A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

27 December 2013

बाळाची बोली


आई ! आई! बोलतो कसा हा आई !

म्हणतो 'मं मं' भूक लागतां
'पा पा' करतो पाणि मागतां
म्हणतो 'दू दू ' दुधास बघतां
हसतो ही ही ! बोलतो कसा हा आई ! ll १ ll

तेल माखतां करतो 'तो तो',
न्हाउं घालतां 'बुडु बुडू' म्हणतो
तसाच झोपीं जातां म्हणतो
'गाई गाई' ! बोलतो कसा हा आई ! ll २ ll

मला पाहतां म्हणतो 'ता ता'
'बा बा' करतो बाबा दिसतां
आणि धोकतो उठतां बसतां,
'याई याई' ! बोलतो कसा हा आई ! ll ३ ll

यास पाखरें 'चिउ' वा 'काऊ',
'माउ' मांजरी, उंदिर'बाऊ',
फळें मिठाई खाऊ 'आऊ'
'हम्मा' गाई ! बोलतो कसा हा आई ! ll ४ ll

'टण टण' म्हणतो पायगाडीला
म्हणतो 'पो पो' मोटारीला
आणि बोलतो आगागाडीला
'भप भप ई ई' ! बोलतो कसा हा आई ! ll ५ ll


– भवानीशंकर पंडित

25 December 2013

मित्र आमुचा नवा

संगणक हा संगणक मित्र आमुचा नवा
जेथे तेथे ज्याला त्याला सदोदित तो हवा

हिशेब मोठे, आकडेमोड करतो चुटकीसरशी
अन वेगाच्या स्पर्धेमध्ये सदैव याची सरशी

'कि' बोर्डावर टाईप करावे 'माउस' वरती क्लिक
म्हणे संगणक "विश्वामधले तुला हवे ते शिक"

देते आम्हा 'इंटरनेट' ज्ञान, रंजन सारे
जगभरातील मित्रमैत्रिणी, नाविन्याचे वारे

विश्वचि अवघे संगणकाने दिधले अमुच्या हाती
विश्वाशीही जोडू आता बंधुत्वाची नाती


— अविनाश रघुनाथ ओगले

24 December 2013

आकाशातील घारीस

अमर्याद हा व्योमसिंधू गभीर
मधें चालली घार ही नाव धीर
अशी उंच ही एकटी संचरे कां
पुसाव्या हिला सर्व येथून शंका ll १ ll

जगाच्या भला थोरला हा पसारा
तुला वाटला काय नि:सार सारा
म्हणोनी अम्हां सोडूनी भूमिभागीं
सदा हिंडसी उंच आकाशमार्गी ll २ ll

खरे प्रेम नाहीं, खरा स्नेह नाहीं,
दयालेश माया नसे येथ कांहीं,
असें वाटलें काय बाई तुला गे !
म्हणोनी तुला अंबरी गोड लागे ? ll ३ ll

जयानें तुझें प्रेम चोरूनि नेलें,
तुला एकलें खालती सोडियेलें,
तया वल्लभा अंबरी शोधण्यातें,
निघालीस का सांग बाई ! खरें तें ? ll ४ ll

गतप्राण झालीं तुझी काय बाळें,
तुला वाटलें प्राण त्यांचे उडाले,
म्हणोनी पुन्हा त्यांस आणावयाला
नभी हिंडशी सांग बाई ! कशाला ? ll ५ ll

जयानें तुझी निर्मिली पक्षिकाया,
दिली अंबरी शक्ति तूतें उडाया,
तुला जो सदा पोषितो वाढवीतो,
नभी शोधिसी काय बाई ! विधी तो ? ll ६ ll

जगा त्रासुनी लोक संन्यास घेती,
घरा सोडुनी वास रानीं करिती,
परी रानही सोडिलें दूर खालीं,
विरक्ती अशी प्राप्त कां सांग झाली ? ll ७ ll

जगाचा तुला वीट आला कशानें ?
मला गूढ सांगे, तुझ्या संगती ने !
नको येथलें प्रेम खोटें क्षणाचें,
गडे ! दाव जें सत्य, जें शाश्वतीचें ! ll ८ ll


– दत्त

20 December 2013

उद्योगी मुंग्या

इवल्या इवल्या मुंग्या, नेसतात लाल लुंग्या
उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या ll १ ll

मिळून जाती अवघ्या, धान्य गोळा करायला
धडपड त्यांची बघता होतं पहा लाजायला ll २ ll

कणकण धान्यातून साठवण भविष्याची
त्यामुळे चिंता नसते, ओल्या सुक्या दुष्काळाची ll ३ ll

एका रांगेत जायच्या, शिस्त पहा कशी
कसलेल्या सैनिकांची, फौज चालते जशी ll ४ ll

दुजाभाव हेवादावा, नसे काही कटकट
एकजुटीनं झटती, कोठार भरे झटपट ll ५ ll

आळसाचे नाव त्यांच्या, ध्यानीमनी नसते
सर्व मिळुन राबणे, पक्के मनात असते ll ६ ll


— जयश्री चुरी