सुकोनिमद काल -वशेंचि ज्याचा,
जातात भृंग कट सोडुनि त्या गजाचा. ।। ३।।
नाहीं खरें विभवनाशज दुःख मातें;
दैवानुसार मिळतें धन, आणि जातें.
हें दुःख फार, मज नष्ट धनास सारे,
झालेच मित्रपण सोडुनि पाठमोरे! ।।४।।
चिंतेचें घर हेंच वैर दुसरें लोकांत होतें सदा,[ शार्दूलविक्रीडित ]
निंदा मित्र-जनांत, कारण निज-द्वेषास हें सर्वदा,
जाया बुद्धि वनास देइ सहसा, जाया सदा लाजवी,
शोकाग्नी हृदयस्थ हा, परि तनू जाळी न, संतापवी ! ।।५।।
निर्द्रव्या पुरुषा न बंधुजनही संबोधिले मानिती,
त्याचे जे प्रिय-मित्र तेहि फिरती, आपत्तिही वाढती,
जातें सत्व लयास, शीलविधुची कांति क्षया पावती,
जें केलें बहु पापकर्म इतरीं, तें त्याकडे लाविती !।।६।।
त्याची संगत कोणिही न करिती, त्या मान कोठें नसे,
जातां तो धनिच्या घरा सुवचनें त्याला न कोणी पुसे;
थोरांपासुनि दूर दूर फिरतो लाजून वस्त्राविणें,
वाटे निर्धनता महा नरक हा, हा धिक तयाचें जिणें ! ।।७।।
— परशुरामतात्या गोडबोले
No comments:
Post a Comment