[वृत्त : वियदगंगा]
मराठ्यांच्या महालक्ष्मी, तुला घे शाहिरी मुजरा
जगाचा मानितों स्वामी स्वत:ला मी महामानी
तुझ्या धामीं तुझ्या कामीं परंतु दास हा मानी
असें शास्ता जनांचा मी परी माई तुझां भाट
दिपावें विश्व वाणीनें, इथें कां दावुं तो थाट
नभींच्या तारकाराशी पदाघातें झुगारीन
परि स्वातंत्र्यलक्ष्मी गे ! तुझ्या पायीं सदा लीन
जिजाऊचा स्वतेजाचा, शिवाजीचा स्वशौर्याचा
मराठ्यांच्या दरार्याचा, तसा तो स्वाभिमानाचा,
क्षणार्धीं चित्तचक्षूना दिसाया लागला काळ
स्वराज्यीं जेधवां भाला जहाला नांगरी फाळ
नभाला चुंबिता झाला अतां तो मोडला भाला
परंतू वाव येथें हा तयाच्या शेष तेजाला
भिनूं दे माझिया रोमीं तयाचें थोडकें तेज
जनां देईन सांगोनी नसे प्यालों कधीं पेज
इथें संचारतें वारें, थरारे स्पर्शनें अंग
अहाहा ! जाहली वृत्ती समाधीमाजिं त्या गुंग !
झणीं बोला मला आज्ञा त्वरें सोडीन ललकारी
पुन्हा लावीन नाचाया महाराष्ट्रीं दर्याखोरीं
जहाला नांगराटीचा विखारी पूर्विंचा भाला
अतांच्या लेखणींतूनी नवा आणीन जन्माला
समाधी लागली आहे म्हणोनी तोंवरी बोल
मराठ्यांच्या यशोगानीं मनानें स्फूर्तिनें डोल
तनूचें भान जावोनी बनूनी शून्य त्या नजरा
पडूं दे माउली खालीं तुझ्या वेणींतला गजरा
यशाचा कौल मानोनी मुदें सोडीन दर्बारा
मराठ्यांच्या महालक्ष्मी, तुला घे शाहिरी मुजरा
— यशवंत (३०-११-१९२१)
यशवंत यांच्या निवडक कवितांचा "पाणपोई" या संग्रहात या कवितेचे वृत्त 'विजयगंगा" असे असून "आठवणीतल्या कविता" या संकलीत संग्रहात ते 'वसंत असे नमूद केलेले आहे.
No comments:
Post a Comment