रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

January 28, 2015

गुलामाचें गाऱ्हाणें

[वृत्त - श्यामला*]


जूं बैसलें मानेवरी                       चाबूक हा पाठीवरी
ह्या कर्दमी मार्गावरी                    चौखूर धांवावें परी ll १ ll

हांकावया जो बैसला                   सत्तामदें तो झिंगला
माया दयेची आर्द्रता                    नाहीं तयाच्या अंतरीं ! ll २ ll

मागें रथामाजीं घनी                   थुंकी तयाची झेलुनी
त्वेषें लगामा खेचुनी                   आसूड ने खालीं वरी ll ३ ll

धोंड्यावरी ठेचाळतां                    खांचेंत पायीं मोडतां,
उंचीवरी संथावतां                        ते कोरडे अंगावरी ll ४ ll

विघ्नामधोनी वांचवा                   कर्तृत्व सारें दाखवा
या हांकणाराच्या नसे                   पर्वा तयाची अंतरीं ll ५ ll

त्या बक्षिसाच्या पोतड्या              हांसून मोतद्दार घे
माझ्या तनूच्या चिंधड्या              कोणीहि पाहेना परी ! ll ६ ll

धावूं किती रे मालका ?                 होसी दयेला पारखा
किंवा तुझी इच्छाच का                 जावें फुटोनी म्यां उरीं ? ll ७ ll


— यशवंत (२-६-१९२३)

* कविच्या "पाणपोई" या संग्रहात 'श्यामला' असे वृत्तानाम तर "यशोधन" च्या दुसर्‍या आवृत्तीत 'मंदाकिनी असे दिले आहे. तसेच याच संग्रहात दोन ठिकाणी 'परी' हा शब्द र्‍हस्व दिल्याने छंदोभंग झाला आहे.

January 16, 2015

कणभर तीळाची मणभर करामत

वाटाणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालले टणाटणा
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेहीजण,
तीळा तीळा, कसली रे गडबड?
सांगायला वेळ नाही थांबायला वेळ नाही...

तीळ चालला भरभर, थांबत नाही पळभर
वाटेत लागले ताईचे घर,
तीळ शिरला आत, थेट स्वैयंपाकघरात,
ताईच्या पुढ्यात रिकमी परात
हलवा करायला तीळ नाही घरात!
ताई बसली रुसुन, तीळ म्हणाला हसुन
घाल मला पाकात, हलवा कर झोकात!
ताईने घेतला तीळ परातीत,
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हलवीत,
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा फुटाणा गेले घाबरुन
पण तीळ पहा कसा ?
हाय नाही हूय नाही, हसे फसा फसा!!

वटाणा फुटाणा पाहिलेत ना?
एव्हढासा म्हणून हसलात ना?
कणभर तीळाची मणभर करामत.

- अज्ञात


January 12, 2015

सरितेचें चरित

करिते का कधिं खंत
सरिता करिते का कधिं खंत ? ll ध्रु ० ll

रांगत लोळत दौडत घोळत
कडेकपारींतुनी खळाळत
                       आक्रमिते निज पंथ ll १ ll

फुलो चांदणें, असो ग्रीष्मदिन
असो तमिस्त्रा ढगाळ भीषण
                    समान शिशिर वसंत ! ll २ ll

कुणीं आणिली घागर मृण्मय
पखाल किंवा कलश हिरण्मय
                            पहावया न उसंत ll ३ ll

करोत मज्जन रूप-यौवना,
दुर्जन, सज्जन, जरठ, अंगना
                         असो रंक धनवंत ! ll ४ ll

करोत कोणी अस्थि-विसर्जन
ताबुत किंवा देव गजानन;
                        स्वागतशील उदंत ! ll ५ ll

मरुभूमींतुन दहनभूमींतुन
गात चालली एकच गायन
                       'करुं जग शोभावंत !' ll ६ ll

भेदभाव परि निर्मुनि; मानव
होई दानव; तरंगिणी लव
                           गणी न हंस तरंत ll ७ ll

असें संतसम जीवित आंखुन
आसमंत ही करीत पावन
वरितें सिंधु अनंत
            सरिता विश्रुत-चरित दिगंत. ll ८ ll


— यशवंत (१-३-१९३६)

यशवंत यांच्या निवडक कवितांचा "पाणपोई" या संग्रहातील 'अनुक्रमणिकेत' या कवितेचे शिर्षक 'सरितेचें चरित' असे असून पृष्ठ क्र. ९९वर 'सरितेचें चरित्र' असे आहे. मुळ "यशोनिधी" या संग्रहातली हि कविता १९३६ च्या 'ज्योत्सना' या अंकात 'सरितेचें जीवित' या शीर्षकासह प्रसिद्ध झाल्याचे '"आठवणीतल्या कविता" या संग्रहात नमूद केलेले आहे.

January 10, 2015

स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा

[वृत्त : वियदगंगा]

ऱ्याखोऱ्यांतला आला कवी हा खास दर्बारा
मराठ्यांच्या महालक्ष्मी, तुला घे शाहिरी मुजरा
जगाचा मानितों स्वामी स्वत:ला मी महामानी
तुझ्या धामीं तुझ्या कामीं परंतु दास हा मानी
असें शास्ता जनांचा मी परी माई तुझां भाट
दिपावें विश्व वाणीनें, इथें कां दावुं तो थाट
नभींच्या तारकाराशी पदाघातें झुगारीन
परि स्वातंत्र्यलक्ष्मी गे ! तुझ्या पायीं सदा लीन

जिजाऊचा स्वतेजाचा, शिवाजीचा स्वशौर्याचा
मराठ्यांच्या दरार्‍याचा, तसा तो स्वाभिमानाचा,
क्षणार्धीं चित्तचक्षूना दिसाया लागला काळ
स्वराज्यीं जेधवां भाला जहाला नांगरी फाळ
नभाला चुंबिता झाला अतां तो मोडला भाला
परंतू वाव येथें हा तयाच्या शेष तेजाला
भिनूं दे माझिया रोमीं तयाचें थोडकें तेज
जनां देईन सांगोनी नसे प्यालों कधीं पेज

इथें संचारतें वारें, थरारे स्पर्शनें अंग
अहाहा ! जाहली वृत्ती समाधीमाजिं त्या गुंग !
झणीं बोला मला आज्ञा त्वरें सोडीन ललकारी
पुन्हा लावीन नाचाया महाराष्ट्रीं दर्‍याखोरीं
जहाला नांगराटीचा विखारी पूर्विंचा भाला
अतांच्या लेखणींतूनी नवा आणीन जन्माला

समाधी लागली आहे म्हणोनी तोंवरी बोल
मराठ्यांच्या यशोगानीं मनानें स्फूर्तिनें डोल
तनूचें भान जावोनी बनूनी शून्य त्या नजरा
पडूं दे माउली खालीं तुझ्या वेणींतला गजरा
यशाचा कौल मानोनी मुदें सोडीन दर्बारा
मराठ्यांच्या महालक्ष्मी, तुला घे शाहिरी मुजरा


— यशवंत (३०-११-१९२१)


यशवंत यांच्या निवडक कवितांचा "पाणपोई" या संग्रहात या कवितेचे वृत्त 'विजयगंगा" असे असून "आठवणीतल्या कविता" या संकलीत संग्रहात ते 'वसंत असे नमूद केलेले आहे.