रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

August 22, 2016

वासरू

ओढाळ वासरू रानी आले फिरू,
कळपाचा घेरू सोडुनिया
चित्रकार : राजेंद्र गिरधारी

कानांमध्ये वारे भरुनिया न्यारे,
फेर धरी फिरे रानोमाळ

मोकाट मोकाट, अफाट अफाट,
वाटेल ती वाट धावू लागे

विसरुनी भान भूक नि तहान,
पायांखाली रान घाली सारे

थकुनिया खूप सरता हुरूप,
आठवे कळप तयालागी

फिरू जाता मागे दूर जाऊ लागे,
आणखीच भागे भटकत

पडता अंधारू लागले हंबरू,
माय! तू लेकरू शोधू येई.— अनिल

August 19, 2016

अनंत-स्तोत्र

अनंता, तुझे गोल, तारे तुझे,
तुझें रूप ब्रह्मांड सारें तुझें,
तुझी ही कृती रे मनोमोहना,
अहोरात्र गाई तुझ्या गायना.

तया मूक गानें मना मोहिलें,
जगन्नायका, वेड कीं लाविलें;
नुरे भान, मी स्वाधिकारा भुलें;
भरूं लागलो सूर वेडे खुळे.

मदीं त्या तुझें रूप गाऊं धजें,
स्वयंदीपका दीप दावूं सजें;
न द्यावा जिथे पाय तेथे दिला,
बहू लाजलों भान येतां मला

तुझे लाडके रे, तुझे लाल जे
वृथा स्पर्धण्या त्यांसवें मी धजे;
करोनी दया रे दयासागरा,
क्षमस्व प्रभो, या तुझ्या लेकरा.

अहो भाग्य माझें जरी या सुरीं
सहस्त्रांश त्या गीतिची माधुरीं !
तरी हे त्वदंघ्रीं समर्पी हरी !
रुचो हे तुला स्तोत्र, घे आवरीं.


— भा. रा. तांबे

संकल्पना व संकलन: श्री सुधाकर बागुल, पुणे

गाणे ऐकण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक कराAugust 17, 2016

आनंद

देह, तनू, अन शरीर, काया,
राष्ट्र, मायभू, देशा देऊ l
ध्वज हा अपुला तिरंगा, झेंडा,
नभात, गगनी फडकत ठेवू ll

विहंग, खग, अन पक्षी, पाखरू
होऊन कवटाळू आकाशा l
सविता, रवी सूर्याची किरणे,
झेलून जगती देऊ प्रकाश ll

वृक्ष, झाड अन तरुंसारखी,
देत राहू या सकला छाया l
रडणाऱ्यांना हसवित जाऊ
प्रेम, प्रीती अन देऊन माया ll

श्रम, कष्टाने अन परिश्रमाने
काय हवे ते मिळवित राहू l
घराघरांतून सुखशांतीचे
दिवे, दीप अन दीपक लावू ll

गरीब, दरिद्री, रंक, फाटके
कुणी नसावे धरतीवरती l
मनामनांतून आनंदाला
जिकडे तिकडे यावी भरती l


— अज्ञात

August 16, 2016

सुंदरतेची भेट

झुळझुळ वाहे झरा
तयाचे पाणी हो निर्मळ
संथ वाहते नदी घेऊनि
निळसर निर्मळ जल ll १ ll

ट्याळ वारा वाहवाहता
घेऊनि ताजी हवा
ळ्यांफुलांचा सुगंध संगे
रोज वाहतो नवा ll २ ll

सूर्य देतसे पिवळे सुंदर
सुवर्णरंगी ऊन
निसर्ग गातो निर्मळ गाणे
लख्ख लख्खशी धून ll ३ ll

कुणी शिकवली अशी स्वच्छता
या साऱ्यां दूतांना ?
निसर्ग झाला गुरु तयांचा
दिला पाठ सर्वांना ll ४ ll

जिथे स्वछता तिथे देवता
हेच आमुचे ब्रिद
जीवन निर्मळ, परिसर निर्मळ
हीच आमुची जिद्द ll ५ ll


— विजया वाड

August 12, 2016

माहेर


चित्रकार : राजेंद्र गिरधारी

कापणी

आता लागे मार्गेसर,
आली कापनी कापनी,
आज करे खालेवऱ्हे,
डाव्या डोयाची पापनी !

पडे जमीनीले तढे,
आली कापनी कापनी,
तशी माझ्या डोयापुढे,
उभी दान्याची मापनी.
चित्रकार : राजेंद्र गिरधारी

शेत पिवये धम्मक,
आली कापनी कापनी,
आता धरा रे हिंमत,
इय्ये ठेवा पाजवुनी.

पीकं पिवये पिवये,
आली कापनी कापनी,
हातामधी धरा इय्ये,
खाले ठेवा रे गोफनी.

काप काप माझ्या इय्या,
आली कापनी कापनी,
थाप लागली पिकाची,
आली डोयाले झापनी !

आली पुढे रगडनी,
आता कापनी कापनी,
खये करा रे तय्यार,
हाती घीसन चोपनी.

माझी कापनी कापनी,
देवा तुझी रे मापनी,
माझ्या दैवाची करनी,
माझ्या जीवाची भरनी.


— बहिणाबाई चौधरी

August 10, 2016

पलीकडे ओढ्यावर (माझे घर)

पलीकडे ओढ्यावर
माझे गाव ते सुंदर,
झाडाझुडपांत आहे
लपलेल्रे माझे घर

माझ्या गावातून जाते
चिमुकली हीच वाट,
मला ओढुनिया नेते
माझ्या घराशी ही थेट

पिंपळाच्या झाडाखाली
लहानसे माझे घर,
तुळशीचे वृंदावन
चिरेबंदी ओट्यावर

माझी आई येते दारी
माझ्या भावंडांचा मेळा,
घरी गेल्यावर होतो
माझ्या भोवताली गोळा

कमा सुमा अरु चंदू
भाऊ आला म्हणतात
मिठी मग सोडवावी
हातावर खाऊ देत

— गणेश कुडे

संकल्पना : कु. भक्ती परब, मुंबई

July 28, 2016

पोपट

पोपटा, पोपटा,
बोलतोस गोड,
पण झालास रोड.
खा ना जरा पेरूची फोड,
भाऊ, भाऊ,
बोलतोस गोड
देतोस फोड.
दार उघड आणि मला सोड
भाऊ, भाऊ,
रानात जाईन,
फळे खाईन,
डहाळीवर बसून झोके घेईन.


— सरला देवधर

July 6, 2016

झाडांचं मूल

डोळे उघडून
म्हणालं फूल,
झाडाचं मी
आहे मूल !

अंगावर माझ्या
कपडे रंगीत,
वाऱ्याचं मी
ऐकतॊ संगीत !

फुलपाखरं मला
भेटायला येतात,
भोवती भुंगे
गाणी गातात !
उन्हात मी
मांडतो खेळ,
मजेल जातो
सारा वेळ !

झाडाच्या मी
खांद्यावर बसतो,
आनंदानं मी
गालात हसतो !


— शं. ल. नाईक


ज्येष्ठ बालसाहित्यिक शं. ल. नाईक यांनी स्वतः फोन करून सदर कविता ब्लॉगवर घेण्याची सूचना केली. संकलक त्यांचा आभारी आहे.

April 1, 2016

शांती (प्रार्थना)

सुखी सगळ्यांना ठेव देवराया
मागणे हे आमुचे तुझ्या पाया ll
ठेव आई वडिलांना तू खुशाल
तरी मागू जे ते आम्हां मिळेल ll १ ll

नसो आमुचा सवंगडी कुणी अधाशी
नसो आमुचा सवंगडी कुणी उपाशी ll
दिवा बत्तीला कधि न पडो खंड
आयु लाभू दे घरधन्या उदंड ll २ ll

देवा मला ज्ञान दे, विवेक दे, बुद्धी दे, शक्ती दे, यश दे ll


— साने गुरुजी

March 21, 2016

जीर्ण दुर्ग

'दुर्ग भयकंर जीर्ण पसरला पढुतीं' , जो गतकालीं
शूर साहसी नरसिंहांनीं अपुली वसती केली'
ड्याड्यांमधिं घुमुनि नर्मदा गात यशोमय गीतें
सांगत होती सर्व देशभर सद्य:कर्तव्यातें.

रंगमहालीं शेज फुलांची याच गडावर झाली,
स्वातंत्र्यास्तव अग्नि भडकला राख तयाची केली.
तरवारीची धार देवता हीच जयांची एक,
ब्रीद जयाचें सदा तियेला रुधिराचा अभिषेक.

जीव नव्हे संसार ओतिला स्वातंत्र्यास्तव ज्यांनी,
त्या वीरांचा वास जाहला गतकालीं या स्थानीं.
आतां कोणी क्षुद्र पुजारी देविस पूजायातें
घालित बसतो कुंकुमपूरित चंदन अपुल्या हस्तें,

आणि पिवोनी भांग दुखारी झिंगत वदतो कांहीं
पुर्वकथा निर्विकार चित्तें…हर्षित दोन पयांहीं.
हे काळाचे खेळ, कुठेंही असेच चालायाचे,
त्यास कशाला परि आम्हांला कांहिं न वाटे त्याचें.

एक खुराडें भाडयाचे तें राहूं त्यांत खुशाल
क्षुद्र जिवांना अम्हां कशाला असले रंगमहाल !— बालकवी

March 17, 2016

शिशिर (हिवाळा)

चढली शिशिर ऋतूची कळा
आली सृष्टीवरि अवकळा
सुटले सोसाट्याचे माघामधले वारे
गोठलें हिमाद्रिंत गंगाजल कीं सारें ll १ ll

भरली हरिणांना हुडहुडी
ससेंही देउन बसले दडी
सृष्टीला भरलें हींव, थरथरे अंग
लोपले धुक्यांतच सर्व उषेचे रंगll २ ll

मिटल्या वेलींवरल्या कळ्या
फुलांच्या झडल्या कीं पाकळ्या
उपवनिंचा गेला बहर सर्व ओसरुनी
कोशांतच पडलीं फुलपांखरें मरुनी ll ३ ll

गारठल्या राघू मैना
पसरें फुलाफुलांवर दैना
झाडांची गळली पात, लता भयभीत
कंठातच थिजलें कोकिळमनिचें गीत ll ४ ll


— अनिल (आ. रा. देशपांडे)

संकलन व संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

March 15, 2016

वेडं कोकरु

वेडं कोकरु खूप थकलं
येतांना घरी वाट चुकलं !

अंधार बघून भलतंच भ्यालं
दमून दमून झोपेला आलं !

शेवटी एकदा घर दिसलं
वेडं कोकरु गोड हसलं !

डोकं ठेवून गवताच्या उशीत
हळूच शिरलं आईच्या कुशीत!


— मंगेश पाडगांवकर
संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

February 3, 2016

अरुण

पुर्वसमुद्रिं छटा पसरली रम्य सुवर्णांची
कुणी उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची ?
पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं
हर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगल कालीं.
क्षितिजाची कड सारविली ही उज्जव दीप्तीनें,
सृष्टीसतीनें गळां घातलें कीं अनुपम लेणें ?
हे सोन्याचे, रक्तवर्ण हे, हे पिवळे कांहीं,
रम्य मेघ हे कितेक नटले मिश्रित रंगांहीं .
उदारांतुनि वाहते कुणाच्या सोन्याची गंगा,
कुणीं लाविला विशुद्ध कर्पुररस अपुल्या अंगा ?

अरुण चितारी नभ:पटाला रंगवितो काय ?
प्रतिभपूरित करी जगाला कीं हा कविराय ?
कीं नवयुवती उषासुंदरी दारीं येवोनी
रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनीं ?
दिवसयामिनी परस्परांचें चुंबन घेतात—
अनुरागाच्या छटा तयांच्या खुलल्या गगनांत !
स्वर्गींच्या अप्सराच अथवा गगनमंडलांत
रात्रीला शेवटचीं मंगल गीतें गातात ?
किंवा 'माझी चोरुनि नेली मोत्यांची माला '
म्हणुनि नभ:श्री रुसली, आली लाली गालांला ?

कीं रात्रींचें ध्वांत पळालें, आशेची लाली
उत्साहाशीं संगत होउनि ही उदया आली ?
किंवा फडके ध्वजा प्रीतिची जगता कळवाया,
कीं आपणांवर आज पातली हीच खरी विजया ?
कीं स्वर्गींच्या दिव्यांचे हें फुटले भांडार.
जणूं वाटतें स्वर्गच त्यासह खालीं येणार !
प्रगट जाहलें श्रीरामाचें पुष्पक किंवा हें ?
कीं सोन्याची पुरी द्वारका लखलखतें आहे ?

"तेजानें न्हाणितें जगाला कोण सखे बाई ?
नवल अगाई ! तेजोमय तूं ! तेजोमय मीहि !"
परस्परांना दिशा म्हणाल्या प्रेमळ वचनांनीं
"विरहकाल संपला गा गडे, प्रेमाचीं गाणीं !
या मेघाच्या कुंजामध्यें ही लपली कोण ?
तिला बोलवा पुरे गडे ग ! हा तुमचा मान !
अम्ही गवळणी हृदयरसांनी पूजूं प्रेमाला,
प्रेमकाल हा ! म्हणोत कोणी अरुणोदय याला.
पूर्वदिशेशीं गोफ खेळतो कृष्णगडी बाई !
उधळित सोनें सर्व तयाच्या लागूं या पायीं.
मधुस्मिताने विश्व भरुं ग ! शंकित कां म्हणुनी ?
सर्व सारख्या ? हांसावें मग कोणाला कोणीं ?"
गोफ चालला गगनमंडळीं, रंग नवा आला,
त्यांत लागला कृष्णाचा कर पूर्वेच्या गाला .
विनयवती ती पूर्वदिशा मग अधोवदन झाली,
तों प्रेमाची अद्भुत लहरी वसुधेवर आली!

या प्रेमाच्या लाटेखालीं मस्तक नमवावें,
हें आम्हांला, ब्रह्मांडाला, देवाला ठावें,
परंतु ही बघ भूदेवी तर वेडावुनि गेली,
टकमक पाहत स्वस्थ बैसली या मंगल कालीं !
दंवबिंदुंचा-नव्हे नव्हे ! हा पडदा लज्जेचा—
मुग्धपणाचा, बालपणाचा, कोमल हृदयाचा—
निजवदनाहुनि या प्रौढेनें दूर पहा केला,
योग्यच अथवा, प्रेम न मोजी क्षुद्र लौकिकाला !
प्रेमातिशयें मला वाटतें विसरुनि जाइल ही
प्रिय नाथांचा आगमनोत्सव हा मंगलदायी.
कविते ! तिजला साह्य तूंच हो, तूंही पण वेडी !
परंतु वेडाविण सुटतिल का हृदयाचीं कोडीं ?
जा जा ! आतां लाजु नको ग ! पाहुं नको खालीं !
लाजच अथवा-खुलशिल तूंहि या मंगलकालीं,
या लज्जेनें कविमानस हें होउनियां लोल,
प्रेमचंचले ! प्रेमच तुजवर मग तें उधळील !
प्रेमावांचुनि फेड कशानें प्रेमाची व्हावी ?
हा बघ सविता प्रेमळ भूतें प्रेमानें नटवीं ?

हा प्रेमाचा लोंढा वरुनी आला हो आला
भव्य गिरींनो, निजशिखरांवर झेलुनि घ्या याला.
नील झग्यावर वेलबुटी तो तुमच्या चढवील,
'निगा रखो !' येईल तुम्हांला सरदारी डौल !
कविवाणीचा स्फूर्तियुक्त मग होतां अभिषेक,
तटस्थ होउनि तुम्हांस बघतिल हे सारे लोक !

सुवासिनींनो, वनदेवींनो, डोला ग डोला!
नटवा, सजवा वनमालेला तुमच्या बहिणीला !
वनमालांनो, हळूंच हलवा हा हिरवा शेला,
सूत्रधार हा नभीं उदेला, उधळा सुमनांला !
'जय' शब्दानें आळविण्याला लोकनायकाला
नभोवितानीं द्या धाडुनि ही विहगांची माला !
सरोवराच्या फलकावरतीं स्वर्गाच्या छाया
कुणी रंगवा, कुणी फुलांवर लागा नाचाया !
वेलींच्या वलयांत बसोनी गा कोणी गाणीं,
या झाडांवर त्या झाडांवर हंसत सुटा कोणी.
कुणीकुणी या नदीबरोबर नाचत जा बाई,
प्रपातांतही बसुन गा कुणी मंजुळ शब्दांहीं.
उषःकालच्या सुगंध, शीतल मृदुल मंद वाता !
विहार कर, ये पराग उधळित अवनीवर आतां !
या कोमल रविकिरणांवरतीं स्वर्ग बसुनि आला,
सख्या मारुता, गाउनि गाणीं झोंके दे त्याला !

ऊठ कोकिळा ! भारद्वाजा ! ऊठ गडे; आतां,
मंगल गानीं टाका मोहुनि जगताच्या चित्ता !
सरिते ! गाणें तुझें सुरांमधिं या मिळवीं बाई !
साध्याभोळ्या तुझ्या गायना खंड मुळीं नाहीं !
पिवळीं कुरणें या गाण्यानें हर्षोत्कट झालीं,
गाउं लागलीं, नाचुं लागलीं, वेडावुनि गेलीं !
चराचराच्या चित्तीं भरलें दिव्याचें गान !
मूर्त गान हें दिव्य तयाला गाणारें कोण ?
दिव्य गायनें, दिव्य शांतता, दिव्याचे झोत,
वसुंधरेच्या अरुण ओतितो नकळत हृदयांत !
त्या दिव्याने स्वर्भूमीचें ऐक्य असें केलें;
त्या दिव्यानें मांगल्याचे पाट सुरु झाले !
मंगलता ती दिव्य कवीला टाकी मोहोनी,
वाग्देवीनें सहज गुंफिलीं मग त्यांचीं गाणीं.— बालकवी

January 14, 2016

वारूळ

वारूळ वारूळ मुंग्यांचें वारूळ
कृमी-कीटकांनी बांधिलें देऊळ.
मृत्तिकेचे कण एकेक घेऊन
स्वतंत्र, दुर्गम बांधिलें भुवन ll १ ll

तुफान वाऱ्याला ऊन पावसाला
द्यावया आव्हान बांधिलें कष्टून.
आणि कण कण जमविलें अन्न
कष्टाळू भंगूर क्षणायू जीवन ll २ ll

परंतु जीवांनो, तुम्ही वारुळांत
जीवनाचें सुख आहांत भोगीत.
असेल लाभत मायेचा उबारा
आणिक संकटी मित्रांचा निवारा ll ३ ll

स्वातंत्र्याचे वारे तुम्ही सेवणारे
तुम्हां कोण म्हणे दुर्बळ बिचारे !
तुमच्या मनाचे तुम्ही मुखत्यार
वारुळांत तुम्ही स्वत:च ईश्वर ll ४ ll

वारुळांत नसे शत्रूंना प्रवेश
सत्कारार्थ त्यांच्या लक्षावधी दंश.
परी कधीं येतां सर्पाचें संकट
दुर्बळांना येई सामर्थ्य अफाट !ll ५ ll

कोट्यावधी जीव पडती तुटून
लक्षावधी जीव जाती चिरडून.
स्वातंत्र्याचें अंगी संचरोनी वारें
हटविती अंती सर्पांना माघारे ll ६ ll


— श्रीकृष्ण पोवळे

संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

January 4, 2016

कृतज्ञता

पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !

ताप त्याने भरताच तडफडावे;
पाखराने एकले फडफडावे
ह़ळू गोंजारी सेविका दयाळू;
डाक्तराचे वच शांतवी कृपाळू.

कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न,
कुठे डोळे लावून बसे खिन्न;
आणि डाक्तर येतांच गोंजराया
हाय ! लागे तो घळघळा रडाया !

एक दिन तो व्याकूळ फार झाला
आणि त्याने पुसिले डाक्टराला -
"अतां दादा, मरणार काय मी हो ?"
तोंच लागे अश्रुची धार वाहो !

हृदय हेलुनी डोळ्यात उभे पाणी,
तरी डाक्तरची वदे करुण वाणी;
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजारुन शांतवून जाई.

रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास अतां ताण
हळूच बोलावी बाळ डाक्तराला
तोहि धर्मात्मा धांवुनीच आला

अतां बाळाला टोचणार, तोच
वदे वासुन पांखरू दीन चोंच -
"नको आता ! उपकार फार झाले !
तुम्ही मजला किती...गोड...वागविले !

भीत... दादा... मरणास... मुळी... नाही !
तू...म्ही...आई...!!" बोलला पुढे नाही !
झणी डोळे फिरविले बालकाने
आणि पुशिली लोचनी डाक्तराने.


— शंकर केशव कानेटकर (कवी गिरिश)

संकल्पना : श्री किरण भावसार, वडांगळी, सिन्नर