रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

April 13, 2013

नवी पिढी

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

ही वडिलांची वाडी तुमची, तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको अम्हाला जीर्ण गढी ॥१॥

देव्हाऱ्यातिल गंधफुलांतच झाकुन ठेवा ती पोथी
अशी बुद्धीला भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी कुणाला शिळी कढी? ॥२॥

शेषफणेवर पृथ्वी डोले ! मेरूवरती सूर्य फिरे !
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो ! चंद्र राहूच्या मुखी शिरे !
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

दहा दिशांतुन अवकाशातुन विमान अमुचे भिरभिरते
अणुरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पूजावी जुनी मढी ॥४॥


— वसंत बापट

April 2, 2013

इच्छा

रोज वाटे एका फुला
कधी उडता येईल मला ?
इथं तिथं जाता येईल
भारी भारी मज्जा होईल

पाकळी पाकळी लागतां पसरू
फुलच झालं फुलपाखरु
इकडून तिकडे उडत जाता
कोण त्याला अडविल आता ?

एक वात मिणमिणत
मनात असते गुणगुणत
जर का मला उडतां येईल
भारी भारी मज्जा होईल

गुणगुणत असतां सुटले भान
वातीला फुटले पंख छान
राहील आतां कशी घरात
काजवा होऊन गेली वात

पडल्या जागी तळ्यातलं पाणी
एकच विचार मनात आणि
आमचा आपला तळ खाली
पक्षी तेवढे उंच आभाळी

म्हणुन त्याची वाफ झाली
तळं सोडून वर निघाली
वाफेला मग पंख फुटले
ढग होऊन उडत सुटले.

मलाही वाटतं घोडा व्हावं,
माळावरुन दौडत जावं
कधी वाटतं होऊन मासा
पाण्यात पोहत राहीन खासा.

कधी वाटतं पक्षी व्हावं
आकाशातून उंच उडावं
कधीच नाही का होणार असं
जसं मनात येतं तसं


— रवींद्रनाथ टागोर
(अनुवाद : पु. ल. देशपांडे)


(सौजन्य: दिपा जोशी)

तिसरं आणि चौथं कडवं पाठपुस्तकात नाही.

April 1, 2013

माझी आई

घंटा वाजता बंद होय शाळा,
घरी जायाची घाई फार बाळा.

फुले रंगीत फांद्यांवरी आली
'थांब ना रे', बाळास त्या म्हणाली.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.'

फुलपाखरु तिथे एक आले,
ट्ट खेळाचा खूप खूप चाले.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.'

झाड सोडूनी पक्षी येत खाली,
गीत गाऊन त्यास मोह घाली.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.
सखेसोबती तुम्ही सर्व काही,
परी आवडते मला फार आई.'


— अज्ञात