A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

21 May 2020

संशयरत्नमाला

[आर्या]

उठतां बहु त्वरेंनें 'कोठें जातां' असें तुम्हां देवी
पुसती झाली जाणों, पुसतां ज्ञाता पुढें न पद ठेवी ।।१।।

किंवा नारद आला आलापीत स्वकीय सच्चरितें
प्रेमळ गीत तुम्हांला हरि हरिणापरिस बहुत वश करितें ।।२।।

कीं माझें दुर्दैव प्रभूच्या मार्गांत आडवें पडलें
शरणागतभयशमना यास्तव येणें तुझें नसे घडलें ।।३।।

किंवा मजहुनि दुसरा कोणी बहु दीन दास आढळला
तच्छूभदैवसमीरें त्यावरि करुणाघन प्रभू वळला ।।४।।

प्रायः सुमुहूर्ताचा शोध करायासि लागला वेळ
होय महत कार्य परि प्रभूचा तों नित्य सहज हा खेळ ।।५।।

किंवा तुज एकाकी पाहुनि खळ दैत्य आडवे आले
फुटतां सागर सिकतासेतूचें काय त्यापुढें चाले ।।६।।

किंवा तुज गुंतविलें भजकीं, परि ते दयार्द्र या रंकीं
उद्धरित्यासि न सज्जन गुंतविती गाय कष्टतां पंकीं ।।७।।

किंवा चुकतें कांहीं स्तवनीं तेणेंचि मागुता बससी
तरि हें मन्मूर्खत्व प्रभू तूं दोषज्ञही तसा नससी ।।८।।

कीं न श्रवणीं गेली ही माझी हांक, हा कसा तर्क
कशि गुरुजनीं सतीची, शिवला ज्या कुमुदिनीस असदर्क।।९।।

अथवा स्वस्थचि अससी कीं घेतो नाम रक्षणीं शूर
हें सत्य परि प्रबळहि बळ दुर्बळ जरि रणीं धणी दूर।।१०।।

कीं भीतो भ्रांत वृथा मृगजळमग्नासि काय तारावें
सत्यचि हें परि शिशुचें भय जाया बागुलासि मारावें ।।११।।

कीं कांहीं व्रतनियमीं बोलों चालों नये असें झालें
तरि दिनरक्षणाहुनि अधिकफळव्रत कधीं मना आलें ।।१२।।

कीं हांक ऐकतांचि प्रभुला हा रक्षणार्हसें वाटे
वाटे या दु:शीलग्रीष्मी तव नव दयानदी आटे ।।१३।।

किंवा पुराणपुरुषा सांप्रति बहु भागलासि या कामीं
तुज नीज लागली तों सजलों मारावयासि हांका मी ।।१४।।

किंवा बरी परीक्षा केल्यावांचूनि न प्रसाद करा
तरि वरि तसाच आंतहि उगाळितां कोळसा प्रयास करा ।।१५।।

कीं धाडिलें पुढें निजनाम करो सर्व सिद्धता आधीं
ऐसे प्रभो म्हणावें तरि तुमचीं चरणसारसें साधीं ।।१६।।

कीं आर्जविला नामप्रतिनिधी हा अमृत उधळितो स्वैर
न पुसे, न भी, न ऐके यास्तव दोघांत लागलें वैर ।।१७।।

कीं संप्रति अभय दिलें कलिला चालावया बरें राज्य
परि कोण प्राणि सदय शिंपील बळें दवानळीं आज्य ।।१८।।

किंवा म्हणसि समर्थोहं कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुं
दीनावनाविणें क्षण देइल दयिता दया कशी वर्तुं ।।१९।।

कीं अक्षक्रीडेनें हरिलें मन, सर्व कार्य जी चुकवी
तरि बद्धमूळ एकचि भजदवनव्यसन वर्णिती सुकवी ।।२०।।

कीं वैकुंठीं पुष्कळ भक्त, तिळ स्थळ नसे नसावेंची
वसवा पुरें, पुरे कां म्हणतां, धनवंत कण कसा वेंची ।।२१।।

कीं बहु काळ विसरला फारचि संकोचला सखा लाजे
येत असेल हळु हळू म्हणुनचि एकहि न पादुका वाजे ।।२२।।

कीं नाम स्पर्शमणि स्पर्शे परि काय करिल खापर मी
सदयहि घालील कसा दुर्दैवाला सुखीं सखा परमीं ।।२३।।

कीं प्रथम मदपराधें तारुं म्हणुनि वाहिल्या आणा
प्रभुजी पुरे प्रतिज्ञा, भारतरणवृत्त तें मनीं आणा ।।२४।।

कीं याचकांसि देतां सरले चारीहि मुक्तिधनराशी
भक्तिच मज द्या, द्यावें देवाला अमृत, योग्य न नराशीं ।।२५।।

कीं मागें गुप्त उभा अससि प्रेमें उभारुनी बाहे
तरि काय बाळकाचे तूं सादर बोल ऐकशी बा हे ।।२६।।



— मोरोपंत

संकल्पना : श्री सुरेश (दादा) देशपांडे, कोल्हापूर

No comments: