[वृत्त : वागीश्वरी]
महासिंधु याला असे पाठिराखा, तसे साह्य सह्याचलाचे कडे,खडे दुर्ग साल्हेर, फोंडा, परांडा, अशेरी असे दक्ष चोहींकडे;
महाराष्ट्र हा कृष्णपाषाणदेही, परी लोहपाणीहि अंगात या;
नद्या न्हाणिती तापि, कृष्णा नि गोदा, भिमा, मांजरा, वैनगंगा तया ll १ ll
महात्मा खरा जो स्वधर्माभिमानी परी धर्मवेडास थारा न दे,
समत्वें गुणग्राहकत्वेंच योजी स्वकीयांस जो राष्ट्रकार्यामधें,
सदा वंद्य जो क्षात्रकर्मप्रणेता महाराष्ट्रसम्राट शिवाजी प्रभू
तया पूज्य ती पूज्य तत्सेवकाला न कां संतमाता महाराष्ट्रभू ? ll २ ll
जिचा 'अमृतातेंहि जिंकील पैजा' असा बोल ये प्रत्ययाचा निका,
पहा भिन्नजातीय पुष्पाकरांहीं दिसे गालिचा कीं हिची वाटिका,
मराठी अशी ज्ञानदेवी जयाची असे मायबोली मराठीच तो,
ह्र्दीं रक्त दे साक्ष तो बंधु माझा, कुठेंही असो उच्च वा नीच तो ll ३ ll
मराठीस अन्याय कोठेंहि झाला, स्वदेशीं, विदेशीं कुणीं गांजिलें
मराठी कसा मी न संताप माझा धडाडे जरी तीव्र दुःखानिलें ?
मराठी जनांचेंच वर्चस्व राहो स्वत:च्या महाराष्ट्रदेशीं तरी–
प्रसादें तुझ्या कोणती व्यक्त आशा करुं अन्य हे वंद्य वागीश्वरी ? ll ४ ll
— माधव जूलियन
No comments:
Post a Comment