[वृत्त : ओवी]
गाई घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालूं साद । गोविंदा रे? ll१ll
गाई घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ll२ll
गाई घरा आल्या । वांसरे हंबरती
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ll३ll
गाई घरा आल्या । ब्रह्मानंद वांसरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ll४ll
गाई घरा आल्या । घोटाळती पाडसांशीं
हाय ! नाही हृषीकेशी । माझ्यापाशीं ll५ll
गाई घरा आल्या । पाडसांस हुंगीतात
माझा मात्र यदूनाथ । दूरावला ! ll६ll
गाई घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भूका तान्हा । वासुदेव ! ll७ll
गाई घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ! ll८ll
गाई घरा आल्या । दूधवाटी राहीयेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ! ll९ll
गाई घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
अजूनि कां घननीळ । ये ना घरा? ll१०ll
गाई घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का? ll११ll
गाई घरा आल्या । पाल चूकचूक करी
राख अंबे माझा हरी । असे तेथें ! ll१२ll
- वनमाळी (वा. गो. मायदेव)
No comments:
Post a Comment