रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

February 17, 2018

अढळ सौंदर्य

(जाति - दिंडी)

तोच उदयाला येत असे सूर्य
अहो क्षितिजावर त्याच नव्हे काय ?
तेच त्याचे कर न का कुंकुमानें
वदन पूर्वेचे भरति संभ्रमानें ?

तेच तरु हे तैशाच पुष्पभारें
लवुनि गेले दिसतात पहा सारे !
त्याच वल्ली तैसेंच पुष्पहास्य
हंसुनि आजहि वेधिती या मनास !

कालचे जें कीं तेच आज पक्षी
कालच्या हो ज्या त्याच आज वृक्षीं
बसुनि गाती कालचीं तींच गानें,–
गमे प्रातःप्रर्थना करिति तेणें !

काल जो का आनन्द मला झाला
तोच आजहि होतसे मन्मनाला;
कालचा जो मी तोच हा असें का ?–
अशी सहजच उद्भवे मनीं शंका.

अशी सहजच उद्भवे मनीं शंका
काय समजुनि समजलें तुम्हांला का ?
असे अनुभव कीं-रिझवि एकदां जें
पुन्हां बहुधा नच रिझों त्याच चोजें.

पुन्हां बहुधा नच रिझों त्याच चोजें
कसें मग हें वेधिलें चित्त माझें–
आज फिरुनो या सूर्य-तरु-खगांनीं
आपुलीया नवकांति-पुष्ण-गानीं ?

म्हणुनि कथितों निःशंक मी तुम्हांतें,–
असे सुंदरता अढळ जरी कोठें
तरी करी ती सृष्टींत मात्र वास–
पहा, मोहिल सर्वदा ती तुम्हांस.


— केशवसुत

December 12, 2017

नव्या युगाची गाणी

एकमुखाने चला गाऊ या, गाणी नव्या युगाची
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची

सा म्हणतो साथी आपण, भेदभावना दूर करा
रे म्हणतो रेंगाळु नका रे, सदैव अपुले काम करा
निर्धाराने पुढे जाऊ या, पर्वा करू ना कोणाची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||१||

ग म्हणतो गर्व मिरवुनी, सर्वनाश कुणी करू नका
म म्हणतो महान सुंदर, मानवतेचा मंत्र शिका
प म्हणतो परिश्रमाने, फुलवा ज्योत यशाची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||२||

ध म्हणतो जगात केवळ, समानता हा धर्म खरा
नि म्हणतो निर्मळतेचा, मनी वाहू द्या नित्य झरा
सा म्हणतो सामर्थ्याने, उजळा उषा उद्याची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||३||— वंदना विटणकर

December 9, 2017

पंख मला जर असते...

चित्रकार :
श्री. चंद्रकांत तजबिजे
पंख मला जर असते दोन,
पतंग उडवीत बसेल कोण ?

मीच पाखरू झालो असतो,
आभाळावर गेलो असतो

निळी निळाई आभाळाची,
पंखांवरती माखायाची

चार चांदण्या छोट्या छोट्या
तोडुन केल्या असत्या गोट्या

विमान मागे पडले असते,
हार खाउनी रडले असते

सगळे माझा करतील हेवा,
पंख मला, पण फुटतील केव्हा ?— डॉ. सुरेश सावंत

December 8, 2017

नंदीबैल

नंदीबैल आला आता नंदीबैल आला
हसवितो, खेळवितो बालगोपाळाला ।।धृ.।।

लाल गुलाबी मखमालीची अंगावरती झूल ।
जगावेगळे रूप बघूनी जिवास पडते भूल ।।
गुबूगुबूच्या तालावरती गाव गोळा झाला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला ।।१।।

चित्रकार : श्रीमंत होनराव (तोंडारकर)

रंगबिरंगी सारे सजले उभे रेखीव शिंग ।
चमचम चमके भाळावरती चमकदार भिंग ।।
प्रश्न कुणाचा असो कसाही डुलवी मानेला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला ।।२।।

किणकिण किणकिण गळ्यात घुंगुरमाळा ।
छुमछुम छुमछुम साथ देतसे पायी पैंजणवाळा ।।
पाठीवरच्या गोणीचेही नाही ओझे त्याला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला ।।३।।

घराघरांतून सूप भरूनी येती दाणे, नाणे ।
वेगवेगळ्या दारावरती वेगवेगळे गाणे ।।
दाणे देईल त्याचे गाणे गाई नंदीवाला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला ।।४।।


— डॉ. सुरेश गोविंदराव सावंत

November 25, 2017

पीक खुशीत डोलतंया

पीक खुशीत डोलतंया भारी,
भरला आनंद समद्या शिवारी.
बनून पाचूचं रान,
आमचं हरलं देहभान.
आज रानाची शोभा न्यारी..
आल्या सरसर भुईवर धारा,
ताप मातीचा सरला सारा.
समदं शिवार फुलून आलं,
बगून मन हे भुलून गेलं
गेल्या भुलून दिशाही चारी..
दाट पिकांनी सजली शेतं,
पीक मजेत गिरकी घेतं.
गार वारं हे झुळझुळ व्हातं,
पानापानांत गाणी गातं.
गाती पानात पाकरंही सारी..
काळ्या आईची कराया पूजा,
राबराबला शेतकरी राजा.
ऊनातानात घाम त्यानं शिपला,
मळा मोत्यांचा मातीत पिकला.
आली सोन्याची दौलत दारी..

— उत्तम कोळगांवकर

November 14, 2017

नाच रे मोरा

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी,
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच ll १ ll

झर झर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ,
काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच ll २ ll

थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत,
खेळ खेळू दोघांत
निळया सौंगड्या नाच ll ३ ll

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच ll ४ ll


— ग. दि. माडगुळकर

नदीचे गाणे

दरीदरीतुन, वनावनांतुन,
झुळझुळ मी वाहत येते,
मी मंजुळ गाणे गाते,
मी पुढेच धावत जाते.

वसली गावे तीरावरती,
त्यांना भेटुनि जाते पुढती,
लतावृक्ष किती काठावरती,
भूमितुनी जे मला भेटती.

फुलवेली मज सुमने देती,
कुठे लव्हाळी खेळत बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती.

पाणी पिउनी पक्षी जाती,
घट भरुनी कोणी जल नेती,
गुरे-वासरे जवळी येती,
मुले खेळती लाटांवरती.

मी कोणाची मी सर्वांची,
बांधुनिही मज नेणाऱ्यांची !
जेथे जाईन तेथे फुलवीन,
बाग मनोहर आनंदाची !


— वि.म. कुलकर्णी