रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

January 31, 2014

रायबा

जाडेंभरडें धोतर अंगीं कुडतें साधें एक
डोक्यावरती लाल पागुटें दिसतें काय सुरेख !
पायीं जोडा, हातीं काठी, देह कसा भरदार !
असे रायबा सोडुन आले आज इथें घरदार.

काया शिणली फार उन्हानें झाली कडक दुपार
थोडथोडकें अंतर नाहीं, कोस तेथुनी चार !
बुधवाराच्या दिवशीं त्यांच्या गांवाचा बाजार
असे रायबा सोडुन आले आज इथें घरदार.

पाणी नाहीं कुठें मिळालें, होती खडतर वाट
सुरकुतल्या तोंडावर वाहती घर्मजळाचे पाट
हंगामाचे दिवस, मिळाया गाडी मारामार
असे रायबा सोडुन आले आज इथें घरदार.

आठवड्याचें आणायाचें बुधवारीं सामान
गावकर्‍यांच्या भेटीगांठी, कामें दुसरीं आन
आणि गड्यांचा टाकायाचा देउन आज पगार
तरी रायबा सोडुन आले आज इथें घरदार.

"लई गुणाचा पांडू माझा मन लावी लिहीण्यांत
खेड्यावरती आला नाहीं आठदहा दिवसांत."
तळमळतें मन म्हातार्‍याचे इथें जीवनाधार,
म्हणुनि रायबा सोडुन आले आज इथें घरदार.

शिणली काया तरी मुखावर आनंदाचा भाव
म्हातार्‍याची किती खरोखर पोरावरती माव !
पाहतील ते डोळे भरुनी अपुल्या पांडोबास
मुखीं घालुनी तन्मातेनें दिधला प्रेमळ घास.

कुरवाळोनी त्यास विचारुन देतिल खर्चायास
आणि रायबा संध्याकाळीं जातिल मग खेड्यास.


— गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर)

January 27, 2014

असो तुला देवा माझा

असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥

तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥

तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरि प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥


— साने गुरुजी
(धुळे तुरुंग, मे १९३२)

बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ।।

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ।।

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो ।।

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो ।।

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो ।।

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ।।

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो ।।


— साने गुरुजी

January 22, 2014

शब्द

शब्द बापडे केवळ वारा । अर्थ वागतो मनांत सारा ॥
नीट-नेटका शब्द-पसारा । अर्थाविण पंगू ॥१॥

मनामनांचा संगम झाला । हॄदया हॄत्संदेश मिळाला ॥
शब्द बोबडा अपुरा पडला । निरुपम घे गोडी ॥२॥

शुद्धाशुद्धाकडे बघावें । वैयाकरणीं शब्द छळावे ॥
शुष्कबंधनीं कां गुंतावें । प्रेमळ हॄदयांनीं ? ॥३॥

व्याकरणाचे नियम कशाला । कोण मानतो साहित्याला ?
उठला जो हॄदयास उमाळा । हॄदयीं विरमावा ॥४॥

सुंदर वाक्यें शब्द मनोहर । सरस्वतीचे मंजुळ नूपुर ॥
ऐकायातें हटून अंतर । बसो पंडितांचें ॥५॥

ममतेचे दो घांस घ्यावया । प्रेमरसाचे घुटके प्याया ॥
उत्कंठित-उत्सुक, त्या हॄदयां । काय होय त्यांचें? ॥६॥

अशुध्द वाक्यें शब्द मोडके । अवाच्य अक्षर वर्ण तोटके ॥
गोड असे अमृताचे भुरके । होती प्रीतीनें ॥७॥— वासुदेव बळवंत पटवर्धन

January 16, 2014

ती शाळा

चावडीच्या पाठीमागे । जुना सरकारी वाडा ।
अर्ध्या पडक्या भिंतींचा । थर पांढरा केवढा ।। १ ।।

पटांगणाचा सोबती । उभा जुनाट पिंपळ ।
अजूनही येते कानी । त्याची मंद सळसळ ।। २ ।।

खिळखिळे झाले गज । अशा खिडक्या लांबट ।
छपराच्या कौलातून । ऊन हळू डोकावत ।। ३ ।।

खाली धुळीची जमीन । राठ टेबल समोर ।
किलबिल थांबे क्षण । छडी नाचता ज्यावर ।। ४ ।।

चिंचा पेन्सिलींचा सौदा । अंकगणिताचे ताळे ।
नवा शर्ट दहा बुक्के । सारे गुपचूप चाले ।। ५ ।।

तुळशीशी जाता उन्हे । घणघण वाजणारी ।
उंच आढ्याशी टांगली । घंटा घोडीच्या शेजारी ।। ६ ।।

शाळा सुटे पाटी फुटे । घरा वळती पाउले ।
वना निघाली मेंढरे । वाट त्यातून न मिळे ।। ७ ।।

अशी माझी उंच शाळा । होती पिंपळा जवळी ।
मन भिरभिरे तीत । कधी बनून पाकोळी ।। ८ ।।— वि. म. कुलकर्णी


(संकलन - कविवर्य उपेंद्र चिंचोरे, पुणे )

January 8, 2014

कोकण

चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ,
तेथील हिरवी गंमत जंमत डोळे भरुनी पाहू.
लाल लाल ही माती, इथले डोंगर हिरवे हिरवे,
डोईवरती आकाशाने रंग पसरले बरवे.
मासोळ्यांचे सूर पाहण्या, होडीमधुनी जाऊ,
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ ll १ ll 

वन बांबूचे, रान काजूचे अन आंब्याची राई,
नारळ, जांभूळ, फणस गोड हा मेवा देऊनी जाई.
झावळ्यातुनी माडांच्या रे चंद्र पसरतो बाहू,
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ ll २ ll 

ढ्यावरती सांकव आहे खाली वाहे पाणी,
झाडावरती पक्षी गाती मंजूळ मंजूळ गाणी.
शहाळ्यातले पाणी पिऊनी पक्ष्यांसंगे गाऊ,
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ ll ३ ll

निळ्या रुपेरी लाटा येती सागर काठावरी,
मोर नाचरे काढीत जाती नक्षी वाळूवरी.
जिवास वाटे घर कौलारू बांधून तेथे राहू,
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ ll ४ ll


—  रविकिरण पराडकर
चित्रकार : रमेश मुधोळकर, पुणे


January 2, 2014

उपदेशपर आर्या

सत्य सदा बोलावें सांगे गुरु आणि आपुला बाप l
खोटें भाषण करणें सज्जन म्हणतात हें महापाप ll

दिधलें दु:ख परानें, उसनें फेडूं नयेचि सोसावें l
शिक्षा देव तयाला करिल म्हणोनी उगेंचि बैसावें ll

जो जो निजहितकर्ता त्याची त्याची करा तुम्ही सेवा l
देवासमान मानुनि त्याचा सन्मान मानसीं ठेवा ll

मोठेपण दुसर्‍याला देशील जरी तरीच तूं मोठा l
'मी मोठा' म्हणतो जो, त्याचा मोठेपणा असे खोटा ll

थोर असो नीच असो, अडल्या बिडल्यास हात लावावा l
गरिबास साह्य व्हावें सुज्ञें चुकल्यास मार्ग दावावा ll

जो नर परोपकारी त्याच्या पुण्यास बा नसे गणती l
थोर असो नीच असो, 'तो धन्य' असेंच लोक त्या म्हणती ll

शक्त्यनुसार करावा दीनावर अल्प थोर उपकार l
कीं त्या सत्कर्माचा देवावर निश्चयें पडे भार ll

यास्तव पर उपकारीं निजहित समजोनि देह झिजवावा l
लोकीं जो न अनावर दु:खानल होय तोंचि विझवावा ll

देहाचा, बुद्धीचा, वित्ताचाही असा सदुपयोग l
जो नर करितो त्याला नलगे साधावया दुजा योग ll

वदतां सत्य कधींही न धरावी लाज, भीड वा भीती l
सर्वहि धर्म जगांतिल एकमतें सांगतात ही नीती ll

सौभाग्य मतिसतीचें सत्य, गुणांचें शुचिप्रभावरण l
सत्य मुखाचें मंडण, वाणीचेंही मनोरमाभरण ll

सत्य मनुष्यपणाचें चीज, यशाचेंहि बीज सत्यचि रे l
जीवन जीवदशेचें जीवात्म्याचेंहि तेज तेंचि खरें ll


कवी : अज्ञात