'बालभारती - आठवणीतील कविता' म्हटले की, सर्वात पहीली कुठली कविता आठवत असेल तर ती 'श्रावणमासीं हर्ष मानसीं' या कवितेची नुसती आठवण जरी झाली तरी लगेच आपण त्यातल्या ओळी गुणगुणायला लागतो. "बालभारती - मराठी कविता" या माझ्या नवीन ब्लॉगची सुरुवात बालकवींच्या याच 'श्रावणमास' कवितेने करतो.
- सुरेश शिरोडकर
(संकलक)
श्रावणमास
श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटें चोहिंकडे;
क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनि ऊन पडे ll १ ll
वरतीं बघतां इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिलें नभोमंडपी कुणि भासे ! ll २ ll
झालासा सुर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तों उघडे,
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळेंपिवळें ऊन पडे ll ३ ll
उठती वरतीं जलदांवरतीं अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रुप महा ll ४ ll
बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांचि माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि कीं एकमतें ll ५ ll
फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती;
सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निजबाळांसह बागडती ll ६ ll
खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गात तयाचा श्रावणमहिमा एकसुरें ll ७ ll
सुवर्णचंपक फुलला, विपिनीं रम्य केवडा दरवळला,
पारिजातही बघतां भामा, रोष मनींचा मावळला ! ll ८ ll
सुंदर परडी घेउनि हातीं पुरोपकंठी शुध्दमती,
सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुलें-पत्री खुडतीं ll ९ ll
देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत,
वदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचे गीत. ll १० ll
— बालकवी
15 comments:
जसे कुठल्याही पूजेत गुरुजी मंत्रपुष्प म्हणतात तसं प्रत्येक मराठी माणूस ही कविता पावसाळ्यात एकदा तरी गुणगुणतोच
हि कविता मला शाळेत अभ्यासक्रमात नव्हती याचे मला फार वाईट वाटते आहे ....कारण मला मराठी विषयाला खूप विद्वान व रसिक शिक्षक लाभले होते .दोघांची नवे न राहवून उद्धृत करावीशी वाटतात .एक म्हणजे माझे पिताश्री प्रकाश मुळे व दुसरे म्हणजे श्री श्रीकांताराव गोन्दीकर .हे दोन मराठीचे शिक्षक म्हणजे जणू कांही साक्षात सरस्वतीच यांच्या जिन्व्हेवर विराजमान होती .वारंवार त्यांच्या मुखातून अभ्यासक्रमात नसतानाही या कवितेच्या ओळी ऐकल्या आहेत .थोडाबहुत अर्थही जाणून घेतला आहे .पण आज हि कविता या ब्लॉगवर पूर्ण वाचायला मिळाली .संग्राहकाला शतशःधन्यवाद
@ मुळेजी,
तुम्हाला हि कविता अभ्यासक्रमात नव्हती म्हणून वाईट वाटते आहे पण मला ही कविता अभ्यासक्रमात असल्याचा आनंद आहेच पण त्याहीपेक्षा हा "बालभारती" संकलनाचा उपक्रम याच कवितेमुळे सुरु झाल होता याचा जास्त आनंद आहे. श्रावण महिना सुरु झाला की बालकविंच्या ह्या कवितेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
आला श्रावण श्रावण हि कविता मिळेल का
मिळेल. आपला ईमेल आय डि द्या.
"सायंकाली कुणी कोकिला तरु शिखरी बैसुनी उंच स्वरांने सांगू लागली जगता लागोनी"
ही कविता ज़र कुणास पूर्ण येत असेल तर ख़ालील इ मेल आय डी वर पाठवावी.धन्यवाद
जयवन्त
jaywantwale@yahoo.com
Mala milel ka
एक कविता आठवते--
खुजबुज खुजबुज खुजबुज रे
चंदनाच्या झाडाखाली माती का गळे.
ही कविता कुणाची? पुढच्या ओळी काय?
Thank you.
श्रावणमासी ह्या कवितेतील एक शब्द "पुरोपकंठी'ह्याचा अर्थ काय.कवित्तेत खालून चौथ्या ओळीत हा शब्द आहे
सोबती तुम्ही मिळून चालणे मिळून बोलणे ..ही कविता मिळेल का ..2006-07 मध्ये 6 वी किंवा 7 वी ला होती ..plz
Namaskar sir
Saraswati Vandana
"He isha tuze he stawan"
He geet ( kavita) milel ka
sachindrane@gmail.com
Ajun Ek kavita hoti
Tyamadhe shabdanchi takat sangitali hoti.
Vaparun vaparun shabdanchi takat kami hote
Mhanun parat shabda lihayachi garaj aahe. Asa tyach arthi hota.
Tee kavita milel ka?
केवळ अप्रतिम,
परसातील कुंड्यात सकाळी दिवे लावले कुणी, बिन वातीचे बिन तुपाचे निरांजना वाचीने, मज न कळे या दिव्या दिव्यांची कशी मौज थाठते, या आरतीने ओवाळावे देवाला वाटते... ही कविता माहीत असेल तर कृपया सांगा
सर मला एक कविता हवी होती मोहरा इरेला पडला,बाजीप्रभू यांचा पोवाडा.
बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||
बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||
तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||
गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||
मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||
वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||
गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला
तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||
- कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून
Post a Comment