A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

19 September 2013

विवेक

वाट पुसल्याविण जाऊं नये
फळ वोळखिल्याविण खाऊं नये
पडिली वस्तु घेऊं नये
येकायेकीं ll १ ll
अति वाद करूं नये
पोटीं कपट धरूं नये
शोधल्याविण करूं नये
कुळहीन कांता ll २ ll
विचारेंविण बोलों नये
विवंचनेविण चालों नये
मर्यादेविण हालों नये
कांहीं येक ll ३ ll
प्रीतीविण रुसों नये
चोरास वोळखी पुसों नये
रात्री पंथ क्रमूं नये
येकायेकीं ll ४ ll
जनीं आर्जव तोडूं नये
पापद्रव्य जोडूं नये
पुण्यमार्ग सोडूं नये
कदाकाळीं ll ५ll
निंदा द्वेष करूं नये
असत्संग धरूं नये
द्रव्यदारा हरूं नये
बळात्कारें ll ६ ll
वक्तयास खोदूं नये
ऐक्यतेसी फोडूं नये
विद्याअभ्यास सोडूं नये
कांहीं केल्या ll ७ ll
तोंडाळासि भांडों नये
वाचाळासी तंडों नये
संतसंग खंडूं नये
अंतर्यामीं ll ८ ll
अति क्रोध करूं नये
जिवलगांस खेदूं नये
मनीं वीट मानूं नये
सिकवणेचा ll ९ ll
क्षणाक्षणां रुसों नये
लटिका पुरुषार्थ बोलों नये
केल्याविण सांगों नये
आपला पराक्रमु ll १० ll
बोलिला बोल विसरों नये
प्रसंगी सामर्थ्य चुकों नये
केल्याविण निखंदूं नये
पुढिलांसि कदा ll ११ ll
आळसें सुख मानूं नये
चाहाडी मनास आणूं नये
शोधिलुआविण करूं नये
कार्य कांहीं ll १२ ll
सुखा आंग देऊं नये
प्रेत्न पुरुषें सांडूं नये
कष्ट करितां त्रासों नये
निरंतर ll १३ ll
सभेमध्यें लाजों नये
बाष्कळपणें बोलों नये
पैज होड घालूं नये
काहीं केल्या ll १४ ll
बहुत चिंता करूं नये
निसुगपणें राहों नये
परस्त्रीतें पाहों नये
पापबुद्धी ll १५ ll
कोणाचा उपकार घेऊं नये
घेतला तरी राखों नये
परपीडा करूं नये
विस्वासघात ll १६ ll
शोच्येंविण असों नये
मळिण वस्त्र नेसों नये
जणारास पुसों नये
कोठें जातोस म्हणौनी ll १७ ll
व्यापकपण सांडूं नये
पराधेन होऊं नये
आपलें वोझें घालूं नये
कोणीयेकासी ll १८ ll
पत्रेंविण पर्वत करूं नये
हीनाचें रुण घेऊं नये
गोहीविण जाऊं नये
राजद्वारा ll १९ ll
लटिकी जाजू घेऊं नये
सभेस लटिकें करूं नये
आदर नस्तां बोलों नये
स्वभाविक ll २० ll
आदखणेपण करूं नये
अन्यायेंविण गांजूं नये
अवनीतीनें वर्तों नये
आंगबळें ll २१ ll
बहुत अन्न खाऊं नये
बहुत निद्रा करूं नये
बहुत दिवस राहूं नये
पिसुणाचेथें ll २२ ll
आपल्याची गोही देऊं नये
आपली कीर्ती वर्णूं नये
आपलें आपण हांसों नये
गोष्टी सांगोनी ll २३ ll
धूम्रपान घेऊं नये
उन्मत्त द्रव्य सेवूं नये
बहुचकासीं करूं नये
मैत्री कदा ll २४ ll
कामेंविण राहों नये
नीच उत्तर साहों नये
आसुदें अन्न सेऊं नये
वडिलांचेंहि ll २५ ll
तोंडीं सीवी असों नये
दुसऱ्यास देखोन हांसों नये
उणें अंगीं संचारों नये
कुळवंताचे ll २६ ll
देखिली वस्तु चोरूं नये
बहुत कृपण होऊं नये
जिवलगांसी करूं नये
कळह कदा ll २७ ll
येकाचा घात करूं नये
लटिकी गोही देऊं नये
अप्रमाण वर्तों नये
कदाकाळीं ll २८ ll
चाहाडी चोरी धरूं नये
परद्वार करूं नये
मागें उणें बोलों नये
कोणीयेकाचें ll २९ ll
समईं यावा चुकों नये
सत्वगुण सांडूं नये
वैरियांस दंडूं नये
शरण आलियां ll ३० ll
अल्पधनें माजों नये
हरिभक्तीस लाजों नये
मर्यादेविण चालों नये
पवित्र जनीं ll ३१ ll
मूर्खासीं संमंध पडों नये
अंधारीं हात घालूं नये
दुश्चितपणें विसरों नये
वस्तु आपुली ll ३२ ll
स्नानसंध्या सांडूं नये
कुळाचार खंडूं नये
अनाचार मांडूं नये
चुकुरपणें ll ३३ ll
हरिकथा सांडूं नये
निरूपण तोडूं नये
परमार्थास मोडूं नये
प्रपंचबळें ll ३४ ll
देवाचा नवस बुडऊं नये
आपला धर्म उडऊं नये
भलते भरीं भरों नये
विचारेंविण ll ३५ ll
निष्ठुरपण धरूं नये
जीवहत्या करूं नये
पाउस देखोन जाऊं नये
अथवा अवकाळीं ll ३६ ll
सभा देखोन गळों नये
समईं उत्तर टळों नये
धिःकारितां चळों नये
धारिष्ट आपुलें ll ३७ ll
गुरुविरहित असों नये
नीच यातीचा गुरु करूं नये
जिणें शाश्वत मानूं नये
वैभवेंसीं ll ३८ ll
सत्यमार्ग सांडूं नये
असत्य पंथें जाऊं नये
कदा अभिमान घेऊं नये
असत्याचा ll ३९ ll
अपकीर्ति ते सांडावी
सद्कीर्ति वाढवावी
विवेकें दृढ धरावी
वाट सत्याची ll ४० ll
नेघतां हे उत्तम गुण
तें मनुष्य अवलक्षण
ऐक तयांचे लक्षण
पुढिले समासीं ll ४१ ll



- समर्थ रामदास (नारायण सूर्याजी ठोसर)


(बालभारती पाठ्यपुस्तकात फक्त चारच कडवी आहेत)