A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

30 April 2014

आता

झडत झडत सगळीच झडलीत पाने आता
कुणाकुणासाठी रडावे झाडाने आता ?

कुठल्या कुठल्या आठवणीं येताहेत आता
अवघा समुद्रच उधाणलांय आता.

गातागाताच रडायला होते आता
ओठांत शब्दच थिजून गेलेत आता !

चालता चालता चालणेच थांबलेय आता
वाटाच चालून येताहेत अंगावर आता !

किती किती ही गर्दी, गोंगाट नुसता
माझी मलाच हांक ऐकू येत नाही आता !


— लक्ष्मीकांत तांबोळी

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

खापराचे दिवे

आमी जलमलो मातीत किती होनार गा माती
खापराच्या दिव्यात या कधी पेटनार वाती.

किती घरातून सूर्य जातं होऊन फिरते
पिठासारख्या उजिळ घरभर पसरते
काया म्हसीवानी रात नित आमच्या दारात
निऱ्हा अंधार भरली बसे पखाल रिचोत
नाही पाहेली पुनिव लय आईकल्या गोठी
आमी जलमलो ....

फास लावून जल्लद चाले कोनाचा वखर
खाली ढेकलाच्या वानी आमी होतो चुरचूर
फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे
तरी माय मावलीची मांडी उघळीच राहे
ऊभं अभाय फाटलं कसी झाकनार छाती
आमी जलमलो ....

दाने भरता कन्सात येती हुशार पाखरं
भर हंगामात अशा होते पारखी भाकर
तहा पोटातली आग पेट घेते आंगभर
मंग सोंगेल फनाची अनी होते धारदार
कोनं सांगावं रगत तिले लागनार किती
खापराच्या दिव्यातून मंग पेटतील वाती
आमी जलमलो ....


— विठ्ठल वाघ

सौजन्य : वाङ्मातृ <http://vaakmaatru.blogspot.in>

ऱ्हाडी बोलीत 'ळ' आणि 'र' यांचा सामान्यपणे 'य' होतो.
निऱ्हा = निव्वळ, गोठी = गोष्टी, तहा = तेव्हा, सोंगेल = कापलेले, अनी = तीक्ष्ण टोक, जल्लद = धारदार.

25 April 2014

बापा रे !

बापा रे ! गरीबी भरते या देशात नजरेत
आहे तिला अजूनही स्वतंत्र अस्तित्व रचनेत,
तिचा दिसतो मुक्त अविष्कार
फिरते ती मंद
पाउलं टाकीत या वसाहतीतून.
सारेच येथील आहेत बुडालेले
तिच्या कृपावंत बधीर अंगघोळ साऊल्यांतून !

तिच्या गूढ मेहेरनजरेने
आहे येथे सार्‍यांनाच पांगळं केलेलं.
समोरच्या पहाडातील रानझुडुपासारखं,
आहे सार्‍यांचंच जीवन वाळलेलं.
तुटलेल्या पाण्याच्या प्रवाहात
उभी राहावीत फांद्यांची सरळ बोटं
निळ्या आकाशात
गावीत नक्षत्रांना ऎकू येतील अशी
व्यथेच्या प्रवाहातून वाहत येणारी गाणी !
वाहतात येथे आसवांच्या नद्या
गरम निळ्या पाण्याच्या.
आहे या देशाची कृपा,
निदान आहे त्यांना स्वातंत्र्य आपलेच
दु:ख कुरवाळण्याचं,
रक्तहीन डोळ्यांच्या वाळलेल्या पापण्यांचं
आहे गरिबीनं एक दीर्घ किंकाळी फोडलेली
आहे सबंध धरती देशाची
सत्तेच्या उबदार दुलईत
अजूनही पेंगुळलेली !

आहेत त्यांना आदेश
हात जुळविण्याचे न बोलता,
आहे ना पोट रितं तुमचं ?
ऐका तर—
आदेश एक कतारवाल्यांचे !
भरा पोटात काठोकाठ—
राष्ट्रप्रेम,
ओसंडू द्या हृदयाच्या बाहेर त्याचे थेंब !
व्हा देशप्रेमात भिजून चिंब आणि
जुळवा आता आपले
वाळलेल्या निष्पर्ण फांद्यांचे हात सायंकाळी
फडफडणार्‍या या ध्वजासमोर


— गजमल माळी

(संकलन : मृदुला तांबे, मुंबई)

19 April 2014

पाऊस

पाऊस:
उटंगार घाटपायथ्याशी;
हिरवा कंच
झाडाझाडांतून निथळणारा;
सतारीवर विद्युतलयींत
मल्हाराची धून
इथे-तिथे
उधळल्यासारखा.

पाऊस:
घाटातला
कांबळकाळे आकाश लुचून
धुकाळ दरीत
झांजरसा,
तंद्रीतच तरंगणारा;
आषाढयात्रेच्या वाटेवर विसावून
दूरवर स्वप्नांत
झांजावणारा.

पाऊस:
घाटामाथ्यावरचा
नि:शब्द,
आहे-नाहीच्या पलीकडला
अनंतगर्भ
अवकाशाला मिठी घालून
रोमारोमांत
पालवणारा सर्वत्र
पाऊस…


— शंकर रामाणी

उटंगार = मुसळधार

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

शासन

कोणाला शंका असेल
पण मला निश्चित माहीत आहे,
की माझे नाते
नऊ नक्षत्रांच्या मध्यावर
त्यांना आधार
आणि प्रकाश देत असलेल्या
त्या वैश्विक जाळाशी,
सूर्याशी
आहे
पण केव्हा अंधारल्या घडीला
मीही विसरतो हे नाते
आणि उकिरड्याच्या कडेला बसलेल्या
भिका​​र्‍याप्रमाणे
मी हातात कटोरा घेऊन बसतो
लज्जास्पद,
येत्याजात्या पांथस्थाच्या
अनुदानासाठी.
एखाद्या शेवाळलेल्या क्षणाला
मीही विसरतो ते नाते
आणि भुताटकी वाड्यातील
अमावास्या पीत बसलेल्या
विहिरीप्रमाणे
उबवीत बसतो अंत:करणात
द्वेषमत्सराच्या हिरव्या सर्पाची
चिकट लगदाळी.
एखाद्या विसकटलेल्या दिवशी
मीही विसरतो ते नाते
आणि माझ्या अंगावर ओघळणा​​र्‍या
हलकटपणावर मात करण्यासाठी
होतो इतका हलकट
इतका
की माझ्या मुखावर चढतो
मी कधीही न मागितलेला
एक भयाण विद्रूप
दिर्गंधी मुखवटा.
पण हे सारे सूर्यद्रोह
मी करीत असताना, केल्यावर,
माझ्या काळजाच्या आंतरदेशात
धगधगून
पेटून उठते एक विराट जंगल,
आणि प्रकाश न देणा​​र्‍या
भाजून काढते मला
नि:संगपणाने.
आणि त्याने दिलेले आश्वासनही.


कुसुमाग्रज

16 April 2014

माझी माय सरसोती

माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या, मनी
किती गुपीतं पेरली !

माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता-भागवत
पावसात सामावतं
माटीमधी उगवतं !

अरे देवाचं दर्सन
झालं झालं आपसुक
हिरिदात सूर्यबापा
दाये अरूपाचं रूप !

तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानांमंधी
देवा तुझं येनंजानं
वारा सांगे कानामधी.

फुलामधी समावला
धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा
नथनीले त्याचं काय?

किती रंगवशी रंग
रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग
रंग खेये आभायात.

धर्ती मधल्या रसानं
जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव
पिंडामधी ठाव घेते.


— बहिणाबाई चौधरी

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

ह्या दु:खाच्या कढईची...


ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा, ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट.

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडूनी तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट.

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतून कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.


बा. सी. मर्ढेकर

संकलक : मृदुला तांबे, मुंबई

संतवाणी

तांबियाचे नाणे न चाले खर्‍या मोले l जरि हिंडविले देशोदेशी ll
करणीचे काही न मने सज्जना l यावे लागे मना वृद्धांचिया
हिरियासारिखा दिसे शिरगोळा l पारखी ते डोळा न पाहती
देउनिया भिंग कमाविले मोती l पारखिया हाती घेता नये
तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ l आपुले हे चित्त आपणा ग्वाही


– संत तुकाराम

15 April 2014

झपूर्झा

(जाति –  झपूर्झा)

हर्षखेद ते मावळले,
हास्य निमालें,
अश्रु पळाले;
कंटक-शल्यें बोथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?
झपूर्झा! गडे झपूर्झा !


हर्षशोक हे ज्यां सगळें,
त्यां काय कळे ?
त्यां काय वळे ?
हंसतिल जरि ते आम्हांला,
भय न धरु हें वदण्याला:
व्यर्थी अधिकची अर्थ वसे,
तो त्यांस दिसे,
ज्यां म्हणति पिसे;
त्या अर्थाचे बोल कसे ?
झपूर्झा! गडे झपूर्झा !


ज्ञाताच्या कुंपणावरुन,
धीरत्व धरुन,
ड्डाण करुन,
चिद्घनचपला ही जाते,
नाचत तेथें चकचकते;
अंधुक आकृति तिस दिसती,
त्या गाताती
निगूढ गीती;
त्या गीतींचे ध्वनि निघती
झपूर्झा ! गडे झपूर्झा !


नांगरल्याविण भुई बरी
असे कितितरी;
पण शेतकरी
सनदी तेथें कोण वदा ? 
हजारांतुनी एखादा !
तरी न, तेथुनि वनमाला
आणायाला,
अटक तुम्हांला;
मात्र गात हा मंत्र चला
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !


पुरुषाशीं त्या रम्य अति
नित्य प्रकृति
क्रीडा करती
स्वरसंगम त्या क्रीडांचा
ओळखणें, हा ज्ञानाचा
हेतू; तयाची सुंदरता
व्हाया चित्ता
प्रत ती ज्ञाता
वाडें कोडें गा आतां
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !


सूर्य चंद्र आणिक तारे
नाचत सारे
हे प्रेमभरें
खुडित खपुष्पें फिरति जिथें;
आहे जर जाणें तेथें,
धरा जरा नि:संगपणा,
मारा फिरके,
मारा गिरके,
नाचत गुंगत म्हणा म्हणा
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !



— केशवसुत

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

11 April 2014

संतवाणी

निंदील हे जन सुखे निंदू द्यावें l
सज्जनीं क्षोभावें नये बापा ll ll

निंदा स्तुति ज्याला समान पै झाली l
त्याची स्थिति आली समाधीला llll

शत्रुमित्र ज्याला समसमानत्त्वें l
तोचि पैं देवाते आवडला ll ll

माती आणि सोने ज्या भासे समान l
तो एक निधान योगीराज ll ll

नामा म्हणे ऐसे भक्त जे असती l
तेणें पावन होती लोक तिन्ही ll ll


– संत नामदेव

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

7 April 2014

शापित मी तगमगतो

या माझ्या पंखांनी
उडण्याचे वेड दिले
पण माझ्या हातांनी
घरटे हे निर्मियले

जगण्याची ओढ अशी
उडण्याचे वेड असे
घरट्याच्या लोभातहि
गगनाचे दिव्य पिसे

व्योमातुन उडतांना
ओढितसे मज घरटे
अन उबेत घरट्याच्या
क्षुद्र तेच मज गमते

हे विचित्र दुःख असे
घेउनि उरि मी जगतो
घरट्यातुन, गगनातुन
शापित मी तगमगतो.


— मंगेश पाडगावकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा
पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा.
शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.
देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.
पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वा​र्‍यावरी वहावा.
तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.


–  आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर)

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

शांताचेया घरा

जेथ शांताचेया घरा । अद्भूतु आला आहे पाहुणोरा ।
आणि येरां हिं रसां पांतिकरां । जाला मानु ॥ १ ॥

वधुवरांचिये मीळणीं । जैसिं वर्‍हाडियां हिं लुगडीं लेणीं ।
तैसे देशिचिये सुखासनीं । मिरवले रस ॥ २ ॥

परि शांताद्भुत बरवें । जेथ डोळेयांचा अंजुळिं घेयावें ।
जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेवां ॥ ३ ॥

नातरि अवंसेचां दिसीं । भेटलीं दोन्हीं बिंबें जैसीं ।
तेवि येकवळा रसीं । केला जेथ ॥ ४ ॥

मीनले गंगेयमुनेचे ॐ(ओ)घ । तैसें यां रसांचें जालें प्रयाग ।
ह्मणौनि सुस्नात होंत जग । आघवें एथ ॥ ५ ॥

मध्यें गीतासरस्वती गुपित । आणि दोन्ही रस वोघ मूर्त्त ।
यालागि त्रिवेणी होये उचित । फावली बापा ॥ ६ ॥

ह्मणौनि भलेतेणें एथ न्हावें । प्रयागीं माधवीं विश्वरूपातें पाहावें ।
एतुलेनि संसारा देयावें । तिळोदक ॥ ७ ॥

हें असो ऐसें सावेव । जेथ सांसिनले आथि रसभाव ।
जेथ श्रवणसुखाची राणिव । जोडली जगा ॥ ८ ॥

जेथ शांताद्भुत रोकडे । आणि एरां रसां पडप जोडे ।
हें अल्प चि परि उघडें । कैवल्य जेथ ॥ ९॥

हें सारस्वताचें गोड । तुह्मीं चि लाविलें जी झाड ।
तरि अवधानामृतें वाड । सिंपौनि कीजो ॥ १० ॥

मग हें रसभावफूलीं फुलैल । नाना फळभारें भरैल ।
तुमचेनि प्रसादें होइल । उपयोगु जगा ॥ ११ ॥


– संत ज्ञानेश्वर

(ज्ञानेश्वरी : अध्याय अकरावा)
पाठ्यपुस्तकात गाळलेल्या ओव्या : १, ८, ९, १३ ते १८

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)