सोन्याची तनु जाळितेसे अपुली पाषाणमूर्तींपुढें,
मुग्धे ! तें वद कोण पुण्य तुझिया हातास तेणें चढे ?
सारें विश्व बुडे तमांत तिकडे भांबावुनी बापुडें,
गे ! निष्कंप, तुला परंतु इकडे, ही ध्यान-मुद्रा जडे. ll १ ll
घ्याया कोंडुनि, मंदिरांत जगदुद्यानीं न तूं जन्मली,
वायां नासुनि जावया उगवली बागेंत चांफेकळी !
व्हाव्या वर्धित वस्तु ज्यांत वसतें सौंदर्य अत्युत्कट,
इच्छा केवळ कीं ! न वस्तुसह तें पावो जगीं शेवट. ll २ ll
प्रत्यंगीं अवघ्या प्रकर्षभर ये ज्यांच्या पुरा मोडुन
त्यांच्या पूर्णपणास सुस्थिरपणा येथें न अर्धक्षण;
पूर्णोस्थापनकाल तोच पतनप्रारंभही होतसे,
ऐसा निष्ठुर कायदा — सकल या सृष्टीस शासीतसे ! ll ३ ll
येथें नूतनजीर्ण, रूप अथवा विद्रूप, निचोत्तम,
न्यायान्याय, अनीतिनीति, विषयीं संभोग का संयम;
जातीं हीं भरडोनि एक घरटीं, एकत्र आक्रंदत,
आशा भीतिवशा म्हणूनिच मृषा स्वर्ग स्त्रजी शाश्वत. ll ४ ll
हें वैषम्य असह्य 'होतसमयीं' स्थापावया साम्यता,
तेजोवंत यदा यदा त्यजुनि ती प्रेतोपमा स्तब्धता;
अन्यायप्रतिकारकार्य करिती नाना प्रकारांतरें,
दारीं बंड ! घरांत बंड ! अवघें ब्रह्मांड बंडें भरे ! ll ५ ll
हें लोकोत्तर रूप, तेज तुजला आहे निसर्गें दिलें,
कीं तूं अन्य तशींच निर्मुनि जगा द्यावींस कांहीं फलें;
दानें दे न कुणा निसर्ग ! धन तो व्याजें तुम्हां देतसे,
तें त्यांचें ऋण टाक फेडुनि गडे ! राजीखुशीनें कसें ! ll ६ ll
होतां वेल रसप्रसन्न फुटुनी येतो फुलोरा तिला,
ती आत्मप्रतिमांस निर्मुनि हंसे संहारकालानला;
'वाढा आणि जगा' निसर्ग म्हणतो सृष्टीस भूतात्मिका,
डोळ्यांनीं उघड्या पहात असतां होशी गुन्हेगार कां ? ll ७ ll
— बी

1 comment:
'कविता स्मरणातल्या' पुस्तकामध्ये 'दीपज्योतीस' ही कविवर्य बी यांची कविता, शांताबाईंनी इतकी सुरेख उलगडून दाखवली आहे की ज्याचे नाव ते. ही कविता वाचून आपल्याला वाटते की कवितेचा विषय आहे - देवळामध्ये एकाकी तेवणारी -'दिपज्योत', परंतु हा झाला सरलार्थ. या कवितेमध्ये कविने, 'विधवाविवाह' या विषयास हात घातलेला आहे. स्मकालीन स्त्रीजीवनावर कविता भाष्य करते.
अधिक रुचि असल्यास, 'कविता स्मरणातल्या' हे कवियत्री शांता शेळके यांचे पुस्तक जरुर वाचा.
Post a Comment