A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

22 August 2016

वासरू

ओढाळ वासरू रानी आले फिरू,
कळपाचा घेरू सोडुनिया
चित्रकार : राजेंद्र गिरधारी

कानांमध्ये वारे भरुनिया न्यारे,
फेर धरी फिरे रानोमाळ

मोकाट मोकाट, अफाट अफाट,
वाटेल ती वाट धावू लागे

विसरुनी भान भूक नि तहान,
पायांखाली रान घाली सारे

थकुनिया खूप सरता हुरूप,
आठवे कळप तयालागी

फिरू जाता मागे दूर जाऊ लागे,
आणखीच भागे भटकत

पडता अंधारू लागले हंबरू,
माय! तू लेकरू शोधू येई.



— अनिल

19 August 2016

अनंत-स्तोत्र

अनंता, तुझे गोल, तारे तुझे,
तुझें रूप ब्रह्मांड सारें तुझें,
तुझी ही कृती रे मनोमोहना,
अहोरात्र गाई तुझ्या गायना.

तया मूक गानें मना मोहिलें,
जगन्नायका, वेड कीं लाविलें;
नुरे भान, मी स्वाधिकारा भुलें;
भरूं लागलो सूर वेडे खुळे.

मदीं त्या तुझें रूप गाऊं धजें,
स्वयंदीपका दीप दावूं सजें;
न द्यावा जिथे पाय तेथे दिला,
बहू लाजलों भान येतां मला

तुझे लाडके रे, तुझे लाल जे
वृथा स्पर्धण्या त्यांसवें मी धजे;
करोनी दया रे दयासागरा,
क्षमस्व प्रभो, या तुझ्या लेकरा.

अहो भाग्य माझें जरी या सुरीं
सहस्त्रांश त्या गीतिची माधुरीं !
तरी हे त्वदंघ्रीं समर्पी हरी !
रुचो हे तुला स्तोत्र, घे आवरीं.


— भा. रा. तांबे

संकल्पना व संकलन: श्री सुधाकर बागुल, पुणे

गाणे ऐकण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा



17 August 2016

आनंद

देह, तनू, अन शरीर, काया,
राष्ट्र, मायभू, देशा देऊ l
ध्वज हा अपुला तिरंगा, झेंडा,
नभात, गगनी फडकत ठेवू ll

विहंग, खग, अन पक्षी, पाखरू
होऊन कवटाळू आकाशा l
सविता, रवी सूर्याची किरणे,
झेलून जगती देऊ प्रकाश ll

वृक्ष, झाड अन तरुंसारखी,
देत राहू या सकला छाया l
रडणाऱ्यांना हसवित जाऊ
प्रेम, प्रीती अन देऊन माया ll

श्रम, कष्टाने अन परिश्रमाने
काय हवे ते मिळवित राहू l
घराघरांतून सुखशांतीचे
दिवे, दीप अन दीपक लावू ll

गरीब, दरिद्री, रंक, फाटके
कुणी नसावे धरतीवरती l
मनामनांतून आनंदाला
जिकडे तिकडे यावी भरती l


— अज्ञात

16 August 2016

सुंदरतेची भेट

झुळझुळ वाहे झरा
तयाचे पाणी हो निर्मळ
संथ वाहते नदी घेऊनि
निळसर निर्मळ जल ll १ ll

ट्याळ वारा वाहवाहता
घेऊनि ताजी हवा
ळ्यांफुलांचा सुगंध संगे
रोज वाहतो नवा ll २ ll

सूर्य देतसे पिवळे सुंदर
सुवर्णरंगी ऊन
निसर्ग गातो निर्मळ गाणे
लख्ख लख्खशी धून ll ३ ll

कुणी शिकवली अशी स्वच्छता
या साऱ्यां दूतांना ?
निसर्ग झाला गुरु तयांचा
दिला पाठ सर्वांना ll ४ ll

जिथे स्वछता तिथे देवता
हेच आमुचे ब्रिद
जीवन निर्मळ, परिसर निर्मळ
हीच आमुची जिद्द ll ५ ll


— विजया वाड

12 August 2016

माहेर


चित्रकार : राजेंद्र गिरधारी

कापणी

आता लागे मार्गेसर,
आली कापनी कापनी,
आज करे खालेवऱ्हे,
डाव्या डोयाची पापनी !

पडे जमीनीले तढे,
आली कापनी कापनी,
तशी माझ्या डोयापुढे,
उभी दान्याची मापनी.
चित्रकार : राजेंद्र गिरधारी

शेत पिवये धम्मक,
आली कापनी कापनी,
आता धरा रे हिंमत,
इय्ये ठेवा पाजवुनी.

पीकं पिवये पिवये,
आली कापनी कापनी,
हातामधी धरा इय्ये,
खाले ठेवा रे गोफनी.

काप काप माझ्या इय्या,
आली कापनी कापनी,
थाप लागली पिकाची,
आली डोयाले झापनी !

आली पुढे रगडनी,
आता कापनी कापनी,
खये करा रे तय्यार,
हाती घीसन चोपनी.

माझी कापनी कापनी,
देवा तुझी रे मापनी,
माझ्या दैवाची करनी,
माझ्या जीवाची भरनी.


— बहिणाबाई चौधरी

10 August 2016

पलीकडे ओढ्यावर (माझे घर)

पलीकडे ओढ्यावर
माझे गाव ते सुंदर,
झाडाझुडपांत आहे
लपलेल्रे माझे घर

माझ्या गावातून जाते
चिमुकली हीच वाट,
मला ओढुनिया नेते
माझ्या घराशी ही थेट

पिंपळाच्या झाडाखाली
लहानसे माझे घर,
तुळशीचे वृंदावन
चिरेबंदी ओट्यावर

माझी आई तेथे दारी
माझ्या भावंडांचा मेळा,
घरी गेल्यावर होतो
माझ्या भोवताली गोळा

कमा येते, चंदू येत ो
'भाऊ आला' म्हणत,
मिठी मग सोडवीतो
हातावर खाऊ देत.



— गणेश कुडे

संकल्पना : कु. भक्ती परब, मुंबई