A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

2 December 2015

मनीषा

सहज मिळे त्यांत जीव तृप्तता न पावे
जें सुदूर, जें असाध्य, तेथें मन धांवे !
भेदुनिया गगनाला
लखलखते जी चपला
तेज तिचें वाटे हृदयीं कवळावें !
पर्वत जो उंच उभा
चुम्बितसे नील नभा
शिरिं त्याच्या कीं सलील वाटे विहरावें !
सांध्यमेघ सोनेरी
विलसति जे क्षितिजावरि
गमतें की सुंदर त्या मंदिरीं रहावें !
रजनीच्या कृष्णपटीं
नक्षत्रें झगमगतीं
भव्य दिव्य वैभव तें वाटे भोगावें.
जेथ बुद्धि, जेथ धीर
जें अथांग, जें गभीर
हृदयीं त्या अवगाहन वाटतें करावें !


— शांता शेळके

21 November 2015

इथें

(जाति : समुदितमदना)

आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज साउली,
मृदुल, कोंवळी, श्यामल हिरवळ पसरे पायांतळी
आणिक पुढतीं झरा खळाळत खडकांतुन चालला,
साध्या, भोळ्या गीतामध्यें अपुल्या नित रंगला !

कांठी त्याच्या निळीं लव्हाळीं, डुलती त्यांचे तुरे,
तृणांकुरांवर इवलालीं हीं उडतीं फुलपांखरें !
खडा पहारा करिती भंवतीं निळेभुरे डोंगर,
अगाध सुंदर भव्य शोभतें माथ्यावर अंबर !

दुर्मिळ ऐशी देइ शांतता सदा मला हें स्थल,
ऎकुं न येई इथें जगाचा कर्कश कोलाहल.
व्याप जगाचा विसराया मी येइ इथें सत्वर,
अर्धोन्मीलित नयनीं बघतें स्वप्नें अतिसुंदर.

शांतविलें मी तप्त जिवाला इथें कितीदां तरी;
कितीदां यावें तरी येथली अवीट ही माधुरी !


— शांता ज. शेळके

16 November 2015

दीपज्योतीस

सोन्याची तनु जाळितेसे अपुली पाषाणमूर्तींपुढें,
मुग्धे ! तें वद कोण पुण्य तुझिया हातास तेणें चढे ?
सारें विश्व बुडे तमांत तिकडे भांबावुनी बापुडें,
गे ! निष्कंप, तुला परंतु इकडे, ही ध्यान-मुद्रा जडे. ll १ ll

घ्याया कोंडुनि, मंदिरांत जगदुद्यानीं न तूं जन्मली,
वायां नासुनि जावया उगवली बागेंत चांफेकळी !
व्हाव्या वर्धित वस्तु ज्यांत वसतें सौंदर्य अत्युत्कट,
इच्छा केवळ कीं ! न वस्तुसह तें पावो जगीं शेवट. ll २ ll

प्रत्यंगीं अवघ्या प्रकर्षभर ये ज्यांच्या पुरा मोडुन
त्यांच्या पूर्णपणास सुस्थिरपणा येथें न अर्धक्षण;
पूर्णोस्थापनकाल तोच पतनप्रारंभही होतसे,
ऐसा निष्ठुर कायदा — सकल या सृष्टीस शासीतसे ! ll ३ ll

येथें नूतनजीर्ण, रूप अथवा विद्रूप, निचोत्तम,
न्यायान्याय, अनीतिनीति, विषयीं संभोग का संयम;
जातीं हीं भरडोनि एक घरटीं, एकत्र आक्रंदत,
आशा भीतिवशा म्हणूनिच मृषा स्वर्ग स्त्रजी शाश्वत. ll ४ ll

हें वैषम्य असह्य 'होतसमयीं' स्थापावया साम्यता,
तेजोवंत यदा यदा त्यजुनि ती प्रेतोपमा स्तब्धता;
अन्यायप्रतिकारकार्य करिती नाना प्रकारांतरें,
दारीं बंड ! घरांत बंड ! अवघें ब्रह्मांड बंडें भरे ! ll ५ ll

हें लोकोत्तर रूप, तेज तुजला आहे निसर्गें दिलें,
कीं तूं अन्य तशींच निर्मुनि जगा द्यावींस कांहीं फलें;
दानें दे न कुणा निसर्ग ! धन तो व्याजें तुम्हां देतसे,
तें त्यांचें ऋण टाक फेडुनि गडे ! राजीखुशीनें कसें ! ll ६ ll

होतां वेल रसप्रसन्न फुटुनी येतो फुलोरा तिला,
ती आत्मप्रतिमांस निर्मुनि हंसे संहारकालानला;
'वाढा आणि जगा' निसर्ग म्हणतो सृष्टीस भूतात्मिका,
डोळ्यांनीं उघ​ड्या पहात असतां होशी गुन्हेगार कां ? ll ७ ll


— बी

झाड म्हणतं धारा दे

झाड म्हणतं धारा दे
वासरू म्हणतं चारा दे
सृष्टीमधल्या चराचराला
देवा, सौख्य निवारा दे.

नदी ओहळा पाणी दे
वन-वेळुंना गाणी दे
अखंड वादळ नको ईश्वरा,
झुळझुळणारा वारा दे.

तृणकोंबांना प्रकाश दे
नवांकुरांना विकास दे
दुष्काळाची नको गर्जना,
सृजना सर्व शिवारा दे.

उन्मेषाला सुस्वर दे
सत्यशिवासह सुंदर दे
विकासगतीला प्रत्येकाच्या
सदैव फिरता फेरा दे.

मांगल्याचे गाणे दे
सौभाग्याची वाणी दे
चिरंतनाच्या विश्रांतीला,
तुझ्या पदाशी थारा दे.

— रवींद्र भट

ह्या कवितेचे शिर्षक वेगळे असू शकते. कुणाला माहित असल्यास कळवावे. 

संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

10 November 2015

दूर दूर माझे घर

दूर दूर माझे घर जोगाईच्या पलीकडे !
पाठ राखती तयाची डोंगराचे उंच कडे !
दूर दूर माझे घर गर्द राईच्या पल्याड,
घुमतसे कानी माझ्या राघू, कोकिळेची साद !
दूर दूर माझे घर वाट आडवळणाची,
मधे जमलीसे गर्दी किती ओहळ-नाल्यांची.
दूर दूर माझे घर आजोबाने बांधलेले,
जरी जुनाट पडके, गणगोत सांभाळले.
दूर दूर माझे घर शेत इवले शेजारी,
पिकवितो बाप माझा तिथे जोंधळा बाजरी.
दूर दूर माझे घर घरी निजविते आई,
मज दळण दळता गात गोडशी अंगाई.
दूर दूर माझे घर घरी बहीण सानुली,
बोलाविते खेळायाला तिजसंगे भातुकली. 
दूर दूर माझे घर घरी शेळी, गाय, बैल,
कधी रुसते, पेटते तीन दगडांची चूल.
दूर दूर माझे घर तिथे कधी सणावारी,
उडे धमाल गाण्यांचीनाचण्याची रातभरी !
दूर दूर माझे घर उभे चांदीच्या रसात,
राखणीस रातकिडे किरकिरती जोसात !

 

— ना. ध. पाटिल

संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

4 November 2015

छोटेसे बहिण-भाऊ

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll

ओसाड उजाड जागा,
होतील सुंदर बागा
शेतांना, मळ्यांना, फुलांना फळांना,
नवीन बहार देऊ ll १ ll

मोकळ्या आभाळीं जाऊ,
मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंदभराने,
आनंद देऊ अन घेऊ ll २ ll

प्रेमाने एकत्र राहू,
नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे,
अनेक एकत्र होऊ ll ३ ll


— वसंत बापट

14 October 2015

राज्याभिषेक गीत

भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा ॥
शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ॥ध्रु॥

संतत तव कांत शांत राजतेज जगिं विलसो ॥
धर्मनीति शिल्पशास्त्र ललितकला सफल असो ॥
सगुणसागरा, विनयसुंदरा ॥१॥

नीतिनिपुण मंत्री तुझे तोषवोत जनहृदंतरा ॥
सदा जनहृदंतरा ॥
राजशासनीं प्रजाहि विनत असो शांततापरा ॥
असो शांततापरा ॥२॥

समरधीर वीर करुत कीर्तिविस्तरा ॥
पुत्र पौत्र सुखवुत तव राजमंदिरा ॥
सौख्यपूर्ण दीर्घ आयु भोग नृपवरा ॥३॥
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥


— अज्ञात

13 October 2015

अंगाई गीते

बोल बाई बोल ग । तुझ्या बोलाचें काय वाणुं मोल ग ।
डोल बाई डोल ग । जाईजुईचीं लाख फुलें तोल ग ।
हांस बाई हांस ग । माझ्या अंगणीं माणिकांची रास ग ।
नीज बाई नीज ग । गाई अंगाई काऊचीऊ  तूज ग ।
O
या बाई या । बकुळिच्या झाडाखालीं फुलें वेंचूं या ।
उन पडलें । पानफुल दिसे कसे गोडगोडुलें ।
गोडगोडुलें । मोतियांचे दाणे कोणीं खालीं पाडिले ? ।
रान हाललें । पहांटेला शुकदेव गाणें बोललें ।


— बालकवी

3 October 2015

भक्तांचिया लोभा

भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिले l उभेचि राहिले पंढरीये ll १ ll

कनवाळु उदार तो हा श्रीहरी l जडजीवा उद्धरी नामें एका ll २ ll

बांधियेले ब्रीद तोडर चरणीं l त्रैलोक्याचा धनी पंढरीये ll ३ ll

चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल l नलगे काळ वेळ नाम घेतां ll ४ ll


चोखामेळा

26 September 2015

सकाळ

आली लाजत आज सकाळ
मेंदी भरल्या चरणी बांधुन
सोन फुलांचे चाळ...

किरणांचे भुरभुरते कुंतल
निळसर शुभ्र धुक्यांचा अंचल
शुभ्र कोवळ्या दवबिंदूंची
गळ्यात मोहन माळ...

ही येता किणकिणला कणकण
रोमांचित थरथरला क्षण क्षण
लहरत गेली मधुर एक स्वर
लकेर रानोमाळ...

दरवळला वार्‍यावर परिमल
दुनिया गमली अलका स्वप्निल
मुक्त हासले क्षणभर आणिक
जीवन हे खडकाळ...


— उ.रा. गिरी

7 September 2015

चिऊताईचीं पिलें

अहा ! सोनुकलीं सान पिलें छान
जुळीं भावंडे एक, दोन, तीन
शेरारीच्या उबदार बिछान्यांत
माऊलीला बिलगून झोपतात ll १ ll

नसे यांना मुळीं काळजी कशाची
कोणतेंही नच दु:ख यांस जाची
बाप चारा आणून देइ गोड
माय पुरवी दररोज नवें कोड ll २ ll

असे तुमचें घरकूल उंच उंच
नका बाळांनों ! डोकवूं उगाच
तोल जाउन जर खालतीं पडाल
पंख इवले— त्यांनीं कसे उडाल ? ll ३ ll

दिवस कांही घ्या थोडका विसावा
जोर येइल पंखांत खूप तेंव्हां
स्वच्छ होइल आभाळ उजेडून
गात चिंव, चिंव, चिंव ! भुर्र जा उडून ll ४ ll


— भवानीशंकर पंडित

5 September 2015

मी कोण?

आई बाबांचा 'बाळ'
असे एकटा लडिवाळ ll १ ll

काका काकू पण मजला
'पुतण्या' म्हणती तीं अपुला ll २ ll

आत्या, मामा नि मामी
म्हणती त्यांचा 'भाचा' मी ll ३ ll

आजी आजोबा दोघेजण
सांगती तू 'नातू' म्हणून ll ४ ll

विचारिलें जों ताईला
'भाऊ माझा' म्हणे मला ll ५ ll

'सुशी' आमुची सोनुकली
'दादा' मज हांका मारी ll ६ ll

मामांचा वसंत आला
प्रश्न तयाला मी केला— ll ७ ll

असें तुझा तरी मी कोण ?
तो बोलें मज हासून — ll ८ ll

'आतेभाऊ' तू माझा
पण मी 'मामेभाऊ' तुझा ll ९ ll

निरनिराळीं मज नांवें
कां ऎशीं ते सांगावें ll १० ll


— ग. म. वैद्य

31 August 2015

थेंबा, थेंबा येतोस कोठून ?

"थेंबा, थेंबा कोठून येतोस ?
कोठे जातोस ? कोठे राहतोस ? "

"बाळ, मी लांबून येतो, उंचावरून येतो
आणि जमिनीच्या पोटात शिरतो ."

"थेंबा, थेंबा खरं खरं सांग—
कोठून येतोस, कोठे जातोस ?"

"मी जमिनीवरून वर जातो,
आकाशातून खाली येतो .
खाली नि वर,
वर नि खाली,
येतो नि जातो,
जातो नि येतो ."

"अरे, आकाशातून येतोस,
हे तर खरं आहे;
पण खालून वर जातोस कसा?"

"उन्हाळ्यात फार ऊन पडतं ना ?
मग आम्ही खूप खूप तापतो.
वाफ होऊन आम्ही वर जातो.
वर जाऊन खूप खेळतो .
इकडून तिकडे, तिकडून इकडे
धावतो, पळतो,
डोलतो, लोळतो.
मग खाली येतो.

आम्ही नसलो तर
नद्या, नाले आटतील.
तळी, विहिरी आटतील.
शेते सुकतील.
मग खाल काय ? प्याल काय ?"

"खरंच भाऊ, किती तुझा उपयोग ! "


— ताराबाई मोडक

गाणे ऐकण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
थेंबा, थेंबा कोठून येतोस?

लढा वीर हो लढा

लढा वीर हो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा हिमालयाचा कडा कडा

शेजार्‍यांचे शूर शिपाई
सीमारेषा पुसुनी पायी
लुटु पाहती तुमची आई
त्या ढोंग्यांच्या मुसक्या बांधा, भ्याडा हाती भरा चुडा

काल बिलगले भाऊ म्हणुनी
आज शांतीला दुर्बल गणुनी
काढु पाहती मूळच खणुनी
तोडा त्यांचे हात अडाणी, कबंध तुडवीत चढा चढा

रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी
हटवा मागे पिशाच्‍च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा


— ग. दि. माडगूळकर

29 August 2015

आईसारखे दैवत

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई


— ग. दि. माडगूळकर

घड्याळबाबा

ड्याळबाबा भिंतीवर बसतात,
दिवसभर टिक टिक करतात.

ठण ठण ठोके देतात आणि म्हणतात,
"मुलांनो, सहा वाजले, आता उठा."
"मुलांनो, आठ वाजले, आंघोळ करा."
"मुलांनो, दहा वाजले, आता जेवण करा ."
"मुलांनो, अकरा वाजले, आता शाळेत जा ."

आम्ही रोज घड्याळबाबांचे ऎकतो,
पण रविवारी काहीच ऎकत नाहि.

ते म्हणतात, "सहा वाजले, उठा."
आम्ही सात वाजता उठतो.
ते म्हणतात, "आठ वाजले, आंघोळ करा."
आम्ही नऊ वाजता आंघोळ करतो.
ते म्हणतात, "दहा वाजले, जेवण करा."
आम्ही अकरा वाजता जेवण करतो.

आणि रविवारी तर शाळेला सुट्टीच असते.

मग घड्याळबाबा खूप रागावतात,
जोरजोरात ठण ठण ठोके देतात.

पण रविवारी आम्ही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही,
बाघितले तरी फक्त हसतो आणि खेळत रहातो.



— कुसुमाग्रज

ताजी भाजी

मी आणली भाजी
ताजी ताजी भाजी .

छान छान काकडी
हिरवी हिरवी अंबाडी.

मी आणली भाजी
ताजी ताजी भाजी.

आजी ग आजी
कर ना ग भाजी.

— अज्ञात कवी 

28 August 2015

या भारतात बंधुभाव

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे । दे वरचि असा दे ।
हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे । मतभेद नसू दे ॥ धृ o॥

नांदतो सुखे गरिब-अमिर एकमतानी । मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी ।
स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे । दे वरचि असा दे ॥१॥

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना । हो सर्वस्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना ।
उद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे । दे वरचि असा दे ॥२॥

हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही । अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी ।
खळनिंदका–मनीही सत्य न्याय वसू दे । दे वरचि असा दे ॥३॥

सौंदर्य रमो घरा-घरांत स्वर्गियापरी । ही नष्ट होऊ दे विपत्ति भीती बोहरी ।
तुक​ड्यास सदा या सेवेमाजी कसू दे । दे वरचि असा दे ॥४॥



— राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


3 April 2015

दे

ढगा, ढगा,
पाऊस पाड, पाणी दे !
पक्ष्या, पक्ष्या,
सुंदर सुंदर गाणी दे !

वार्‍या, वार्‍या,
तुझ्यासारखं झुलू दे !
फुला, फुला,
तुझ्यासारखं फुलू दे !

मोरा, मोरा,
तुझ्यासारखं नाचू दे !
राना, राना,
हिरवं पुस्तक वाचू दे !

झाडा, झाडा,
उन्हात तुझी छाया दे !
आई, आई,
कुशीत घेऊन माया दे !


— मंगेश पाडगांवकर

10 March 2015

गरगर गिरकी

गरगर गिरकी,
वाऱ्याची फिरकी.

फिरकी गेली नभात,
नभातल्या मेघात.

मेघ लागले झरू,
चिंब झाले तरु.

तरु चिंब झाले,
पावसात न्हाले.

न्हाले तरु, धरा,
झोंबतो गार वारा.

वारा भराभरा,
फिरे गरागरा.

गरगर गिरकी,
वाऱ्याची फिरकी.


— प्रभाकर महाजन

20 February 2015

जग-रहाटी

जगा ! तुझी सारी तऱ्हा सदा उफराटी !

एक तरी बागेंतील
फूल कौतुकें देशील
बाळगिली आशा फोल ,
अतां पुष्पराशीमाजीं बुडे मात्र ताटी !

आपुल्याच जातां पायीं
पाडियलें ठायीं ठायीं;
केव्हढी ही आतां घाई—
चालविती द्याया खांदा; मिरविती हाटीं.

फुकटचा शब्द गोड
बोलला न कोणी धड
उठविलीं निंदा-झोड
स्मशान हें निनादतें अतां स्तुति-पाठीं

साद कुठें येईल का
ह्याच अपेक्षेनें एका
तुडविलें तिन्ही लोकां
मिठ्या कलेवरा द्याया अतां आप्त-दाटी.

हयातींत आगडोंब
विझविण्या एक थेंब
मिळाला न; आतां कुंभ—
किती रिकामे हे होती तिळांजलीसाठीं.

उभविला स्नेह-गाथा
पाचोळाच आला हातां,
खिळे-ठोक झाली माथां,
अस्थिंवरी देवालयें अतां नदीकांठीं.

मिळावया ऊब कोठें
झिजवितां उंबरठे
दार बंद जेथें तेथें ;
धूपारती शेजारती अतां दिनरातीं !

सतावून यावज्जीव
ओलांडतां आतां शीव
दाखविती प्रेम-भाव;
परिमार्जनाची धन्य तुझी ही रहाटी !


— यशवंत (२४ जून १९३३)



'पाणपोई' या निवडक कवितांच्या संग्रहामध्ये 'साद कुठें येईल का…' हे कडवं 'फुकटचा शब्द गोड….' च्या आधी घेतलं आहे पण "यशोगंध" या मुळ संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत मात्र 'फुकटचा शब्द गोड….' हे कडवं आधी आहे.

बाप

चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई
शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप

लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पाई
त्यानं काय केलं पाप ?

माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्या हाती
दुसऱ्याच्या हाती माप

बाप फोडतो लाकडं
माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करी हापाहाप !


— इंद्रजीत भालेराव

खोप = झोपडी; झाप = काटेरी झुडुपांपासून बनवलेले दार; लेतो = अंगावर घालतो;
पाचट = ऊसाची वाळलेली पाने; पाई = पायात

16 February 2015

मातृभूमीस वंदन

[जाति : धवलचंद्रिका]

वंदन तुज मायभूमि ! हें अखेरचें !
न कळे तव दर्शन कधिं फिरुन व्हायचें ! ll धृ ll

विसकटली बसवावी फिरुन ती घडी
तव काजीं झिजवावी शक्य तों कुडी
आशेची फोल परि भ्रमुनि वावडी
देशोधडिं लागे ही आज बापुडी
आंचवलों जननीच्या सौख्यकारणा
आंचवलों तेंविं तुझ्या क्लेशवारणा
काय म्हणूं परिसमाप्ति ही तुला रुचे ?
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll १ ll

यश मळलें, उजळाया फिरुन त्याप्रती
तळमळलों धडपडलों निशिदिनीं किती
परि भूवरि पाय कुणी टेकुं ना दिला
काकांचे जेविं थवे भ्रष्टल्या पिला
काडीचा आधारहि मानिला महा
झाली परि फसवणूक नित्य दुस्सहा ll २ ll

मान उंच करु पाहे कोंवळी कळी
धडगत लागेल तिची केंविं वादळी ?
झिडकारुनि दिधलें जें लेकरु तुवां
टाकलास ज्याचा तूं तोडुनी दुवा
तरि त्याच्या नच खळती अश्रु नेत्रिंचे
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll ३ ll

मरणाच्या दाढेमधिं चाललों जरी
मरणाच्या भीतिचा न लेशही उरीं
मरणाच्या खाईमधिं आयु कंठलें
मरणाचें काय तया बुजग-बाहुलें ?
ग्रीष्माचा दाह काय वाळल्या तृणा ?
राखेला जाळिल का अग्नि तो पुन्हां ?
परि तुझी न भेट मला व्हायची पुढें
ह्या शल्ये हें तुटतें मात्र आंतडें
मिळणार न अंत्य शयन गे त्वदंकिंचें
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll ४ ll






"बंदिशाळा" या खंडकाव्यातील हे गीत असून त्याच्या पहिल्या आवृत्तीत धृवपदात 'मायभूमि' व त्याच्या पुनरावृत्तीत 'मातृभूमी' पण तिसर्‍या आवृत्तीत मात्र सर्व ठिकाणी 'मायभूमि'असा शब्द आहे. कवीच्या "पाणपोई" या संग्रहात सगळ्या कडव्यात 'मायभूमि' हाच शब्द आहे पण कवितेचे शीर्षक मात्र "मायभूमीस अखेरचे वंदन" असे आहे.

14 February 2015

सुंदर माझी शाळा

सुंदर माझी शाळा हो
सुंदर माझी शाळा ll धृ ll

शाळेभोवती सारी झाडं
रक्षण करण्या आम्ही पुढं
रोज आम्हाशी बोलतसे हा
भिंतीवरचा फळा ll १ ll

शिक्षण द्याया गुरुजन दक्ष
शाळेत असते आमुचे लक्ष
गावोगावच्या मुलांमुलींना
लावितसे ही लळा ll २ ll

स्वच्छ आमचा परिसर सारा
शुद्ध मोकळा इथला वारा
खेळ खेळण्या मैदानावर
होतो आम्ही गोळा ll ३ ll

ज्ञानप्रकाशे आम्ही उजळतो
शिस्तीचेही धडे गिरवतो
शाळेमधल्या संस्कारांनी
फुलतो जीवनमळा
सुंदर माझी शाळा ll ४ ll


— शं. ल. नाईक

10 February 2015

आनंदाने नाचूया !

चला गड्यांनो खेळूया !
आनंदाने नाचूया ! ll

बाग चिमुकली, फुले उमलली,
सुंदर फुलली,
फुलांसारखे होऊया,
फुलांभोवती नाचूया ll

फुलांभोवती, भुंगे फिरती गाणी गाती,
तसेच आपण गाऊया,
ताल धरोनी नाचूया ll

आभाळाचे तऱ्हेऱ्हेचे,
रंग मजेचे,
चला चला रे पाहूया
आनंदाने नाचूया ll


— के. नारखेडे
गाणे (ध्वनिमुद्रण) ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.चला गड्यांनो खेळूया

9 February 2015

पेपर

रोज सकाळी चहा पितांना
हवा चवीला खरपुस पेपर,
चेतावितो जो विश्वचि सारें,
विरघळतो जो पापण्यांचवर;

कामाला जातांना अमुची
ज्यांत शिदोरी, जंतरमंतर;
गर्दीमध्यें, क्यूमध्यें जो
जनां-मनांतिल सरकवि अंतर.

रविवारी पण दे रे, बाप्पा,
पेपर कांहीं दुजा नवीन;
'शकुंतला' जो नाचनाचवी,
हिरोशिमाला जोडि हिरॉइन;

पडल्या पडल्या बिछान्यावरी
नवलाईच्या गोष्टी सांगुनि,
वृत्ती खुलवी दीन, हावर्‍या;
शिळ्या कढीला देई फोडणी.


— पुरुषोत्तम शिवराम रेगे

शेतकींतील सुख

[जाति - केशवकरणी ]

पूर्व-पश्चिमा खळाखळांतुनी वाहे जलवाहिनी
मांडवी अमुची मंदाकिनी
दूर डोंगरासमीप अगदीं तीच्या तीरावरी
आमुची जमीन वतनी बरी
भरदार शिवारामधें पिकें दाटलीं
उगवत्या भानुची प्रभा नभीं फांकली
बांधावर गवतें हिरवी फोंफावलीं
वनलक्ष्मीचें अभिनव वैभव उतास जणुं चाललें
खगांनीं तत्स्वागत गायिलें ll १ ll

सृष्टिसतीच्या आनंदाच्या प्रसन्न उत्सवदिनीं
शिवारामधें गात येउनी
वरुणकृपेचा विलास ऎसा पाहुन मनमोहन
वाटलें चित्तीं मजलागुन
कोपर्‍यावरिल त्या आम्रतरुच्या तळीं
मृदु तृणांकुराची मखमल गादी भली
बुंध्यास टेकुनी, चक्रवर्ति जणुं बळी,
भूक लागतां चटणी किंवा कांदा अन भाकर
खाउनी द्यावी वर ढेंकर ll २ ll

धुमाळ-बाळा जोडी घेउनि मोट धरावी कधीं
करावी राखण मळणी कधीं
रास घालुनी डोळे भरुनी संतोषें पाहुनी
निजावें वाकळ मग पसरुनी
वर चंद्रतारकामंडित तें अंबर
पायथ्यास पडुनी वाघ्या करि गुर्गुर
वाजती गळ्यांतिल बैलांचे घुंगुर
लाख पटींनी हें न सुखद का कृषिकर्मी राबणें!
नको तें परवशतेचें जिणें! ll ३ ll


— यशवंत

28 January 2015

गुलामाचें गाऱ्हाणें

[वृत्त - श्यामला*]


जूं बैसलें मानेवरी                       चाबूक हा पाठीवरी
ह्या कर्दमी मार्गावरी                    चौखूर धांवावें परी ll १ ll

हांकावया जो बैसला                   सत्तामदें तो झिंगला
माया दयेची आर्द्रता                    नाहीं तयाच्या अंतरीं ! ll २ ll

मागें रथामाजीं घनी                   थुंकी तयाची झेलुनी
त्वेषें लगामा खेचुनी                   आसूड ने खालीं वरी ll ३ ll

धोंड्यावरी ठेचाळतां                    खांचेंत पायीं मोडतां,
उंचीवरी संथावतां                        ते कोरडे अंगावरी ll ४ ll

विघ्नामधोनी वांचवा                   कर्तृत्व सारें दाखवा
या हांकणाराच्या नसे                   पर्वा तयाची अंतरीं ll ५ ll

त्या बक्षिसाच्या पोतड्या              हांसून मोतद्दार घे
माझ्या तनूच्या चिंधड्या              कोणीहि पाहेना परी ! ll ६ ll

धावूं किती रे मालका ?                 होसी दयेला पारखा
किंवा तुझी इच्छाच का                 जावें फुटोनी म्यां उरीं ? ll ७ ll


— यशवंत (२-६-१९२३)

* कविच्या "पाणपोई" या संग्रहात 'श्यामला' असे वृत्तानाम तर "यशोधन" च्या दुसर्‍या आवृत्तीत 'मंदाकिनी असे दिले आहे. तसेच याच संग्रहात दोन ठिकाणी 'परी' हा शब्द र्‍हस्व दिल्याने छंदोभंग झाला आहे.

12 January 2015

सरितेचें चरित

करिते का कधिं खंत
सरिता करिते का कधिं खंत ? ll ध्रु ० ll

रांगत लोळत दौडत घोळत
कडेकपारींतुनी खळाळत
                       आक्रमिते निज पंथ ll १ ll

फुलो चांदणें, असो ग्रीष्मदिन
असो तमिस्त्रा ढगाळ भीषण
                    समान शिशिर वसंत ! ll २ ll

कुणीं आणिली घागर मृण्मय
पखाल किंवा कलश हिरण्मय
                            पहावया न उसंत ll ३ ll

करोत मज्जन रूप-यौवना,
दुर्जन, सज्जन, जरठ, अंगना
                         असो रंक धनवंत ! ll ४ ll

करोत कोणी अस्थि-विसर्जन
ताबुत किंवा देव गजानन;
                        स्वागतशील उदंत ! ll ५ ll

मरुभूमींतुन दहनभूमींतुन
गात चालली एकच गायन
                       'करुं जग शोभावंत !' ll ६ ll

भेदभाव परि निर्मुनि; मानव
होई दानव; तरंगिणी लव
                           गणी न हंस तरंत ll ७ ll

असें संतसम जीवित आंखुन
आसमंत ही करीत पावन
वरितें सिंधु अनंत
            सरिता विश्रुत-चरित दिगंत. ll ८ ll


— यशवंत (१-३-१९३६)

यशवंत यांच्या निवडक कवितांचा "पाणपोई" या संग्रहातील 'अनुक्रमणिकेत' या कवितेचे शिर्षक 'सरितेचें चरित' असे असून पृष्ठ क्र. ९९वर 'सरितेचें चरित्र' असे आहे. मुळ "यशोनिधी" या संग्रहातली हि कविता १९३६ च्या 'ज्योत्सना' या अंकात 'सरितेचें जीवित' या शीर्षकासह प्रसिद्ध झाल्याचे '"आठवणीतल्या कविता" या संग्रहात नमूद केलेले आहे.

10 January 2015

स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा

[वृत्त : वियदगंगा]

ऱ्याखोऱ्यांतला आला कवी हा खास दर्बारा
मराठ्यांच्या महालक्ष्मी, तुला घे शाहिरी मुजरा
जगाचा मानितों स्वामी स्वत:ला मी महामानी
तुझ्या धामीं तुझ्या कामीं परंतु दास हा मानी
असें शास्ता जनांचा मी परी माई तुझां भाट
दिपावें विश्व वाणीनें, इथें कां दावुं तो थाट
नभींच्या तारकाराशी पदाघातें झुगारीन
परि स्वातंत्र्यलक्ष्मी गे ! तुझ्या पायीं सदा लीन

जिजाऊचा स्वतेजाचा, शिवाजीचा स्वशौर्याचा
मराठ्यांच्या दरार्‍याचा, तसा तो स्वाभिमानाचा,
क्षणार्धीं चित्तचक्षूना दिसाया लागला काळ
स्वराज्यीं जेधवां भाला जहाला नांगरी फाळ
नभाला चुंबिता झाला अतां तो मोडला भाला
परंतू वाव येथें हा तयाच्या शेष तेजाला
भिनूं दे माझिया रोमीं तयाचें थोडकें तेज
जनां देईन सांगोनी नसे प्यालों कधीं पेज

इथें संचारतें वारें, थरारे स्पर्शनें अंग
अहाहा ! जाहली वृत्ती समाधीमाजिं त्या गुंग !
झणीं बोला मला आज्ञा त्वरें सोडीन ललकारी
पुन्हा लावीन नाचाया महाराष्ट्रीं दर्‍याखोरीं
जहाला नांगराटीचा विखारी पूर्विंचा भाला
अतांच्या लेखणींतूनी नवा आणीन जन्माला

समाधी लागली आहे म्हणोनी तोंवरी बोल
मराठ्यांच्या यशोगानीं मनानें स्फूर्तिनें डोल
तनूचें भान जावोनी बनूनी शून्य त्या नजरा
पडूं दे माउली खालीं तुझ्या वेणींतला गजरा
यशाचा कौल मानोनी मुदें सोडीन दर्बारा
मराठ्यांच्या महालक्ष्मी, तुला घे शाहिरी मुजरा


— यशवंत (३०-११-१९२१)


यशवंत यांच्या निवडक कवितांचा "पाणपोई" या संग्रहात या कवितेचे वृत्त 'विजयगंगा" असे असून "आठवणीतल्या कविता" या संकलीत संग्रहात ते 'वसंत असे नमूद केलेले आहे.