A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

12 December 2017

नव्या युगाची गाणी

एकमुखाने चला गाऊ या, गाणी नव्या युगाची
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची

सा म्हणतो साथी आपण, भेदभावना दूर करा
रे म्हणतो रेंगाळु नका रे, सदैव अपुले काम करा
निर्धाराने पुढे जाऊ या, पर्वा करू ना कोणाची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||१||

ग म्हणतो गर्व मिरवुनी, सर्वनाश कुणी करू नका
म म्हणतो महान सुंदर, मानवतेचा मंत्र शिका
प म्हणतो परिश्रमाने, फुलवा ज्योत यशाची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||२||

ध म्हणतो जगात केवळ, समानता हा धर्म खरा
नि म्हणतो निर्मळतेचा, मनी वाहू द्या नित्य झरा
सा म्हणतो सामर्थ्याने, उजळा उषा उद्याची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||३||



— वंदना विटणकर

9 December 2017

पंख मला जर असते...

चित्रकार :
श्री. चंद्रकांत तजबिजे
पंख मला जर असते दोन,
पतंग उडवीत बसेल कोण ?

मीच पाखरू झालो असतो,
आभाळावर गेलो असतो

निळी निळाई आभाळाची,
पंखांवरती माखायाची

चार चांदण्या छोट्या छोट्या
तोडुन केल्या असत्या गोट्या

विमान मागे पडले असते,
हार खाउनी रडले असते

सगळे माझा करतील हेवा,
पंख मला, पण फुटतील केव्हा ?



— डॉ. सुरेश सावंत

8 December 2017

नंदीबैल

नंदीबैल आला आता नंदीबैल आला
हसवितो, खेळवितो बालगोपाळाला ।।धृ.।।

लाल गुलाबी मखमालीची अंगावरती झूल ।
जगावेगळे रूप बघूनी जिवास पडते भूल ।।
गुबूगुबूच्या तालावरती गाव गोळा झाला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला ।।१।।

चित्रकार : श्रीमंत होनराव (तोंडारकर)

रंगबिरंगी सारे सजले उभे रेखीव शिंग ।
चमचम चमके भाळावरती चमकदार भिंग ।।
प्रश्न कुणाचा असो कसाही डुलवी मानेला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला ।।२।।

किणकिण किणकिण गळ्यात घुंगुरमाळा ।
छुमछुम छुमछुम साथ देतसे पायी पैंजणवाळा ।।
पाठीवरच्या गोणीचेही नाही ओझे त्याला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला ।।३।।

घराघरांतून सूप भरूनी येती दाणे, नाणे ।
वेगवेगळ्या दारावरती वेगवेगळे गाणे ।।
दाणे देईल त्याचे गाणे गाई नंदीवाला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला ।।४।।


— डॉ. सुरेश गोविंदराव सावंत

25 November 2017

पीक खुशीत डोलतंया

पीक खुशीत डोलतंया भारी,
भरला आनंद समद्या शिवारी.
बनून पाचूचं रान,
आमचं हरलं देहभान.
आज रानाची शोभा न्यारी..
आल्या सरसर भुईवर धारा,
ताप मातीचा सरला सारा.
समदं शिवार फुलून आलं,
बगून मन हे भुलून गेलं
गेल्या भुलून दिशाही चारी..
दाट पिकांनी सजली शेतं,
पीक मजेत गिरकी घेतं.
गार वारं हे झुळझुळ व्हातं,
पानापानांत गाणी गातं.
गाती पानात पाकरंही सारी..
काळ्या आईची कराया पूजा,
राबराबला शेतकरी राजा.
ऊनातानात घाम त्यानं शिपला,
मळा मोत्यांचा मातीत पिकला.
आली सोन्याची दौलत दारी..


— उत्तम कोळगांवकर

14 November 2017

नाच रे मोरा

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी,
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच ll १ ll

झर झर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ,
काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच ll २ ll

थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत,
खेळ खेळू दोघांत
निळया सौंगड्या नाच ll ३ ll

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच ll ४ ll



— ग. दि. माडगुळकर

स्वर: श्री. श्रीधर फडके

नदीचे गाणे

दरीदरीतुन, वनावनांतुन,
झुळझुळ मी वाहत येते,
मी मंजुळ गाणे गाते,
मी पुढेच धावत जाते.

वसली गावे तीरावरती,
त्यांना भेटुनि जाते पुढती,
लतावृक्ष किती काठावरती,
भूमितुनी जे मला भेटती.

फुलवेली मज सुमने देती,
कुठे लव्हाळी खेळत बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती.

पाणी पिउनी पक्षी जाती,
घट भरुनी कोणी जल नेती,
गुरे-वासरे जवळी येती,
मुले खेळती लाटांवरती.

मी कोणाची – मी सर्वांची,
बांधुनिही मज नेणाऱ्यांची !
जेथे जाईन – तेथे फुलवीन,
बाग मनोहर आनंदाची !


— वि.म. कुलकर्णी

9 November 2017

मराठबाणा

[वृत्त : वागीश्वरी]

महासिंधु याला असे पाठिराखा, तसे साह्य सह्याचलाचे कडे,
खडे दुर्ग साल्हेर, फोंडा, परांडा, अशेरी असे दक्ष चोहींकडे;
महाराष्ट्र हा कृष्णपाषाणदेही, परी लोहपाणीहि अंगात या;
नद्या न्हाणिती तापि, कृष्णा नि गोदा, भिमा, मांजरा, वैनगंगा तया ll १ ll

महात्मा खरा जो स्वधर्माभिमानी परी धर्मवेडास थारा न दे,
समत्वें गुणग्राहकत्वेंच योजी स्वकीयांस जो राष्ट्रकार्यामधें,
सदा वंद्य जो क्षात्रकर्मप्रणेता महाराष्ट्रसम्राट शिवाजी प्रभू
तया पूज्य ती पूज्य तत्सेवकाला न कां संतमाता महाराष्ट्रभू ? ll २ ll

जिचा 'अमृतातेंहि जिंकील पैजा' असा बोल ये प्रत्ययाचा निका,
पहा भिन्नजातीय पुष्पाकरांहीं दिसे गालिचा कीं हिची वाटिका,
मराठी अशी ज्ञानदेवी जयाची असे मायबोली मराठीच तो,
ह्र्दीं रक्त दे साक्ष तो बंधु माझा, कुठेंही असो उच्च वा नीच तो ll ३ ll

मराठीस अन्याय कोठेंहि झाला, स्वदेशीं, विदेशीं कुणीं गांजिलें
मराठी कसा मी न संताप माझा धडाडे जरी तीव्र दुःखानिलें ?
मराठी जनांचेंच वर्चस्व राहो स्वत:च्या महाराष्ट्रदेशीं तरी–
प्रसादें तुझ्या कोणती व्यक्त आशा करुं अन्य हे वंद्य वागीश्वरी ? ll ४ ll



— माधव जूलियन

6 November 2017

प्रबोधन

उघडिं नयन ! रम्य उषा हंसत हंसत आली !
अरुणकिरणमय वसना अवनी ही ल्याली ! ll ध्रु o ll

मंजुमधुर गान करित
आनंदें भुवन भरित,
विहगवृंद गगनिं उडत
या सुरम्य कालीं ! ll १ ll

हंसति फुलें, तरु डुलती
लतिकागण नृत्य करिती,
धांवति या भ्रमरतती,
सुप्ति तुला आली ! ll २ ll

स्निग्ध दृष्टि तव पडतां
होय वृत्ति सुखभरिता,
रविकरिं घनपंक्ती तथा
स्वर्णमय जहाली ll ३ ll

सुप्रभात सुखकर हा
दारुण तिमिरोत्कर हा
रमवी सकलांस पहा
दिव्य-विभवशाली ! ll ४ ll

ऊठ ! ऊठ ! तुजविण परि
नीरस हें सुखं सुंदरि !
विफल गमत तें, ज्यावरि
दृष्टि न तव गेली ! ll ५ ll

विकचकमलगंधि पवन
शीतल, करि तापशमन,
त्यांत परी श्वसन तव न,
तप्त तनु जहाली ! ll ६ ll

खगकूजित अलिरुंजित,
लतिकातरुगणसिंजित,
सुमुखि ! विफल सकल गमत
तुजविण या कालीं ! ll ७ ll

गगन तरणिकररंजित,
चपल धवल घन विहरत,
क्षणहि परि न दृष्टि वळत
तव मुखिं दृढ ठेली ! ll ८ ll

ऊठ ! ऊठ ! सखि ! झडकरि,
नयनध्रुति चपल पसरिं,
रम्य मधुर हास्य करीं,
स्वर्ग आण खालीं ! ll ९ ll

पेमाचा ओघ सरल
वाहो तव मुखिं अविरल,
अचरहि जग करुनि तरल
बुडविं सुखिं विशालीं ! ll १० ll



—  ए. पां. रेंदाळकर

13 October 2017

आटपाट— नगरांतील काहणी

"बुलबुल गवई कुणीं मारिला ?" चिमणा म्हणतो "मी !"
"कां रे चिमण्या सांग मारिला बुलबुल तूं नामी ?" II १ II

" कारण कसलें घेउन बसलां जगांत हरकामीं ?
नवी धनुकली सहज पाहिली, आहे का नामी !" II २ II

बोलुनि ऐसें हंसत उडाला निर्दय चिमणा तो !"
"पकडुनि त्याला आणिल ऐसा कोण पुढें येतो ?" II ३ II

म्हणे ससाणा, "पकडुनि त्याला घेउनि मी येतों !"
आणि आणिला खराच त्यानें पकडुनि चिमणा तो !" II ४ II

कबजामध्यें डोमकावळे घेती चिमण्याला,
न्याय तयाचा करावयाला हंस पुढें आला II ५ II

हंसें दिधली चिमण्यालागीं शिक्षा देहान्त,
आणि आणिली बगळ्यानें ती क्षणांत अमलांत ! II ६ II

नेउनि टाकी नदींत कवडा चिमण्याचें प्रेत
सुसर माकुली ठाव तया दे अपुल्या उदरांत ! II ७ II

मेलेल्या बुलबुलाभोंवतीं पक्षी मग जमले,
अश्रूंनीं आपुल्या तयाला त्यांनीं भिजवीलें ! II ८ II

सपक्ष गंधर्वास द्यावया शेवटला मान,
सर्व विहंगां खगेश्वराचें सुटलें फर्मान II ९ II

"प्रिय होतीं बुलबुलास अपुल्या फुलें गुलाबाचीं
समाधि बांधा त्याच फुलांनीं प्रिय गंधर्वांची " II १० II

"प्रमाण आज्ञा !" म्हणुनि उडाला पक्षिवृंद सारा,
गुलाब घेउनि चोचीमध्यें आला माघारा II ११ II

"तुला वाहिला ! आजपासुनी हा नोहे माझा !"
बोलुनि अर्पी मुकुट बुलबुला पक्ष्यांचा राजा ! II १२ II

वाहुं लागले इतर पक्षि मग फुलें गुलाबाचीं
बुलबुलावरी उठे समाघी क्षणांत पुष्पांची ! II १३ II

वर्षं झालीं हजार, तरिही समाधि ती अजुन !
आणि हजारों वर्षे पुढतीं राहिल ती टिकुन ! II १४ II

[अनुष्टुभ]
नकाशांत नका शोधूं
समाधिस्थल तें कुणी !
बाळांनो ! ही आटपाट
नगरांतिल काहणी !
II १५ II


— माधव

10 October 2017

देह मंदिर चित्त मंदिर

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


— वसंत बापट

16 September 2017

कधीं पाहातों

कधीं पाहातों
मी माझ्यातच विचित्र मानव
शुद्र अविकसित विद्रुप दानव
अंधारांतुन अन चिखलांतुन
वृक्षमुळांपरि भूविवरांतुन
चेटकिणीच्या हातांपरि निज शरीर अपुलें
शूद्र घृणास्पद; फिरे परंतु
मिरवित मिरवित जीवनजंतु
अंधपणांतच सरपटणारा
कुढ्या तमांतच अन जगणारा
विचित्र मानव !

कधीं पाहतों
मी माझ्यातच विराट मानव
पावलांतुनी उमले ज्याच्या उषाच अभिनव !
हिमालयापरि देह जयाचा
मुकुट शिरावर रविकिरणांचा
पवित्र गंगा स्फुरते ज्याच्या वक्षामधुनी !
अन मृत्युंजय मंत्र जयाच्या अधरांमधुनी !
आकाशाला भिडे जयाचा प्रचंड माथा
हसत उलटतो नक्षत्रांचा प्रकाशगाथा
अमर्त्यतेच्या वाटेवरला जीवनयात्री
रवि भाळावर, अमृत गात्रीं
चिरसंजीवन मंगल नेत्रीं !

विद्रुप मीही, विराट मीही
साक्षी केवळ आणिक तरिही
या दोघांचा :
भूविवरांतिल अंधाराचा; आकाशाचा !


— मंगेश पाडगावकर

27 April 2017

घे कुठार !

घे कुठार ! कर उगार, घाव अतां घालीं ll ध्रु. ll

धरणीनें पोशियलें
रविकिरणीं वाढविलें
राहियला सतत मरुत आजवरी वाली ll १ ll

किति विहगां खांद्यावरि
खेळविलें बाळांपरि
शांत गुरें छायेमधिं आजवरी झालीं ll २ ll

प्रेमामृत तरुणतरुणि
गेल्या ओतून इथुनि
संकेतस्थल होणें आजवरी भालीं ll ३ ll

काळाचा कठिण हात
वस्तूचा होत पात
आनंदें पाहत मी प्रकृतिच्या चाली ll ४ ll

होऊं दे देह छिन्न
शकलांवर शिजविं अन्न
मन निवेल ऐकुनियां तृप्ति तुला आली ! ll ५ ll



— वा. गो. मायदेव (कवी वनमाळी)

संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

​जग वंदी त्यासच पुन्हां पुन्हां

जग वंदी त्यासच पुन्हां पुन्हां
हें घडत कसें न कळे कवणा ? ll ध्रुo ll

तो नाच राजा, राज्कुमारहि
नाच कोणि श्रीमंत धनाढ्यही,
विख्यात न तो कोणि कवीही,
नाच साल्या कांहीच खुणा ! ll १ ll

म्हणे जगाला, "उठ, – उठे जग !
म्हणे जगाला, "डोळ्यांनी बघ,"
विस्फारुनि जंव नेत्र, बघे मग ! ll २ ll
चहूंकडे करुणा करुणा !

जन देई ह्याते सिंहासन,
झुगारुन हा देत विलक्षण,
र्हुदायी जगाच्या विराजला पण –
अद्भुत हि सगळी घटना ! ll २ ll

धूळ जगाची लुटिली ह्याने
निसर्ग-सुंदर उभवि उपवने,
शांतीचे साम्राज्य निर्मिणे,
एकाच त्याचा हा बाणा ! ll ४ ll

– अज्ञातवासी (दिनकर केळकर)

26 April 2017

दास डोंगरी राहतो

दास डोंगरी राहतो
साता समुद्रा वाहतो
घोंगावून लक्ष वारे
दुर्ग दुर्ग हादरतो

दास विस्तवी राहतो
मेघ होऊनी वाहतो
खडपात, तळपात
बीजांकुरी पालवतो

दास अंधारी राहतो
ब्रह्मप्रकाश पाहतो
विजेसारखा पेटून
भूतासमंधा भोवतो

दास एकांती राहतो
चिंता विश्वाची वाहतो
त्याच्यापरी जो जो जागा
त्याच्या हाकेला धावतो


 –  बा. भ. बोरकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe)

2 February 2017

माझा भारत !

माझा भारत,माझा भारत !
ऊन, चांदणे,झुळुझुळु वारा
इथे जळाची पावनधारा
उंच ढगाहुनिइथले पर्वत,
माझा भारत,माझा भारत !
अंधारातिल दीपक होई,
सुखशांतीची वाट दाखवी
जगा आवडे याची संगत
माझा भारत, माझा भारत !
माया करितो सकलांवरती,
देव देतसे याच्या हाती
आपुलकीची अमोल दौलत
माझा भारत, माझा भारत !
मंगल गीते याची गाइन,
सेवेसाठी तत्पर राहिन
याच्यापायी वाहिन जीवित
माझा भारत,माझा भारत !



— संजीवनी मराठे

27 January 2017

रानातल्या बोरीला

रानातल्या बोरीला वाजून आली थंडी
काट्यातुन लगडली बोरे सात खंडी

वळणावरचे झाड थरकापू लागले
ट्टेमिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले

ओलीचिंब झाली हरभरऱ्याची राने
पानातले पोपट गाऊ लागले गाणे

चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे
जाळीतून डोकावले गाभूळली आकडे

थंडी आली पेटवा आगटी शेका हात गार
शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार


— अज्ञात

21 January 2017

पाळींव पोपटास

चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव

हे डाळिंबाचे दाणे वेड्या l घात तुझा करिती ll ध्रुo ll

कवटी तूं कवठावरली
फोडिलीस एका काळीं
ती चोंच आज बोथटली
करितोस गुजारा धनी टाकितो त्या तुकड्यांवरती ll १ ll

मालक तव हौशी फार
करि माया जरि अनिवार
कुरवाळी वारंवार
तूं पाळिंव पोपट त्याचा म्हणुनी तुच्छ तुला गणिती ll २ ll

चैनींत घेत गिरक्यांसी
स्वच्छंदें वनिं फिरलासी
गगनांत स्वैर उडलासी
ते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तूं चित्तीं ll ३ ll

चाहिल तें झाड बघावें
त्यावरी स्वैर उतरावें
फळ दिसेल तें फोडावें
मग उडुनी जावें खुशाल, असली तेव्हांची रीती ll ४ ll

कितितरी फळें पाडाचीं
चोंचीनें फोडायाचीं
हि लीला तव नित्त्याची
पिंजऱ्यांत अडकुनि आयुष्याची झाली तव माती ll ५ ll

पूर्वीची हिंमत गेली
स्वत्वाची ओळख नुरली
नादान वृत्ति तव झाली
करितोस धन्याची 'हांजी हांजी' तूं पोटासाठीं ll ६ ll

येतांच धनी नाचावें
नाचत त्या सत्कारावें
तो वदेल तें बोलावें
तेव्हांच टाकितो मालक दाणे असले तुजपुढतीं ll ७ ll

हे दाणे दिसती छान
जरि लाल आणि रसपूर्ण
त्याज्य ते विषासम जाण
पिंजऱ्यांत मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही महती ll ८ ll

हा अध:पात तव झाला
डाळिंबचि कारण याला
भुलुनियां अशा तुकड्यांला
पिंजऱ्यांत मेले किती अभागी पोपट या जगतीं ll ९ ll



— काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)

टिप :पाठ्यपुस्तकात सातच कडवी आहेत

14 January 2017

मेंढपाळ (प्रार्थना)

मेंढपाळ हा प्रभू कधीचा हिरव्या कुरणी मला
कधी मनोहर जलाशयावर घेउन मज चालला
निष्कंटक हा राजमार्ग तो मला सदा दावतो
मध्येच भेसुर मेघ मृत्युचा वरती डोकावतो
परंतु माझा सखा असे प्रभु सदैव आपंगिता
या श्रद्धेने भिति न बिलगे दरीतुनी चालता


—  ना. वा. टिळक

संकल्पना : श्रीयुत कांबळी, मुंबई

5 January 2017

कळीचे फुल कसे झाले

एकदा एक कळी खूप खूप रुसली
पानांचा घुंघट ओढून बसली

धुक्याने आणले दवांचे मोती,
गुंफुन ठेवले पानांच्या भोवती
आंजारुन पाहिले, गोंजारून पाहिले,
कळीच्या ओठावर हसू नाही पाहिले

सूर्याने धाडले किरणांचे दूत,
चमचमणारा घेऊन मुकुट
आळवून पाहिले, विनवून पाहिले,
कळीच्या मुखावर भाव नाही फुलले

गरगर घेतली वाऱ्याने गिरकी
कळीच्या गालावर मारली टिचकी
वाऱ्याने घातली गाण्याची भूल
कळीचे एकदम झाले फुल


— वंदना विटणकर

संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

ह्या कवितेच्या शिर्षकाविषयी साशंकता आहे, कुणाला माहीत असल्यास कळवावे.