A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

27 February 2013

कावळा व बगळा

कावळा म्हणे मी काळा
पांढरा शुभ्र तो बगळा
दिसतसे ll १ ll

वाहवा तयाची करिती
मजलागीं धिक्कारीती
लोक हे ll २ ll

मग विचार त्याने केला
पैशाचा साबू आणिला
झडकरी ll ३ ll

फासुनी सर्व शरिराला
खडकासी घाशित बसला
नदिवरी ll ४ ll

घाशिले अंग बहु बळें
रक्त त्यामुळें वाहुं लागले
घाबरा झाला
बापुडा शेवटीं मेला ll ५ ll


- रा. देव

25 February 2013

पंचारती

मराठीच्या महाराष्ट्रा
आज स्वागत स्वागत
सह्याद्रीच्या कड्यावरी
वाजे वाऱ्याची नौबत !

काळ-कवाड फोडून
आल्या आल्या साऱ्याजणी,
महाराष्ट्राच्या स्वागता
आज मानाच्या धनिणी !

शकुनाचा हाती दीप
महदंबा आधी येई,
रचे दीपांची आरास
घवळिल्या दिशा दाही !

नामयाच्या जनाईने
केले सडासंमार्जन,
हात अबीर-मंजिरी
गंधे भारिले गगन !

केली जळक्या काडीची
लक्ष्मीबाईने लेखण,
चित्रे रेखिली स्वागता
रंग प्राणाचे भरून !


अहिराणी बहिणाबाई
आणि तव्याची भाकर
ओवाळून टाकायाला
उभी राहिली तत्पर !


देवी अहिलेच्या हाती
पुण्यतीर्थाचा कलश,
नेत्र कराया पवित्र
उभी राहिली सहर्ष !


ओवाळाया महाराष्ट्रा
आज जिजाईच्या हाती,
कोटी सूर्याच्या तेजाने
उचंबळे पंचारती !




— इंदिरा नारायण संत

23 February 2013

मुक्या जिवांचे दु:ख

कोरडे जे शेत आहे
ओलित झाले पाहिजे
मुक्या जिवांचे दु:ख ह्या
बोलीत आले पाहिजे ll

छते ऊन्हाची घराला,
नांदते जीव पोळती
फुफाट्याच्या वाहणा
पायांमधूनी घालती
दाह त्यांच्या वेदनांचे
झेलीत गेले पाहिजे ll १ ll

आभाळ अंतरातले
सोसतांना फाटलेले
अश्रू दो डोळ्यांतले
गाळतांना दाटलेले
महापूरांना बांध ह्या
घालीत गेले पाहिजे ll २ ll

नांगरल्या शेतापरी
काळीज दु:ख साहते
तरी सुगीचे डोलत्या
स्वप्न हिरवे पाहते
अर्थ ह्या स्वप्नातही
पेरीत गेले पाहिजे
मुक्या जिवांचे दु:ख ह्या
बोलीत आले पाहिजे ll ३ ll


— विठ्ठल वाघ

22 February 2013

आठवते ना

आठवते ना-
ओढयाकाठी अपुल्या घरची
गाय घेऊनी धावत होतो
चरावयाला सोडूनिया तिज
पारंब्यावर लोंबत होतो !
आठवते ना-
डोहामधले स्वैर डूंबणे
अंगावरचे ओले कपडे
अंगावरती तसेच सुकणे,
सुकता कपडे पुन्हा पोहणे

आठवते ना-
करवंदाचा चीक बिलगता
बोटे अपुली बसली चिकटून
अन कैऱ्यांच्या दिवसामध्ये
हातकातडीं गेली सोलून
आठवते ना-
हातामध्ये हात घालुनी
अर्धा डोंगर गेलो चढूनी
वर्गामधल्या गोष्टी बोलत
उन्हात फिरलो शेतांमधूनी

मला तरी नित आठवते गा
आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळीमध्ये
उबगुनी जाता देह आणि मन



– वि. म. कुलकर्णी

(Compiled by : Ms. Mrudula Tambe)

11 February 2013

मुलांस बोध

[भुजंगप्रयात]

बरें सत्य बोला यशातथ्य चाला ।
बहू मानिती लोक येणें तुम्हांला ॥
धरा बुद्धि पोटीं विवेकें तुम्ही हो ।
बरा गूण तो अंतरामाजिं राहो ॥१॥

सदा दात घांसोनि तोंडा धुवावें ।
कळाहीन घाणेरडें, बा, नसावें ॥
सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे ।
बहू काळ हा खेळ कामा नये रे ॥२॥

दिसामाजि कांहींतरी तरी तें लिहावें ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें ॥
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करावें ।
बरें बोलणें नित्य जीर्वी धरावें ॥३॥

बहू खेळ खोटाचि आलस्य खोटा ।
समस्तांशिं भांडेल तोची करंटा ॥
बहूतां जनांलागिं जीवें धरावें ।
भल्या संगतीं न्याय तेथें वसावें ॥४॥

विवेकेंविणें सर्वही दंभ झाला ।
बहू नेटका सज्जला साज केला ॥
प्रतीतीविणें बोलणें व्यर्थ होतें ।
विचारेंविणें सर्वही व्यर्थ हो तें ॥५॥

हिशेबी सदा न्याय सांडू नये रे ।
कदाचित अन्याय होता ढका रे ॥
जनीं सांडीतां न्याय रे दु:ख होतें ।
महासौख्य तेही अमस्मात जातें ॥६॥

प्रचीतीविणें बोलणे व्यर्थ वाया ।
विवेकेविणें सर्वहि दंभ जाया ॥
बहू सज्जला नेटका साज केला ।
विचारेंविणें सर्वही व्यर्थ गेला ॥७॥

वरीं चागंला अंतरीं गोड नाहीं ।
तया मानवाचे जिणे व्यर्थ पाहीं ॥
वरीं चांगला अंतरीं गोड आहें ।
तयालागी कोणीतरीं शोधिताहें ॥८॥

सदा अंतरीं गोड तें सांडवेना ।
कदा अंतरीं ओखटे देखवेना ॥
म्हणुनी भला गूण आधी धरावा ।
महाघोर संसार हा नीरसावा ॥९॥

'भला रे भला' बोलती तें करावें ।
बहुतां जनांचे मुखे येश घ्यावें ॥
परी शेवटी सर्व सोडुनि द्यावें ।
मरावे परी कीर्ति रुपेउरावें ॥१०॥



- समर्थ रामदास (नारायण सूर्याजी ठोसर)

8 February 2013

चिमण्यांस !

या चिमण्यांनों, या गS या
अंगणि माझ्या नाचाया
टपटप पाउल वाजूं दे
झपझप पाउल चालूं दे ।।१।।

ही घ्या टाळी वाजवितें
हें घ्या गाणें मी म्हणतें
एकामागुन एक फिरा
हळूच वळवा मान जरा ।।२।।

चटकन उचला तांदूळ
भरकन फिरवा पाऊल
नाच कुणी पाहिल अपुला
लपा ! उठा ! जा, दूर पळा ! ।।३।।



- वनमाळी (वा. गो. मायदेव)

7 February 2013

गरिबीचा पाहुणचार

या बसा पाव्हनं असं, रामराम घ्या !
कोनच्या तुम्ही गांवाचं ? गाठुडं तिठं राहुंद्या !

घोंगडी टाकली इठं, बसा तीवर
अनमान करुं नका आतां, हें समजा अपुलं घर

वाढूळ चालतां जनूं, लई भागलां
हें पगा, काढलंय पाणी, आंघूळ कराया चला

आटपा बिगीनं जरा, ताट वाढलं
पाव्हनं, चला या आतां, हें पगा पिढं टाकलं

वाढली पगा ज्वारिची जाड भाकरी
निचितीनं जेवा आतां, जायचं न शेतावरी

लइ सुगरण मपली बरं कारभारिण
किती अपरुक झालं हाए, हें कांद्याचं बेसन !

लसणीची चटणी उजुन पगा वाढली
ती मधून तोंडी लावा, लागती तिखट चांगली !

चापून अतां होउं द्या, करुं नका कमी
मीठभाकरी गरीबाची, घ्या गोड करोनी तुम्ही

इकत्यांत कसं उरकलं? हें नव्हं खरं
आनकी येक चतकोर, घ्यायला पाहिजे बरं !

कां राव हात राखुनी असं जेवतां ?
ए अगS वाढ कीं त्यांना, हां ब्येस जाहलं अतां !

हो, झालंच आतां, उठा, चला भाइर
घ्या हातावरतीं पाणि, नी बसा पथारीवर

पाव्हनं, नीट भिंतिला बसा टेंकुनी
हें खांड घ्या सुपारीचं, घ्या तोंडामदिं टाकुनी

ही भरली चिलमीमदीं तमाखू अहा !
पेटली कशी पण नामी, झुरका तर घेउन पहा

जायचं काय म्हंगतां ? झोंप घ्या जरा
जाताल उद्यां, कां घाई ? छे, बेत नव्हं हा बरा

भारीच तुम्ही हे बुवा, जायचंच का ?
तारीख चालली वायां, गरिबाचं ऎकु नका

शेवटीं निघालांत ना ? जपूनीच जा
गरिबाची ओळख ठेवा, या बरं, रामराम घ्या !



– ग. ल. ठोकळ

5 February 2013

द्वाड मनी

गुणी आणि अवगुणी— अशी ही द्वाड आमुची मनी ll ध्रु. ll
जशी काय ही बाई कोणी
आली बर्फाच्या देशांतुनि
अंगाला कापूस डकवुनी
मऊ रेशमाहुनी— अशी ही द्वाड आमुची मनी ll १. ll
डोळे इवलाले लुकलुकती
अधिकच घारेपणांत खुलती
नजर असे पण चोरटी किती
सदा दंग अंगणी— अशी ही द्वाड आमुची मनी ll २ ll
दंग अशी खेळांत तरी पण
गर्का देइल (तोहि एक क्षण)
आणि काय—ये ध्यानी मागुन
प्यालि दूध चोरुनी— अशी ही द्वाड आमुची मनी ll ३ ll
मनी मावशी माझी मांजरी
तुम्हांहून लाडकी कितीतरी
बिलगूं का— पण पळाली दुरी 
मला ओरबाडुनी— अशी ही द्वाड आमुची मनी ll ४ ll
अशी द्वाड तर, गट्टी सोडुं का ?
किंवा थोडें दुध तोडुं का ?
वाळुन ही पण जाइल अक्का.
नका बोलुं हिज कुणी— लाडकी जरी द्वाड मनी ll ५ ll




– अज्ञातवासी (दिनकर गंगाधर केळकर)

किमया

उभारून कर उभे माड हे
शिरीं वीरांपरी झेलीत वृष्टी
जरा पहावे क्षितिजावर तर
बुडून जाते धुक्यात दृष्टी

हिरवी झाडे—शामल डोंगर
धुसर निळसर तलम हवा ही
लाल गढूळ जलातूंन वाहे
उसळत खिदळत चंचल काही

भिजून गेलें पंख तरीही
बसला तारांवरती पक्षी
मधेच ठिबके थेंब कोवळा
फुलवित जळी वलयांची नक्षी

मिचकावीत केशरी पापणी
कुठे दूरच्या ज्योती हसती
कुठे घरांच्या कौलारांवर
गुच्छ धुरांचे झुलती… भिजती

छेडी सुरावट मल्हाराची
धारांच्या तारांवर वारा
लख्ख विजेच्या प्रतिबिंबाचा
जळात गोठून झाला पारा

ध्वज मिरवीत काजळी धूराचा
आगगाडी ये दूरून उत्सुक
खडखड धडधड आज तिची पण
भिजून झाली हळवी नाजूक.


— मंगेश पाडगांवकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe)