A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

3 February 2016

अरुण

पुर्वसमुद्रिं छटा पसरली रम्य सुवर्णांची
कुणी उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची ?
पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं
हर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगल कालीं.
क्षितिजाची कड सारविली ही उज्जव दीप्तीनें,
सृष्टीसतीनें गळां घातलें कीं अनुपम लेणें ?
हे सोन्याचे, रक्तवर्ण हे, हे पिवळे कांहीं,
रम्य मेघ हे कितेक नटले मिश्रित रंगांहीं .
उदारांतुनि वाहते कुणाच्या सोन्याची गंगा,
कुणीं लाविला विशुद्ध कर्पुररस अपुल्या अंगा ?

अरुण चितारी नभ:पटाला रंगवितो काय ?
प्रतिभपूरित करी जगाला कीं हा कविराय ?
कीं नवयुवती उषासुंदरी दारीं येवोनी
रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनीं ?
दिवसयामिनी परस्परांचें चुंबन घेतात—
अनुरागाच्या छटा तयांच्या खुलल्या गगनांत !
स्वर्गींच्या अप्सराच अथवा गगनमंडलांत
रात्रीला शेवटचीं मंगल गीतें गातात ?
किंवा 'माझी चोरुनि नेली मोत्यांची माला '
म्हणुनि नभ:श्री रुसली, आली लाली गालांला ?

कीं रात्रींचें ध्वांत पळालें, आशेची लाली
उत्साहाशीं संगत होउनि ही उदया आली ?
किंवा फडके ध्वजा प्रीतिची जगता कळवाया,
कीं आपणांवर आज पातली हीच खरी विजया ?
कीं स्वर्गींच्या दिव्यांचे हें फुटले भांडार.
जणूं वाटतें स्वर्गच त्यासह खालीं येणार !
प्रगट जाहलें श्रीरामाचें पुष्पक किंवा हें ?
कीं सोन्याची पुरी द्वारका लखलखतें आहे ?

"तेजानें न्हाणितें जगाला कोण सखे बाई ?
नवल अगाई ! तेजोमय तूं ! तेजोमय मीहि !"
परस्परांना दिशा म्हणाल्या प्रेमळ वचनांनीं
"विरहकाल संपला गा गडे, प्रेमाचीं गाणीं !
या मेघाच्या कुंजामध्यें ही लपली कोण ?
तिला बोलवा पुरे गडे ग ! हा तुमचा मान !
अम्ही गवळणी हृदयरसांनी पूजूं प्रेमाला,
प्रेमकाल हा ! म्हणोत कोणी अरुणोदय याला.
पूर्वदिशेशीं गोफ खेळतो कृष्णगडी बाई !
उधळित सोनें सर्व तयाच्या लागूं या पायीं.
मधुस्मिताने विश्व भरुं ग ! शंकित कां म्हणुनी ?
सर्व सारख्या ? हांसावें मग कोणाला कोणीं ?"
गोफ चालला गगनमंडळीं, रंग नवा आला,
त्यांत लागला कृष्णाचा कर पूर्वेच्या गाला .
विनयवती ती पूर्वदिशा मग अधोवदन झाली,
तों प्रेमाची अद्भुत लहरी वसुधेवर आली!

या प्रेमाच्या लाटेखालीं मस्तक नमवावें,
हें आम्हांला, ब्रह्मांडाला, देवाला ठावें,
परंतु ही बघ भूदेवी तर वेडावुनि गेली,
टकमक पाहत स्वस्थ बैसली या मंगल कालीं !
दंवबिंदुंचा-नव्हे नव्हे ! हा पडदा लज्जेचा—
मुग्धपणाचा, बालपणाचा, कोमल हृदयाचा—
निजवदनाहुनि या प्रौढेनें दूर पहा केला,
योग्यच अथवा, प्रेम न मोजी क्षुद्र लौकिकाला !
प्रेमातिशयें मला वाटतें विसरुनि जाइल ही
प्रिय नाथांचा आगमनोत्सव हा मंगलदायी.
कविते ! तिजला साह्य तूंच हो, तूंही पण वेडी !
परंतु वेडाविण सुटतिल का हृदयाचीं कोडीं ?
जा जा ! आतां लाजु नको ग ! पाहुं नको खालीं !
लाजच अथवा-खुलशिल तूंहि या मंगलकालीं,
या लज्जेनें कविमानस हें होउनियां लोल,
प्रेमचंचले ! प्रेमच तुजवर मग तें उधळील !
प्रेमावांचुनि फेड कशानें प्रेमाची व्हावी ?
हा बघ सविता प्रेमळ भूतें प्रेमानें नटवीं ?

हा प्रेमाचा लोंढा वरुनी आला हो आला
भव्य गिरींनो, निजशिखरांवर झेलुनि घ्या याला.
नील झग्यावर वेलबुटी तो तुमच्या चढवील,
'निगा रखो !' येईल तुम्हांला सरदारी डौल !
कविवाणीचा स्फूर्तियुक्त मग होतां अभिषेक,
तटस्थ होउनि तुम्हांस बघतिल हे सारे लोक !

सुवासिनींनो, वनदेवींनो, डोला ग डोला!
नटवा, सजवा वनमालेला तुमच्या बहिणीला !
वनमालांनो, हळूंच हलवा हा हिरवा शेला,
सूत्रधार हा नभीं उदेला, उधळा सुमनांला !
'जय' शब्दानें आळविण्याला लोकनायकाला
नभोवितानीं द्या धाडुनि ही विहगांची माला !
सरोवराच्या फलकावरतीं स्वर्गाच्या छाया
कुणी रंगवा, कुणी फुलांवर लागा नाचाया !
वेलींच्या वलयांत बसोनी गा कोणी गाणीं,
या झाडांवर त्या झाडांवर हंसत सुटा कोणी.
कुणीकुणी या नदीबरोबर नाचत जा बाई,
प्रपातांतही बसुन गा कुणी मंजुळ शब्दांहीं.
उषःकालच्या सुगंध, शीतल मृदुल मंद वाता !
विहार कर, ये पराग उधळित अवनीवर आतां !
या कोमल रविकिरणांवरतीं स्वर्ग बसुनि आला,
सख्या मारुता, गाउनि गाणीं झोंके दे त्याला !

ऊठ कोकिळा ! भारद्वाजा ! ऊठ गडे; आतां,
मंगल गानीं टाका मोहुनि जगताच्या चित्ता !
सरिते ! गाणें तुझें सुरांमधिं या मिळवीं बाई !
साध्याभोळ्या तुझ्या गायना खंड मुळीं नाहीं !
पिवळीं कुरणें या गाण्यानें हर्षोत्कट झालीं,
गाउं लागलीं, नाचुं लागलीं, वेडावुनि गेलीं !
चराचराच्या चित्तीं भरलें दिव्याचें गान !
मूर्त गान हें दिव्य तयाला गाणारें कोण ?
दिव्य गायनें, दिव्य शांतता, दिव्याचे झोत,
वसुंधरेच्या अरुण ओतितो नकळत हृदयांत !
त्या दिव्याने स्वर्भूमीचें ऐक्य असें केलें;
त्या दिव्यानें मांगल्याचे पाट सुरु झाले !
मंगलता ती दिव्य कवीला टाकी मोहोनी,
वाग्देवीनें सहज गुंफिलीं मग त्यांचीं गाणीं.



— बालकवी

No comments: