A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

20 February 2015

जग-रहाटी

जगा ! तुझी सारी तऱ्हा सदा उफराटी !

एक तरी बागेंतील
फूल कौतुकें देशील
बाळगिली आशा फोल ,
अतां पुष्पराशीमाजीं बुडे मात्र ताटी !

आपुल्याच जातां पायीं
पाडियलें ठायीं ठायीं;
केव्हढी ही आतां घाई—
चालविती द्याया खांदा; मिरविती हाटीं.

फुकटचा शब्द गोड
बोलला न कोणी धड
उठविलीं निंदा-झोड
स्मशान हें निनादतें अतां स्तुति-पाठीं

साद कुठें येईल का
ह्याच अपेक्षेनें एका
तुडविलें तिन्ही लोकां
मिठ्या कलेवरा द्याया अतां आप्त-दाटी.

हयातींत आगडोंब
विझविण्या एक थेंब
मिळाला न; आतां कुंभ—
किती रिकामे हे होती तिळांजलीसाठीं.

उभविला स्नेह-गाथा
पाचोळाच आला हातां,
खिळे-ठोक झाली माथां,
अस्थिंवरी देवालयें अतां नदीकांठीं.

मिळावया ऊब कोठें
झिजवितां उंबरठे
दार बंद जेथें तेथें ;
धूपारती शेजारती अतां दिनरातीं !

सतावून यावज्जीव
ओलांडतां आतां शीव
दाखविती प्रेम-भाव;
परिमार्जनाची धन्य तुझी ही रहाटी !


— यशवंत (२४ जून १९३३)



'पाणपोई' या निवडक कवितांच्या संग्रहामध्ये 'साद कुठें येईल का…' हे कडवं 'फुकटचा शब्द गोड….' च्या आधी घेतलं आहे पण "यशोगंध" या मुळ संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत मात्र 'फुकटचा शब्द गोड….' हे कडवं आधी आहे.

बाप

चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई
शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप

लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पाई
त्यानं काय केलं पाप ?

माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्या हाती
दुसऱ्याच्या हाती माप

बाप फोडतो लाकडं
माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करी हापाहाप !


— इंद्रजीत भालेराव

खोप = झोपडी; झाप = काटेरी झुडुपांपासून बनवलेले दार; लेतो = अंगावर घालतो;
पाचट = ऊसाची वाळलेली पाने; पाई = पायात

16 February 2015

मातृभूमीस वंदन

[जाति : धवलचंद्रिका]

वंदन तुज मायभूमि ! हें अखेरचें !
न कळे तव दर्शन कधिं फिरुन व्हायचें ! ll धृ ll

विसकटली बसवावी फिरुन ती घडी
तव काजीं झिजवावी शक्य तों कुडी
आशेची फोल परि भ्रमुनि वावडी
देशोधडिं लागे ही आज बापुडी
आंचवलों जननीच्या सौख्यकारणा
आंचवलों तेंविं तुझ्या क्लेशवारणा
काय म्हणूं परिसमाप्ति ही तुला रुचे ?
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll १ ll

यश मळलें, उजळाया फिरुन त्याप्रती
तळमळलों धडपडलों निशिदिनीं किती
परि भूवरि पाय कुणी टेकुं ना दिला
काकांचे जेविं थवे भ्रष्टल्या पिला
काडीचा आधारहि मानिला महा
झाली परि फसवणूक नित्य दुस्सहा ll २ ll

मान उंच करु पाहे कोंवळी कळी
धडगत लागेल तिची केंविं वादळी ?
झिडकारुनि दिधलें जें लेकरु तुवां
टाकलास ज्याचा तूं तोडुनी दुवा
तरि त्याच्या नच खळती अश्रु नेत्रिंचे
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll ३ ll

मरणाच्या दाढेमधिं चाललों जरी
मरणाच्या भीतिचा न लेशही उरीं
मरणाच्या खाईमधिं आयु कंठलें
मरणाचें काय तया बुजग-बाहुलें ?
ग्रीष्माचा दाह काय वाळल्या तृणा ?
राखेला जाळिल का अग्नि तो पुन्हां ?
परि तुझी न भेट मला व्हायची पुढें
ह्या शल्ये हें तुटतें मात्र आंतडें
मिळणार न अंत्य शयन गे त्वदंकिंचें
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll ४ ll






"बंदिशाळा" या खंडकाव्यातील हे गीत असून त्याच्या पहिल्या आवृत्तीत धृवपदात 'मायभूमि' व त्याच्या पुनरावृत्तीत 'मातृभूमी' पण तिसर्‍या आवृत्तीत मात्र सर्व ठिकाणी 'मायभूमि'असा शब्द आहे. कवीच्या "पाणपोई" या संग्रहात सगळ्या कडव्यात 'मायभूमि' हाच शब्द आहे पण कवितेचे शीर्षक मात्र "मायभूमीस अखेरचे वंदन" असे आहे.

14 February 2015

सुंदर माझी शाळा

सुंदर माझी शाळा हो
सुंदर माझी शाळा ll धृ ll

शाळेभोवती सारी झाडं
रक्षण करण्या आम्ही पुढं
रोज आम्हाशी बोलतसे हा
भिंतीवरचा फळा ll १ ll

शिक्षण द्याया गुरुजन दक्ष
शाळेत असते आमुचे लक्ष
गावोगावच्या मुलांमुलींना
लावितसे ही लळा ll २ ll

स्वच्छ आमचा परिसर सारा
शुद्ध मोकळा इथला वारा
खेळ खेळण्या मैदानावर
होतो आम्ही गोळा ll ३ ll

ज्ञानप्रकाशे आम्ही उजळतो
शिस्तीचेही धडे गिरवतो
शाळेमधल्या संस्कारांनी
फुलतो जीवनमळा
सुंदर माझी शाळा ll ४ ll


— शं. ल. नाईक

10 February 2015

आनंदाने नाचूया !

चला गड्यांनो खेळूया !
आनंदाने नाचूया ! ll

बाग चिमुकली, फुले उमलली,
सुंदर फुलली,
फुलांसारखे होऊया,
फुलांभोवती नाचूया ll

फुलांभोवती, भुंगे फिरती गाणी गाती,
तसेच आपण गाऊया,
ताल धरोनी नाचूया ll

आभाळाचे तऱ्हेऱ्हेचे,
रंग मजेचे,
चला चला रे पाहूया
आनंदाने नाचूया ll


— के. नारखेडे
गाणे (ध्वनिमुद्रण) ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.चला गड्यांनो खेळूया

9 February 2015

पेपर

रोज सकाळी चहा पितांना
हवा चवीला खरपुस पेपर,
चेतावितो जो विश्वचि सारें,
विरघळतो जो पापण्यांचवर;

कामाला जातांना अमुची
ज्यांत शिदोरी, जंतरमंतर;
गर्दीमध्यें, क्यूमध्यें जो
जनां-मनांतिल सरकवि अंतर.

रविवारी पण दे रे, बाप्पा,
पेपर कांहीं दुजा नवीन;
'शकुंतला' जो नाचनाचवी,
हिरोशिमाला जोडि हिरॉइन;

पडल्या पडल्या बिछान्यावरी
नवलाईच्या गोष्टी सांगुनि,
वृत्ती खुलवी दीन, हावर्‍या;
शिळ्या कढीला देई फोडणी.


— पुरुषोत्तम शिवराम रेगे

शेतकींतील सुख

[जाति - केशवकरणी ]

पूर्व-पश्चिमा खळाखळांतुनी वाहे जलवाहिनी
मांडवी अमुची मंदाकिनी
दूर डोंगरासमीप अगदीं तीच्या तीरावरी
आमुची जमीन वतनी बरी
भरदार शिवारामधें पिकें दाटलीं
उगवत्या भानुची प्रभा नभीं फांकली
बांधावर गवतें हिरवी फोंफावलीं
वनलक्ष्मीचें अभिनव वैभव उतास जणुं चाललें
खगांनीं तत्स्वागत गायिलें ll १ ll

सृष्टिसतीच्या आनंदाच्या प्रसन्न उत्सवदिनीं
शिवारामधें गात येउनी
वरुणकृपेचा विलास ऎसा पाहुन मनमोहन
वाटलें चित्तीं मजलागुन
कोपर्‍यावरिल त्या आम्रतरुच्या तळीं
मृदु तृणांकुराची मखमल गादी भली
बुंध्यास टेकुनी, चक्रवर्ति जणुं बळी,
भूक लागतां चटणी किंवा कांदा अन भाकर
खाउनी द्यावी वर ढेंकर ll २ ll

धुमाळ-बाळा जोडी घेउनि मोट धरावी कधीं
करावी राखण मळणी कधीं
रास घालुनी डोळे भरुनी संतोषें पाहुनी
निजावें वाकळ मग पसरुनी
वर चंद्रतारकामंडित तें अंबर
पायथ्यास पडुनी वाघ्या करि गुर्गुर
वाजती गळ्यांतिल बैलांचे घुंगुर
लाख पटींनी हें न सुखद का कृषिकर्मी राबणें!
नको तें परवशतेचें जिणें! ll ३ ll


— यशवंत