[जाति - केशवकरणी ]
पूर्व-पश्चिमा खळाखळांतुनी वाहे जलवाहिनीमांडवी अमुची मंदाकिनी
दूर डोंगरासमीप अगदीं तीच्या तीरावरी
आमुची जमीन वतनी बरी
भरदार शिवारामधें पिकें दाटलीं
उगवत्या भानुची प्रभा नभीं फांकली
बांधावर गवतें हिरवी फोंफावलीं
वनलक्ष्मीचें अभिनव वैभव उतास जणुं चाललें
खगांनीं तत्स्वागत गायिलें ll १ ll
सृष्टिसतीच्या आनंदाच्या प्रसन्न उत्सवदिनीं
शिवारामधें गात येउनी
वरुणकृपेचा विलास ऎसा पाहुन मनमोहन
वाटलें चित्तीं मजलागुन
कोपर्यावरिल त्या आम्रतरुच्या तळीं
मृदु तृणांकुराची मखमल गादी भली
बुंध्यास टेकुनी, चक्रवर्ति जणुं बळी,
भूक लागतां चटणी किंवा कांदा अन भाकर
खाउनी द्यावी वर ढेंकर ll २ ll
धुमाळ-बाळा जोडी घेउनि मोट धरावी कधीं
करावी राखण मळणी कधीं
रास घालुनी डोळे भरुनी संतोषें पाहुनी
निजावें वाकळ मग पसरुनी
वर चंद्रतारकामंडित तें अंबर
पायथ्यास पडुनी वाघ्या करि गुर्गुर
वाजती गळ्यांतिल बैलांचे घुंगुर
लाख पटींनी हें न सुखद का कृषिकर्मी राबणें!
नको तें परवशतेचें जिणें! ll ३ ll
— यशवंत
No comments:
Post a Comment