रम्य ते बालपण!


'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

December 14, 2011

नलराजा आणि हंस (भाग १)

'नलदमयंती स्वयंवर' या सुमारे २२५ ते २५० श्लोकांच्या आख्यानातून काही निवडक वेचे पाठ्यपुस्तकांमध्ये घेतलेले असतात. काही संस्मरणीय वेचे एकत्र करून इथे तीन भागांत विभागून दिलेले आहेत.


[शार्दुलविक्रीडित]
पुण्य-श्लोक नृपावळींत पहिला होवोनी जो राहिला
जो राजा असतां समस्त महिला विश्रांती शेषाहिला
व्यासोक्ते अवगाहिला बुधजनी नाना-गुणी गायिला
जो नामें नळ तत्कथौघ लिहिला तो पाहिजे पहिला ll १ ll


[दिंडी]
कथा बोलूं हे मधुर सुधा-धारा
होय शृंगारा करुण रसा थारा
निषध-राजा नळ-नामधेय होता
वीरसेनाचा तनय महा-होता ll २ ll


[वसंततिलका]
चंद्रासि लागति कळा उप-राग येतो
गंगेसि भंग बहु पाण-उतार होतो
जें होय चूर्ण तरि मौक्तिक तें कशाला
नाही समान नळ-राज-महा-यशाला ll ३ ll


[शिखरिणी]
कदा नेणों वोढी शरधिंतुनि काढी शर कदा
कदा धन्वीं जोडी वरि वरिही सोडी तरि कदा
वि-पक्षाच्या वक्षावरि विवर-लक्षास्तव रणीं
कळे राजेंद्राची त्वरित शर-संधान-करणी ll ४ ll


[शार्दुलविक्रीडित]
जो धैर्ये धर-सा सहस्त्रकर-सा तेजें तमा दूर-सा
जो रत्नाकर-सा- गभीर, शिरसा भूपां यशोहार-सा
ज्ञाता जो सरसावला, नव-रसांमाझारि शृंगार-सा
शोभे तामरसाक्ष तो नळ रसा-नाथ स्तवूं फारसा ll ५ ll


[माल्यभारा]
नळ-राज-कथा सुधाचि साजे
दमयंती वर-वर्णिनी विराजे
मिळणी उभयांसि होय जेथें
अधिकारी अधिकानुराग तेथें ll ६ ll


[वसंततिलका]
गंगा-तरंग-सम जो निज देहवर्णी
भृंगापरी रुचिर कांति जयाशी कर्णी
जंघाल जो पवन-सं-गतिची सवे घे
शृंगारिला हय तयावरि भूप वेंघे ll ७ ll

जो अंबरी उफळतां खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
जो या यशास्तव कसे धवलत्व ने घे
शृंगारिला हय तयावरि भूप वेंघे ll ८ ll


[दिंडी]
सवें सेना भूपाळ निघालाहे
शींव लंघी उद्यान एक पाहे
रिघे तेथे मित सेवकांसि बाहे
फौज सारी बाहेर उभी राहे ll ९ ll

पनस जंबू जंबीर विविध निंबे
कुंद चंदन माकंद सुदाडिंबे
तुंग नारिंगें विकसली कदंबें
वसति तेथें शुक-सारिका-कदंबें ll १० ll


[वंशस्थ]
लते-तळी रुंद निरुंद कालवे
गळोनि तेथें मकरंद कालवे
परागही सांद्र तयांत रंगती
फुलांसवे भृंग-तती तरंगती ll ११ ll


[आर्या]
उपरि स-कंटक साचे परंतु सांचे जयांत सुरसाचे
घोंस असे फणसांचे षण्मासांचे कितेक वरसाचे ll १२ ll
- रघुनाथ पंडित (रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे)

No comments: