आई ! आई! बोलतो कसा हा आई !
म्हणतो 'मं मं' भूक लागतां
'पा पा' करतो पाणि मागतां
म्हणतो 'दू दू ' दुधास बघतां
हसतो ही ही ! बोलतो कसा हा आई ! ll १ ll
तेल माखतां करतो 'तो तो',
न्हाउं घालतां 'बुडु बुडू' म्हणतो
तसाच झोपीं जातां म्हणतो
'गाई गाई' ! बोलतो कसा हा आई ! ll २ ll
मला पाहतां म्हणतो 'ता ता'
'बा बा' करतो बाबा दिसतां
आणि धोकतो उठतां बसतां,
'याई याई' ! बोलतो कसा हा आई ! ll ३ ll
यास पाखरें 'चिउ' वा 'काऊ',
'माउ' मांजरी, उंदिर'बाऊ',
फळें मिठाई खाऊ 'आऊ'
'हम्मा' गाई ! बोलतो कसा हा आई ! ll ४ ll
'टण टण' म्हणतो पायगाडीला
म्हणतो 'पो पो' मोटारीला
आणि बोलतो आगागाडीला
'भप भप ई ई' ! बोलतो कसा हा आई ! ll ५ ll
– भवानीशंकर पंडित
No comments:
Post a Comment