रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

September 28, 2012

चिमणा वासुदेव

वासुदेव आला दारीं, वासुदेव आला,
चिमणा वासुदेव आला

टोपीवर मोरपिसांला
खोवुनियां येथें आला,
कांहीं दान करा त्याला ! दारीं वासुदेव आला.

बांधुनियां घुंगुरू पायीं
थय थय थय नाचत येई.
सुखवी गाऊनी तुम्हांला l दारीं वासुदेव आला.

'द्याल जरी पैसा एक,
देव तुम्हां देइल लाख
माई, धर्म करा याला' l दारीं वासुदेव आला.

'वडिलांच्या तुमच्या नांवें
पैशाचें दान करावें,
माई पुण्य मिळविण्याला' l दारीं वासुदेव आला!.

नाचुनियां आतां थकला,
द्या एकच पैसा त्याला
खाऊ गोड घ्यावयाला l दारीं वासुदेव आला.- के. नारखेडे

(‘कुटुंब रंगलंय काव्यात’ मधून.) 

September 14, 2012

भुईनळ्यांचे झाड फुलांचे

भुईनळ्यांचे झाड फुलांचे
भिडे निळ्या आभाळी रे
आली फुलवित हासत उजळीत
लक्षदिप दिपवाळी रे

जमला मेळा गोपाळांचा
धुमधडाका फटाकड्यांचा
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर निळ्या आभाळी रे

अवती भवती चंद्रज्योती
हासत उधळत माणिक मोती
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर पहाटवेळी रे(अज्ञात कवी)

September 13, 2012

ग्रीष्मातल्या सकाळी

ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ
अन विस्कटून गेले सारे प्रभात रंग

पाहून मम उदासी चाफा हसून बोले
सद्भाग्य केवढे हे! आले भरून मेघ

होतील वादळे अन सो सो सुटेल वारा
अन नाचतील झाडे, होईल शांत आग

झळकेल वीज गगनी, घन वर्षतील धो धो
चमकेल इंद्रधनुही दावीत सात रंग

होईल तृप्त धरणी; मृदगंध दरवळेल
होतील पाखरे हि गाण्यात दंग गुंग

तूही खुळे! पहा ना सोडुनिया उदासी
गा तू तुझेही गाणे; आले भरून मेघ- पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे)(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)