[दिंडी]
न सोडी हा नळ भूमि-पाळ माते
असें जाणोनी हंस वदे त्यातें
"हंस–हिंसा नच घडो तुझ्या हातें,
सोड, राया, जाईन स्व–स्थळातें ll २२ ll
"जागजागीं आहेत वीर कोटी
भले झुंजारहि शक्ति जयां मोठी,
तयां माराया धैर्य धरी पोटी;
पांखरू हे मारणे बुद्धि खोटी ! ll २३ ll
"वधुनी माझी हे कनक–रूप काया,
कटकमुकुटादिक भूषणे कराया
कशी आशा उपजली तुला राया ?
काय नाही तुजला दया माया ? ll २४ ll
(शार्दुलविक्रीडित)
"म्हातारी उडतां नयेचि तिजला माता मदीया अशी;
कांता काय वदो ? नवप्रसव ते सातां दिसांची तशी;
पाता त्या उभयांस मी; मज विधी घातास योजितसे !
हातामाजि नृपा तुझ्या गवसलों, आतां करावे कसे ? ll २५ ll
[पद]
"हरहर सांपडलों, सापडलों ! कैसा फांशी पडलों
इतर नदी जल–टांकी, टाकुनि आलों याच तटाकीं
सोडुनि मानस–केली, कापुनि घ्याया आलों शेली
ठेविन तव पदीं माथा, आतां सोडविं मज रघुनाथा ll २६ ll
[मालिनी]
"सदय ह्रदय याचे, भूप हा ताप–हारी,
म्हणुनि परिसतां मी होय एथे विहारी;
मजहि वध कराया पातकी पातला जो,
वरूनि पति असा ही भूमि कैशी न लाजो ?" ll २७ ll
[वसंततिलका]
एणेपरी परिसतां अति–दीन वाचा,
हेलावला नळ पयोधि दया–रसाचा;
सोडी, म्हणे, "विहर जा अथवा फिराया
राहें यथा–निज मनोरथ हंस–राया ll २८ ll
[मालिनी]
सुटुनि खग पळाला, बैसला शाल–शाखे,
क्षणभरि निज देही मुक्ति–विश्रांति चाखे;
स्व–जन तव तयाचे भोंवताली मिळाले,
कवळिती निज–बंधू, बाष्प–बिंदू गळाले ll २९ ll
[शिखरिणी]
विसांवा घे कांही, उडुनि लवलाही परतला,
नृपाळाच्या स्कंधी बसुनि मणिबंधी उतरला
म्हणे हंस, क्षोणी–पतिस, "तुज कोणी सम नसे,
दयेचा हा ठेवा तुजजवळीं देवा, वसतसे. ll ३० ll
[दिंडी]
"ऐक राया, तूं थोर दया–सिंधू,
नीति–सागरही, तूंचि दीन–बंधू;
निखंदोनी बोलिलो नको निंदू,
सकल वदसी जरि पाय तुझे वंदू ll ३१ ll
"पारधीमाजी खगा मृगा राजे
करिति हिंसा जी तीच बरी साजे
तुवां दिधली मज मोकळीक, बा जे
दया केली ही कीर्ति तुझी गाजे ll ३२ ll
"हंस मिळणे हें कठिण मही–लोकी,
सोनियाचा तो नवल हें विलोकी;
तशा मजलाही सोडिले तुवां कीं,
तुझा ऐसा उपकार मी न झांकीं ll ३३ ll
"किति रावे असतील तुझ्या धामी,
किति कोकिलही, सारिका, तसा मी.
चित्त लागियले तूझिया लगामीं,
नृपा, योजी मज आपुलिया कामीं ll ३४ ll
"तुझा करपंजर होय मला थारा
तुझ्यां वचनांचा ओघ दुग्धधारा
तुझे मानस बहु थोर गा उदारा
सत्य लोकेशहि तूंचि गुणागारा ll ३५ ll
[वसंततिलका]
"हें पांखरूं मजसि येइल काय कामा,
ऐसे, नृपा, न वद, पूरित–लोककामा;
मोले उणे व्यजन ते धरितां पुढारीं
छाया करी, तपन–दीप्तिसही निवारी !" ll ३६ ll
— रघुनाथ पंडित (रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे)
इथे पाठ्यपुस्तकातील निवडक वेचे एकत्र करून तीन भागांत विभागून दिलेले आहेत त्यांतील हा तिसरा भाग आहे.
No comments:
Post a Comment