A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

विसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर

bal kavi.jpg
बा. सी. मर्ढेकर (१९०९ ते १९५६)
विसाव्या शतकातील, केशवसुतांनंतरचे मराठी साहित्यातील एक "युगप्रवर्तक साहित्यीक" म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर. मर्ढेकरांचा जन्म खानदेशात (जळगाव जिल्ह्यातील) फैजपूर येथे इ.स.१ डिसेंबर १९०९ मध्ये झाला. सातारा जिल्ह्यातील मर्ढे हे मर्ढेकरांच्या घराण्याचे मूळगाव. मर्ढेकरांचे मूळ आडनाव गोसावी पण गावाच्या नावावरून 'मर्ढेकर' हे आडनाव रूढ झाले.

मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहाद्दरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले. तसेच धुळ्याच्या गरूड हायस्कूल- मध्येही त्यांचे शिक्षण झाले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण खानदेशात घेतल्यानंतर मर्ढेकर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाले. १९२९मधे आय.सी.एस. या ब्रिटिशकालीन प्रशासकीय सेवेतील पदाची परीक्षा देण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यात त्यांना यश आले नाही. परंतु या काळात त्यांनी युरोपातील वाङ्मयीन प्रवाहांचा जवळून अभ्यास केला. टी. एस. इलियट, जेम्स जॉइस, व्हर्जिनिया वूल्फ आदी लेखक व क्लाइव्ह बेल, रॉजर फ्राय, हर्बर्ट रीड, जेम्स सदरलंड इत्यादी समीक्षकांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांचे लेखन १९३० च्या सुमारास सुरू झाले. होमाई नल्लासेठ या त्यांच्याच पारशी विद्यार्थिनीशी त्यांनी विवाह केला, परंतु तो अल्पकाळ टिकला. त्यांचा दुसरा विवाह अंजना सिंहाल या पंजाबी तरुणीशी झाला.

१९३२ साली भारतात परतल्यानंतर त्यांनी काही काळ टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले. टाईम्स सोडल्यानंतर (१९३५) मर्ढेकरांनी पुढील तीन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. मुंबई इथल्या एलफिस्टन महाविद्यालय, ईस्माइल युसूफ कॉलेज, सीडनहॅम कॉलेज अशा महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. काही काळ धारवाड आणि अहमदाबाद इथल्या सरकारी महाविद्यालयांतही त्यांनी काम केले. इ.स. १९३८ साली त्यांनी ऑल इंडिया रेडियोत रूजू झाले आणि तिथे केंद्र अधिकारी या पदावर काम केले.

कवी म्हणून मर्ढेकरांना मराठी वाङ्मयात युगप्रवर्तकाचं स्थान दिलं जातं. मर्ढेकरांनी मराठी कवितेत आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगानी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. यंत्रयुगातील गतिमानतेत माणुसकी हरपत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. मर्ढेकरांनी कवितेप्रमाणेच कलाविचार, समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही महत्त्वाचे योगदान दिले.

मर्ढेकरांचे लेखन हे युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा व नव्या युगाची जाणीव व्यक्त करणारे होते. नेहमीच्या निराश, उद्विग्न अवस्थेतील कवितांबरोबरच प्रसन्न, नितांत सुंदर अशा कविताही त्यांनी लिहिल्या. मर्ढेकरांच्या व्यापक आशयाच्या कवितांमध्ये गुणात्मक मूल्य एवढे होते की, त्यांनी मराठी साहित्यावर "युगप्रवर्तनात्मक" असा प्रभाव पाडला. 'वाङ्मयीन महात्मता', 'सौंदर्य आणि साहित्य' ह्या समीक्षाग्रंथांतून उत्कृष्ट समीक्षालेखनाचा परिपाठ त्यांनी दिला. मराठीत नवटीकेचा प्रांरभ त्यांनीच केला. त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्वाचे समजले जातात. 'पाणी', 'तांबडी माती' व 'रात्रीचा दिवस' या तीन कादंबऱ्या, 'नटश्रेष्ठ' हे एक नाटक व चार संगीतिका लिहून हेही साहित्यप्रकार मर्ढेकरांनी समर्थपणे हाताळले.

रेडिओपर्व
टाईम्स सोडल्यानंतर मर्ढेकरांनी पुढील तीन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले पण अघ्यापन क्षेत्रात यशस्वी, लोकप्रिय प्राध्यापक अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करू शकले नाहीत. अखेर त्यांनी शिक्षणक्षेत्र सोडून द्यावयाचे ठरवले. पुण्याचा भूतकाळ मागे टाकून या काळात ते दादरच्या हिंदू कॉलनीत ‘चांदणी व्हिला’त राहत. हॅमिल यांना या गुणी विद्वानाची होत असलेली आबाळ पाहून हळहळ वाटत होती. कॉलेजमध्ये मर्ढेकरांसाठी आपल्याला काही करता आले नाही, याची रुखरुख त्यांना लागली होती. म्हणून त्यांनी ऑल इंडिया रेडिओचे प्रमुख कंट्रोलर लायोनल फिल्डन यांच्याकडे मर्ढेकरांची शिफारस करून त्यांना रेडिओमध्ये नोकरी लावून दिली. त्यांचे 'Arts and Man' हे पुस्तक इंग्लंडमधील एका प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाले होते. त्यांचा ‘Basic English’ हा प्रदीर्घ लेख आणि त्यांनी एल्फिन्स्टोनियनच्या अंकात लिहिलेले लेख, त्यांच्या काही मराठी कविता, त्यांचा महाविद्यालयांतील विविध कार्यक्रमांतील सहभाग या सगळ्यांची माहिती हॅमिल यांच्यामार्फत फिल्डनना मिळाली होती. त्यामुळे त्यांना मर्ढेकर हे एक चांगले उमेदवार आहेत याची मनोमन खात्री होती. मर्ढेकरांचा हा रेडिओ-पर्व कालखंड १९३८ ते १९५६. उण्यापुऱ्या ठरा वर्षांचा होता.

मामा वरेरकर हे मर्ढेकरांचे ज्येष्ठ. मर्ढेकर रेडिओत रुळल्यानंतर कालांतराने कृ. द. दीक्षित रेडिओ परिवारात आले. मर्ढेकर शिस्तीचे उत्तम अधिकारी होते. दीक्षित पत्रे लिहिणे, मसुदे तयार करणे हे आपले काम चोखपणे करत, पण त्यातही मर्ढेकर चुका काढत. पण नंतर हळूहळू दोघांत स्नेह निर्माण होत गेला. एकदा सिद्धार्थ कॉलेजमधील काही विद्यार्थी कवितेबद्दल चर्चा करण्यासाठी आणि ‘पिपांत मेले’ समजून घेण्यासाठी विनम्रपणे आले. त्यांनी मर्ढेकरांना कविता समजावून द्यावी, अशी विनंती केली. मर्ढेकरांना थेट नकारही देववेना. पण नाइलाजाने त्यांनी नकारच दिला. विद्यार्थी परत गेले. ते गेल्यावर मर्ढेकर दीक्षितांना म्हणाले, ‘माझी कविता मीच समजून द्यायची म्हणजे काय?’ आपली कविता इतरांना फारशी समजत नाही म्हणून त्यांना वाटणारी खंत या उद्गारांमागे होती. त्यानंतर खिन्न मनाने त्यांनी दीक्षितांना विचारले, ‘काहीच आशय निघत नाही का हो या कवितेतून?’ या प्रश्नात आपल्याला रसिकांपर्यंत पोहोचता येत नाही, हे कलावंताचे दु:ख होते. मर्ढेकरांनी वरून कितीही आव आणला, तरी त्यांच्या अंतर्यामी हे दु:ख असणारच!

मर्ढेकरांना संगीताची समज होती. त्यांचे रंगभूमीवरही प्रेम होते. मर्ढेकरांचे वडील व तत्कालीन नाटक मंडळांतील काही व्यक्ती यांचे येणे-जाणे असे. ‘नाटय़कला प्रवर्तक’चे भाटे व आबासाहेब मर्ढेकर यांचा स्नेह होता. मर्ढेकरांची या वातावरणामुळे नट होण्याची इच्छा होती, असे त्यांनी ‘नटश्रेष्ठ’च्या वेळी दीक्षितांना सांगितले.

मराठी साहित्यात नवे युग निर्माण करणाऱ्या 'युगप्रवर्तक' कवीचे २० मार्च १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले.


प्रकाशित साहित्य:

कवितासंग्रह − शिशिरागम (१९३९), काही कविता (१९४७), आणखी काही कविता (१९५१)
कादंबऱ्या − रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी
नाटक − नटश्रेष्ठ (१९४४)
संगीतिका − कर्ण (१९४४), संगम (१९४५), औक्षण (१९४६), बदकांचे गुपित (१९४७)
समीक्षात्मक − आर्ट्‌स अँड मॅन (१९३७), वाङ्मयीन महात्मता (१९४१), टू लेक्चर्स ऑन इस्थेटिक ऑफ लिटरेचर (१९४१), सौंदर्य आणि साहित्य (१९५५).

-~~~~~***~~~~~~


संदर्भ :

१. लोकसत्ता: लोकरंग २९ नोव्हेंबर, २००९.
२. marathisrushti.com

No comments: