A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

31 October 2012

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
– मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्ध वडावर !
– मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
– मला वाटते त्यालाही मग
गरम झ​​ऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघ​ड्या पाठीवर;
– तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
– मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते


— विंदा करंदीकर

30 October 2012

येवढे द्यावे


अनंता येवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे
उडाया पांखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे II १ II

घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल
कुण्याही मायपदराशी खेळते राहू दे मूल II २ II

फुलांचा भार ना व्हावा, कधीहि कोणत्या देठा
चालत्या पावलांसाठी, असू दे मोकळ्या वाटा II ३ II

तान्हुल्या बाळओठांचा, तुटो ना दे कधी पान्हा
असू दे माय कोणाची, असू दे कोणता तान्हा II ४ II

चालता तिमिरवाटेने, सोबती चांदणे यावे
घणांचे घाव होताना, फुलांनी सांत्वना द्यावे II ५ II

कितीही पेटू दे ज्वाळा, जळाचा जाळ न व्हावा
बरसत्या थेंबथेंबांचा, भुईतुन कोंब उगवावा II ६ II

अनंता येवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे
शेवटी श्वास जाताना, फुलांचे रंग मी व्हावे II ७ II


— लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी

26 October 2012

शाळेचा रस्ता

शाळेस रोज जातांना l मज विघ्नें येती नाना ! ll ध्रुo ll
किति पक्षी गाती गाणी
झाडावरि म्हणती बसुनी,
'ये मुला, खेळुं या मिळुनी !'
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! ll १ ll

टोळ कसे गवतावरती
आनंदें टुण टुण उडती !
खेळाया बोलावीती
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! llll
गारुडी वाजवुनि पुंगी
बोलावी झणिं मजलागीं !
बहु जमती जन त्या जागीं,
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! llll
बाजूस खेळणींवाला
वाखाणुनि अपुल्या माला
वेधितसे नकळत बाळां
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! llll
वाटेंतिल झाडें वेली,
हालविती पानें अपुलीं;
बोलाविति मजला जवळी !
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! llll


— ना. गं. लिमये

18 October 2012

मावळत्या सूर्याप्रत

[सृष्टीलता]

मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करां || ध्रु ० ||

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा || १ ||

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोंवरी भूतें’ अशी म्हण;
जगांत भरलें तोंडपुजेपण,
धरी पाठिवर शरा || २ ||

असक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तूं खरा || ३ ||

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तूं खरा || ४ ||


— भा. रा. तांबे (ऑक्टोबर, १९३५)

17 October 2012

प्रार्थना

तुझा सूर्य उगवे आम्हीं प्रकाशात न्हातो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll धृ०ll

ऱ्यातुनी निर्मळ वाहे तुझा निळा छंद
फुलांतुनी लहरत राहे तुझा हा सुगंध
तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll१ll

मुसाफिरा थकल्या देतो वृक्ष गाढ छाया
तशी तुझी आम्हांवरती माऊलीची माया
जिथे जातो तेथें तुझा नाद ऐकू येतो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll२ll

मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्य वास
सत्य, प्रेम करुणा आहे तिथे तुझा श्वास
विकासात वाहून आम्हीं भेट तुझी घेतो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll३ll

तुझी मुले सगळी आम्हीं, नसे जात-पात
द्वेष भेद यांच्या भिंती नको या जगात
सुरांतुनी वाहुनि आम्हीं तुझे प्रेम नेतो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll४ll


— मंगेश पाडगांवकर


(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

झाडे लावू

एक झाड लावू मित्रा
त्याला पाणी घालू
मोठे झाल्यावर, त्याच्या
सावलीत खेळू
एक झाड लावू मित्रा
त्याला कुंपण करू
मोठे झाल्यावर, फुले
ओंजळीत भरू
एक झाड लावू मित्रा
त्याची निगा राखू
मोठे झाल्यावर, त्याची
गोड फळे चाखू  
एक झाड लावू मित्रा
त्याला रोज पाहू
त्याची गाणी गाता गाता
मोठे मोठे होऊ


 अनंत भावे


(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

परमेश्वराची प्रार्थना

[श्लोक : कामदाछंद

आस ही तुझी फार लागली II
दे दयानिधे बुद्धि चांगली II
देवूं तूं नको दुष्ट वासना II
तूंच आंवरीं माझिय मना II १ II

देह देउनी तूंच रक्षिसी II
अन्न देउनी तूंच पोशिशी II
बुद्धि देउनी काम सांगशी II
ज्ञान देउनी तूंच तारिशी II २ II

वागवावया सर्व सृष्टिला II
शक्ति बा असे एक तूजला II
सर्वशक्ति तूं सर्वदेखणा II
कोण जाणिजे तुझिया गुणा II ३ II

नाम रूप हें तूजला नसे II
तय तुला मुखें वर्णावे कसें II
आदि अंत ना मध्यही तुला II
तूंच दाविशी मार्ग आपुला II ४ II

माणसें आम्ही सर्व लेकरें II
माय बाप तूं हें असे खरें II
तूझिया कृपेवीण इश्वरा II
आसरा आम्हां नाहीं दूसरा II ५ II

तूंच आहसी आमुची गती II
देईं आमुतें उत्तमा मती II
प्रर्थितों तुला जोडुनी करां II
हे दयानिधे कीं कृपा कराII ६ II


– साने गुरुजी

धरत्रीले दंडवत

काया काया शेतामंधी
घाम जिरव जिरव
तव्हा उगलं उगलं
कायामधून हिरवं l
येता पीकाले बहर
शेताशेतात हिर्वय
कसं पिकलं रे सोनं
हिर्व्यामधून पिवयं l
अशी धरत्रीची माया
अरे, तीले नही सीमा
दुनियाचे सर्वे पोट
तिच्यामधी झाले जमाl
शेतामंधी भाऊराया
आला पीकं गोंजारत
हात जोडीसन केला
धरत्रीले दंडवतl
शेतामधी भाऊराया
खाले वाकला वाकला
त्यानं आपल्या कपायी
टिया मातीचा लावलाl
अशी भाग्यवंत माय
भाऊरायाची जमीन
वाडवडीलाचं देवा,
राखी ठेव रे वतन l


— बहिणाबाई चौधरी


(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

16 October 2012

घन तमीं शुक्र बघ राज्य करी !

[जाति - नववधू]

घन तमीं शुक्र बघ राज्य करी,
रे खिन्न मना, बघ जरा तरी! ll ध्रु० ll

ये बाहेरी अंडें फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं,
कां गुदमरशी आंतच कुढुनी?
रे ! मार भरारी जरा वरी. ll १ ll

प्रसवे अवस सुवर्णा अरुणा,
उषा प्रसवते अनंत किरणां,
पहा कशी ही वाहे करुणा–
कां बागुल तूं रचितोस घरीं ? ll २ ll

फूल हंसें कांट्यांत बघ कसें,
काळ्या ढगिं बघ तेज रसरसे,
तीव्र हिमांतुनि वसंतहि हंसें,
रे, उघड नयन, कळ पळे दुरी. ll ३ ll

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरु डुलें;
तेल जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी ? ll ४ ll

मना, वृथा कां भीशी मरणा ?
दार सुखाचें तें हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना,
पसरोनि बाहु कवळण्या उरीं ll ५ ll


— भा. रा. तांबे (ऑक्टोबर १९२०)

गाणे ऐकण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
घन तमीं शुक्र बघ राज्य करी

12 October 2012

पक्षी जाय दिगंतरा

पक्षी जाय दिगंतरा | बाळकांसी आणी चारा || १ ||

घार हिंडते आकाशी | झांप घाली पिल्लापासीं || २ ||

माता गुंतली कामासी | चित्त तिचें बाळापाशीं || ३ ||

वानर हिंडे झाडावरी | पिलां बांधुनी उदरी || ४ ||

तैसी आम्हांसी विठ्ठलमाये | जनी वेळोवेळी पाहे || ५ ||



- संत जनाबाई

10 October 2012

नाहीं निर्मळ जीवन

नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥धृ०॥

तैसें चित्त शुद्ध नाहीं । तेथें बोध करील काई ॥१॥

वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥

वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥३॥

नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥

प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥

तुका ह्मणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥



- संत तुकाराम

9 October 2012

प्रभात

प्रभात झाला रवी उदेला ऊठ उशिर झाला;
प्रेमळ भावें सरळ मनानें वंदिं जगत्पाला ll १ II

दहिंवर पडलें मौत्तिकवृष्टी जणुं भूवर झाली;
प्रेमरंगरंगित ही स्मितमुखि पूर्व दिशा खुलली ll २ II

मंदमंद मधुगंधि समीरण येती भेटाया;
आलिंगुनि सांगती 'काळ हा दवडुं नको वांया' ll ३ II

हास्यवदन ही सुमनमंडळी उठुनि उष:कालीं;
दहिंवरतोयें जणुं कां प्रात:स्नान करित बसली ll ४ II

प्रसन्नवदना वनलक्ष्मी ही शुचिर्भूत दिसते;
नानाविध नवपल्लव वाहुनि देवपुजा करिते ll ५ II

तरुवर उठले, प्रफुल्ल झाले, आनंदें डुलती;
तन्मय होउनि मानसपूजा जणुं का हे करिती ll ६ II

विहंग उठले गाउं लागले तरुवरी केव्हांचे;
मंजुळ वाणी ऐक, जणुं हे गायक स्वर्गीचे ll ७ II

गगनविहारी खग वैतालिक वायूवरि बसुनी;
प्रभुगुण गाती उंच अंबरीं तल्लिन होऊनी ll ८ II

खळखळ वाहत लगबग येती तटिनी गिरिवरुनी;
देवदर्शना जणुं चालल्या भाविक या तरुणी ll ९ II

तरुवसनावृत्त तुंग पुरातन पर्वत हे दिसती;
वल्कलधारी, आद्यऋषी जणुं ध्यान धरुनि बसती ll १० II

जिकडे तिकडे मंगलमय हें भूमंडल दिसतें;
ऊठ मानवा! आळविं प्रभुला जाइं शरण त्यातें ll ११ II


 दत्तात्रय कोंडो घाटे (दत्त)

5 October 2012

माय

जसा दिस बुडून जाई काळोखाचे राज्य असे
आम्ही बसू दरवाज्यात झोपडीत साधा दिवा नसे

घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे
भाकरी जात बडविल्या कुठे चून कुठे वांगे

नाकात जाई वास त्याचा पोटात असे अंधार सारा
तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यांत धारा

अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई
डोई तिच्या भारा असे, चालतांना तोल जाई

काळी काळी, कृश देह, ती असे माझी माय
वणवण सकाळपासून मोळीसाठी रानात जाय

वाट पाहात बसू कधी तिची, सारे आम्ही भाऊ
मोळी नसे विकत तेव्हा, भुकेलेले झोपी जाऊ

एकदा काय झाले कसे, आम्हा काही कळले नाही
माय आली पाय बांधून भळाभळा रक्त वाही

चावला साप मोठा काळा दोन बाया होत्य सांगत
फणा काढून मारला त्याने हळूच गेला निघून रांगत

माय पडली धरणीवर... गंडे झाले, मंत्र झाले, वैद आला
दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला

हंबरडा फोडला आम्ही, तो विरला वाऱ्यावर
माय तरी सोडून गेली चिल्लेपिल्ले वाऱ्यावर

शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो
दिसता कृश मोळीवाली मोळी तिची विकत घेतो.



 वामन निंबाळकर (वामन सुदामा निंबाळकर)

4 October 2012

दीपविसर्जन

(एके दिवशी संध्याकाळी नर्मदातटावर कांही मुली दिवे सोडीत होत्या; तो प्रसंग स्मरून हि कविता लिहीली होती.)


करीं आरती घेउनी आर्यबाला
त्वरें पातल्या नर्मदेच्या तटाला;
करूनी तयांनीं सरित्पूजनाला
प्रवाहीं दिली सोडुनी दीपमाला. ।।१।।

अहा काय शोभा वदूं त्या क्षणाची
तृषा शांत झाली मदीयेक्षणांची;
तदा अस्तगामी जरी अंशुमाली
मना वाटलें यामिनी काय झाली. ।।२।।

सरित्पात्र तें स्वच्छ तैसें विशाल
तदा भासलें कीं दुजें अंतराल;
तती त्यावरी शोभली दीपिकांची
उदेली जणों पंक्ति कीं तारकांची. ।।३।।

जशी अंतरिक्षी फिरे चंद्रकोर
प्रवाहीं करी रम्य नौकाविहार;
नभीं स्वैर संचारती मेघखंड
जलीं खेळती वीचि तैशा उदंड. ।।४।।

अशी दिव्य शोभा पहातां पहातां
मनी शांत झालों, लया जाय चिंता;
झणी सूचली कल्पना एक चित्ता
असे सर्व सृष्टीस जी मूलभूता. ।।५।।

दिले सोडूनी दीप जें बालिकांनीं
दिला सारिखा वेग सर्वां तयांनीं
तयांची स्थिती तत्क्षणी भिन्न झाली
वरी दृष्य कोणी, कुणी जाय खालीं. ।।६।।

कुणी गुंतुनी राहिले भोव‍र्‍यात
जलौघासवें जाय कोणी वहात;
तयांतील काही तटा अन्य गेले
पुढें जाउनी अल्प मागेंचि आले. ।।७।।

जसे दीप तैसे असंख्यात जीव
प्रभू निर्मितो, थोर ज्याचा प्रभाव;
तयां सोडुनी देत काल-प्रवाहीं
वहाती तदौघासवें सर्व देही. ।।८।।

कुणी रंक होई, कुणी होय राजा
दुजा देखणा हो, तिजा हीनतेजा;
कुणी मूर्ख होई, कुणी हो शहाणा
कुणी धैर्यशाली, तसा भ्याड जाणा. ।।९।।

"तसे कां करावें ?" "असें मी करींन"
वृथा वल्गना मानवांच्या अजाण;
स्थितीचा असे किंकर प्राणिमात्र 
स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र. ।।१०।।

जरी राहिलें नर्मदातीर दूर
जरी आज बाला न दृष्टीसमोर;
स्मरोनी तरी दीपसर्गप्रसंग 
झणी हर्षयोगें भरे अंतरंग. ।।११।।



 माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक)

1 October 2012

राजहंस माझा निजला

(पतिनिधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या एक मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर असा भ्रम होणार नाही ?)

हे कोण बोललें बोला ? 'राजहंस माझा निजला !'।। ध्रुo ।।

दुर्दैवनगाच्या शिखरीं । नवविधवा दुःखी आई !
तें हृदय कसें आईचे । मी उगाच सांगत नाहीं !
जें आनंदेही रडतें ! दु:खात कसें तें होई––
हें कुणी कुणा सांगावें !
आईच्या बाळा ठावें
प्रेमाच्या गांवा जावें––
मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला ! '।। १ ।।

मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।
होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।
मग हृदय बधिरची झालें । अति दुःख थिजवि चित्ताला ।
तें तिच्या जिवाचें फुल !
मांडीवर होत मलूल !
तरि शोकें पडुनी भूल––
वाटतची होतें तिजला । 'राजहंस माझा निजला !' ।। २ ।।

जन चार भोवतीं जमले । मृत बाळा उचलायाला ।
तो काळ नाथनिधनाचा । हतभागि मना आठवला ।
तो प्रसंग पहिला तसला । हा दुसरा आतां असला !
तें चित्र दिसे चित्ताला !
हें चित्र दिसे डोळयांला !
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुनि वदे ती सकलां । 'राजहंस माझा निजला !' ।। ३ ।।

करूं नका गलबला अगदीं । लागली झोप मम बाळा !
आधीच झोंप त्या नाहीं । खेळाचा एकच चाळा !
जागतांच वार्‍यासरसा । खेळाचा घेईल आळा !
वाजवूं नका पाऊल !
लागेल तया चाहूल !
झोंपेचा हलका फूल !
मग झोंपायाचा कुठला ! राजहंस माझा निजला ! ।। ४ ।।

हें दुध जरासा प्याला । आतांसा कोठें निजला !
डोळयाला लागे डोळा । कां तोच भोंवतीं जमलां ?
जा ! नका उठवु वेल्हाळा । मी ओळखतें हो सकलां !
तो हिराच तेव्हां नेला !
हिरकणीस आता टपलां !
परि जिवापलिकडे याला­––
लपवीन ! एकची मजला ! राजहंस माझा निजला ! ।। ५ ।।

कां असलें भलतें सलतें । बोलतां अमंगळ याला ?
छबकडयावरुनि माझ्या या । ओंवाळुनि टाकिन सकलां !
घेतें मी पदराखालीं । पाहूंच नका लडिवाळा !
मी गरीब कितीही असलें ।
जरि कपाळ माझें फुटलें ।
बोलणें तरी हें असलें­­––
खपणार नाही हो मजला ! राजहंस माझा निजला ! ।। ६ ।।

हें असेंच सांगुनि मागें । नेलात जिवाचा राजा !
दाखविलाहि फिरुनी नाहीं । नाहिंत कां तुम्हां लाजा ?
न्यावयास आतां आलां । राजहंस राजस माझा !
हा असा कसा दृष्टावा ?
कोणत्या जन्मिचा दावा ?
कां उगिच गळा कापावा––
पाहुनी गरिब कोणाला । राजहंस माझा निजला ! ।। ७ ।।

हे काळे कुरळे केश । खेळतात डोक्यावरतीं ।
ही दृष्टि पहा मम वदनीं । नेहमी अशी ही असती ।
हें तेज अशा रत्नांचे । झालें का आहे कमती ?
कानांत नाचती डूल,
तोंडावर हंसरें फूल,
जीवाची घालुनी झूल­­­ ––
मी असाच झांकिन याला । राजहंस माझा निजला ! ।। ८ ।।

या अर्ध्या उघडया नयनीं । बाळ काय पाहत नाहीं ?
या अर्ध्या उघडया तोंडीं । बाळ काय बोलत नाहीं ?
अर्थ या अशा हंसण्याचा । मज माझा कळतो बाई !
हें हंसे मुखावर नाचे !
जणुं बोल दुग्धपानाचे !
की मुक्या समाधानाचे !
इतुकेंहि कळे न कुणाला–– । राजहंस माझा निजला ! ।। ९ ।।

या माझ्या मानससरसी । सारखें प्रेमजल वाही ।
त्या तरंगलहरींवरतीं । राजहंस पोहत राही ।
सारखा पोहुनी दमला । मग मला भुकेला बाही !
नयनांच्या शिंपांमधुनी,
अश्रूंचे मौक्तिकसुमणी,
मी दिले तया काढोनी,
मोत्यांचा चारा असला । राजहंस खाउनी निजला ! ।। १० ।।

ते वैकुंठेश्वर गेले । पदीं त्यांच्या अर्पायाला ।
ही अखंड या अश्रूंची । वैजयंति मोहनमाळा !
मी करित असें केव्हाची । धरुनियां उराशी बाळा ।
कौस्तुभ हा माळेमधला !
हृदयाचें कोंदण याला !
तो चोराया कां आलां ?
दैत्याहुनि दैत्यचि झालां ! राजहंस माझा निजला ! ।। ११ ।।

हें असें जाहलें म्हणतां । तरि देवचि निजला कां हो ?
जरि निर्दय होऊनि निजला । आळवीन फोडुनि टाहो ।
कीं असा पोटचा गोळा । पोटातचि देवा राहो !
ही कु​र्‍हाड आकाशाची,
मजवरती पाडायाची,
नाहीच कल्पना त्याची,
हा तुमचा कावा सगळा ! राजहंस माझा निजला ! ।। १२ ।।

जरि दूत यमाचे आले । लाडक्यास या न्यायाला ।
ते निष्ठुर असले तरिही । भुलतील पाहुनी याला ।
हृदयाचें होऊनि पाणी । लागतील चुंबायाला ।
मी मुका असा घेतांना––
हा पहा–– पुन्हां हंसला ना ?
कां अशा फिरवितां माना ?
सुख खुपे काय डोळयांला? राजहंस माझा निजला ! ।। १३। ।

हें सर्वस्वाचें फूल । त्या भंवतीं झालां गोळा ।
मी बघतें–– कधिंचा आहे । त्यावरतीं तुमचा डोळा !
एकदां करावा त्याचा । वादानें चोळामोळा !
सर्वांच्या मनिचा लाहो,
हाच ना ? स्पष्ट बोला हो,
मी इतकी वेडी का हो––
कीं हेंही कळेना मजला । राजहंस माझा निजला ! ।। १४ ।।

जरि होउ नये तें झालें । तरि सोडणार या नाहीं !
पाळणाहि रुततो ज्याला । प्रेमें जरि निजवी आई !
तो देह खांच दगडांत– छेः । नको नको ग बाई !
हृदयाची खणुनी खांच,
झांकिन मी बाळ असाच,
दुःखांचे फत्तर साच !
जा ! जाउनि सांगा काळा । 'राजहंस माझा निजला !' ।। १५ ।।

जरि काळाचाहि काळ । बाळाला न्याया आला !
तरि नाहीं मी द्यायाची । या जीवाच्या जीवाला !
सारखीं गाउनी गाणीं । निजवीन कल्पवर याला !
जा ! करा आपुलें काळे !
माझेही दमले डोळे !
प्राणांचें पसरुनि जाळे––
मी निजतें घेउनि याला ! राजहंस माझा निजला !" ।। १६ ।।
––– ––– –––
सांगुनी असें सकलांशीं । मृत बाळा उराशीं धरुनी ।
तन्मुखी स्वमुखी ठेवोनी । चुंबिलें एकदा फिरुनी ।
पाहिलें नीट निरखोनी । झणिं तीही गेली निजुनी ।
मग पुन्हां कधी ती उठली,
जाणीव कुणा ही कुठली ?
परि मति या प्रश्नें हटली––
'' बोलेल कोण या बोला । राजहंस माझा निजला !" ।। १७ ।।

मग माता-पुत्रांवरि त्या । तरु गाळिती कोमल पानें ।
ढाळिती लता निज सुमनें । पशुपक्षिहि रडती गानें ।
दशदिशा दगडही कढती । मन दुभंगुनी शोकानें ।
दुमदुमतें स्थळ तें अजुनी,
त्या एकच करुणागानीं,
जा जाउनि ऐका कानीं !
ऐकाल याच बोलाला–– "राजहंस माझा निजला !" ।। १८ ।।



– राम गणेश गडकरी

("वाग्वैजयंती" - जुलै, १९१२)