बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत 
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? II धु० II
 
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्र-किरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ॥ १ ॥
 
अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ॥ २ ॥
 
नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुला-फळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल, वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ॥ ३ ॥
 कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? II धु० II
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्र-किरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ॥ १ ॥
अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ॥ २ ॥
नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुला-फळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल, वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ॥ ३ ॥
— मधुकर पांडुरंग आरकडे
 
