रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

April 27, 2017

घे कुठार !

घे कुठार ! कर उगार, घाव अतां घालीं ll ध्रु. ll

धरणीनें पोशियलें
रविकिरणीं वाढविलें
राहियला सतत मरुत आजवरी वाली ll १ ll

किति विहगां खांद्यावरि
खेळविलें बाळांपरि
शांत गुरें छायेमधिं आजवरी झालीं ll २ ll

प्रेमामृत तरुणतरुणि
गेल्या ओतून इथुनि
संकेतस्थल होणें आजवरी भालीं ll ३ ll

काळाचा कठिण हात
वस्तूचा होत पात
आनंदें पाहत मी प्रकृतिच्या चाली ll ४ ll

होऊं दे देह छिन्न
शकलांवर शिजविं अन्न
मन निवेल ऐकुनियां तृप्ति तुला आली ! ll ५ ll— वा. गो. मायदेव

संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

​जग वंदी त्यासच पुन्हां पुन्हां

जग वंदी त्यासच पुन्हां पुन्हां
हें घडत कसें न कळे कवणा ? ll ध्रुo ll

तो नाच राजा, राज्कुमारहि
नाच कोणि श्रीमंत धनाढ्यही,
विख्यात न तो कोणि कवीही,
नाच साल्या कांहीच खुणा ! ll १ ll

म्हणे जगाला, "उठ, – उठे जग !
म्हणे जगाला, "डोळ्यांनी बघ,"
विस्फारुनि जंव नेत्र, बघे मग ! ll २ ll
चहूंकडे करुणा करुणा !

जन देई ह्याते सिंहासन,
झुगारुन हा देत विलक्षण,
र्हुदायी जगाच्या विराजला पण –
अद्भुत हि सगळी घटना ! ll २ ll

धूळ जगाची लुटिली ह्याने
निसर्ग-सुंदर उभवि उपवने,
शांतीचे साम्राज्य निर्मिणे,
एकाच त्याचा हा बाणा ! ll ४ ll

– अज्ञातवासी (दिनकर केळकर)

April 26, 2017

दास डोंगरी राहतो

दास डोंगरी राहतो
साता समुद्रा वाहतो
घोंगावून लक्ष वारे
दुर्ग दुर्ग हादरतो

दास विस्तवी राहतो
मेघ होऊनी वाहतो
खडपात, तळपात
बीजांकुरी पालवतो

दास अंधारी राहतो
ब्रह्मप्रकाश पाहतो
विजेसारखा पेटून
भूतासमंधा भोवतो

दास एकांती राहतो
चिंता विश्वाची वाहतो
त्याच्यापरी जो जो जागा
त्याच्या हाकेला धावतो


 –  बा. भ. बोरकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe)

April 24, 2017

झप-झप चाललेत नाजुक पाय

मे महिन्याची दुपार
जाई फुलासारखी नाजुक पोर
घेउन निघाली बापाला भाकर
गिरणीचा भोंगा आत्ता होईल
दमलेला बाप फाटकात येईल
उशिर झाला म्हणून रागवेल काय
झप-झप चाललेत नाजुक पाय.

घरचे सगळेच तिनेच केले
आजारी आईला औषध दिले
धाकट्या भावाची घेतली शिकवणी
पाठच्या बहिणीची घातली वेणी
येईल तसा शिजवला भात
तापलेल्या तव्याने पोळले हात
तरीपण डोळ्यात पाणी नाही
आईचीच आज ती झाली होती आई
डोळेभरुन पाहत होती माय
झप-झप चाललेत नाजुक पाय.

माथ्यावरी उन, पायाखाली उन
परिस्थितीचे मनात उन
निखाऱ्यात तापलेल्या धरणी माय
पोरीचे पाऊल कमळाचे हाय
तिच्या पावलाखाली चंदन हो
माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो
अरे तिच्या डोळ्यातली भिती पहा
ड्याळा थोडेसे मागे रहा
बापासाठी लेक ओढीने जाय
झप-झप चाललेत नाजुक पाय.


— दत्ता हलसगीकर

संकल्पना : श्रीयुत दिनेश कासवेद, पुणे.