A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

26 August 2014

जन पळभर म्हणतिल

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ? ll ध्रु० ll

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे आपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ? ll १ ll

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ? ll २ ll

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ? ll ३ ll

रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मज शिवाय ? ll ४ ll

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ? ll ५ ll


— भा. रा. तांबे

12 August 2014

गढी

गढी आहे.
गढीवर घुबड आहे
पण ते केवळ बुजगावणे आहे.

देवाच्या दयेने गढी खचण्यासाठी
सतराशे साठ पिढ्या जाव्या लागतील.

गावात गढी असली म्हणजे
इतरांना कुणाच्या तरी पायाशी
आश्रितासारखे बसल्याची भावना होते.

गढी खालून कोरशील
हळुहळु लपतछपत
तर अंगावर अवचित कोसळून
सहकार्‍यांसकट संपण्याची श्क्यता.

गढी एकदाच
उडवायची असेल धडाक्याने
तर थोडा धीर धार,
नेमकेपणाने वार कर.

पण कसेही करून गढी गेलीच पाहिजे.
लोकांना पटवून दे
गढी कोसळवण्याची आवश्यकता
आणि कारणे.

अगदी … गढीच्या बुडात
लाखमोलाचा खजिना आहे
असे सांगितलेस तरी चालेल…

गढी जाणे महत्वाचे !


— नारायण कुलकर्णी कवठेकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

9 August 2014

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळु द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परी उरातिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
<        > कधीही तारांचा संभार ll १ ll

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही ! आम्हाला कसले कारागार?
<        > अहो हे कसले कारागार? ll २ ll

पदोपदी पसरूनि निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
<        > होता पायतळी अंगार ll ३ ll

श्वासांनो, जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार
<        > तयांना वेड परी अनिवार ll ४ ll

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनि गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
<        > आई, वेड्यांना आधार ll ५ ll

कशास आई, भिजविसि डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
<        > आई, खळखळा तुटणार ll ६ ll

आता कर ओंकारा, तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
<        > मरणा, सुखेनैव संहार ll ७ ll


— कुसुमाग्रज

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)