[जाति : धवलचंद्रिका]
वंदन तुज मायभूमि ! हें अखेरचें !न कळे तव दर्शन कधिं फिरुन व्हायचें ! ll धृ ll
विसकटली बसवावी फिरुन ती घडी
तव काजीं झिजवावी शक्य तों कुडी
आशेची फोल परि भ्रमुनि वावडी
देशोधडिं लागे ही आज बापुडी
आंचवलों जननीच्या सौख्यकारणा
आंचवलों तेंविं तुझ्या क्लेशवारणा
काय म्हणूं परिसमाप्ति ही तुला रुचे ?
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll १ ll
यश मळलें, उजळाया फिरुन त्याप्रती
तळमळलों धडपडलों निशिदिनीं किती
काकांचे जेविं थवे भ्रष्टल्या पिला
काडीचा आधारहि मानिला महा
झाली परि फसवणूक नित्य दुस्सहा ll २ ll
मान उंच करु पाहे कोंवळी कळी
धडगत लागेल तिची केंविं वादळी ?
झिडकारुनि दिधलें जें लेकरु तुवां
टाकलास ज्याचा तूं तोडुनी दुवा
तरि त्याच्या नच खळती अश्रु नेत्रिंचे
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll ३ ll
मरणाच्या दाढेमधिं चाललों जरी
मरणाच्या भीतिचा न लेशही उरीं
मरणाच्या खाईमधिं आयु कंठलें
मरणाचें काय तया बुजग-बाहुलें ?
ग्रीष्माचा दाह काय वाळल्या तृणा ?
राखेला जाळिल का अग्नि तो पुन्हां ?
परि तुझी न भेट मला व्हायची पुढें
ह्या शल्ये हें तुटतें मात्र आंतडें
मिळणार न अंत्य शयन गे त्वदंकिंचें
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll ४ ll
"बंदिशाळा" या खंडकाव्यातील हे गीत असून त्याच्या पहिल्या आवृत्तीत धृवपदात 'मायभूमि' व त्याच्या पुनरावृत्तीत 'मातृभूमी' पण तिसर्या आवृत्तीत मात्र सर्व ठिकाणी 'मायभूमि'असा शब्द आहे. कवीच्या "पाणपोई" या संग्रहात सगळ्या कडव्यात 'मायभूमि' हाच शब्द आहे पण कवितेचे शीर्षक मात्र "मायभूमीस अखेरचे वंदन" असे आहे.
No comments:
Post a Comment