A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

20 August 2012

मराठी भाषेची प्रशस्ति

जैसी हरळांमाजीं रत्नकिळा l
कीं रत्नांमाजी हिरा निळा l
तैसी भाषांमाजीं चोखळा l
भाषा मराठी ll१ll

जैसी पुष्पांमाजीं पुष्प मोगरी l
कीं परिमळांमाजीं कस्तुरी l
तैसी भाषांमाजीं साजिरी l
मराठिया ll२ll

पखियांमधें मयोरु l
रुखियांमधें कल्पतरू l
भाषांमधें मान थोरु l
मराठियेसी ll३ll

तारांमधें बारा राशी l
सप्तवारांमाजीं रवि-शशी l
या दीपिंचेया भाषांमधें तैसी l
बोली मराठिया ll४ll


- फादर स्टीफन्स

18 August 2012

फुलांची विनंति !

हळूंच या हो हळूंच या ! llध्रु०ll


गोड सकाळीं ऊन पडे
दंवबिंदूंचे पडति सडे
हिरव्या पानांतुन वरती
येवोनी फुललों जगतीं
हृदयें अमुचीं इवलींशीं
परि गंधाच्या मधिं राशी
हांसुन डोलुन
देतों उधळुन
सुगंध या तो सेवाया;
हळूंच या; पण हळूंच या ! ll१ll

कधिं पानांच्या आड दडूं
कधिं आणूं लटकेंच रडूं
कधिं वार्‍याच्या झोतानें
डोलत बसतों गमतीनें
तर्‍हेतर्‍हेचे रंग किती
अमुच्या या अंगावरतीं
निर्मल सुंदर
अमुचें अंतर
या आम्हांला भेटाया;
हळूंच या; पण हळूंच या !ll२ll


कुसुमाग्रज

17 August 2012

घरीं एकच पणती

घरीं एकच पणती मिणमिणती l
म्हणुं नको उचल चल लगबग ती ll ध्रु०ll

अगणित बांधव तव अंधारीं l
किर्र रान ! भय भंवतीं भारी l
चरणीं जिवाणू भरे शिरशिरी l
यमदूत न कीटक किरकिरती ll१ll

काळोखाच्या भयाण लाटा l
उठती फुटती बारा वाटा l
फेंस पसरला सारा कांठा l
कुणि म्हणो तारका लुकलुकती ll२ll

दिवे विजेचे धानिकमंदिरीं l
प्रकाश पाडिती परोपरि जरी l
स्नेहशून्य ते सदा अंतरीं l
कां करिसी तयांची शिरगणती ? ll३ll

अखंड नंदादीपज्योती l
दगडी देवा सोबत करिती l
नच बाहेरी क्षणभरि येती l
अप्सरा विलासी नसति सती ll४ll

धांव म्हणुनि तव घेउनि पणती l
हृदय नाचुं दे तिजसांगातीं l
सोन्याचे घर—दिसते माती l
रे पाहसि मागें वळूनि किती ? ll५ll

पहा पुढें या दीन लोचनीं l
रविकिरणांचें स्मरण होऊनी l
आशा नाचे ज्योत दुज्या क्षणि l
जरि विझे तरि करी कोण क्षिती ? ll६ll


- वि. स. खांडेकर

14 August 2012

वाट

वाट धावते धावते
चढ उतार घेऊन;
दु:ख गिळते हासत
आत हुंदका पिऊन !
दूर आभाळ सांगते
अंत जगण्यास नाही;
आज लहान रोपटं
उदया उंच झाड होई !
कसे नियतीचे हे असे
उन्हंसावलीचे खेळ;
चंद्र उगवतो तीच
सूर्य अस्ताचीही वेळ !
कुणी मागतात काय
काय कुणास मिळते;
मन फुलाचेही असे
कधी काट्यात जळते !
येथे उलटी वाहते
रे न्यायाचीही गंगा;
झाले इमान पोरके
नीती माजाविते दंगा !
नाही कुणाची कुणाला
इथे राहिलेली चाड;
पुण्य करपून जाई
वाढे पापाचेच झाड !
वाट धावते धावते
चढ उतार घेवून;
काय सांगावे सोडेल
कुठे जगणे नेऊन !


- फ. मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजीराव शिंदे)

पापाची वासना नको दावूं डोळां

पापाची वासना ------- नको दावूं डोळां I
त्याहुनी अंधळा ------ बराच मी II १ II

निंदेचें श्रवण ----------नको माझे कानीं I
बधिर करोनि -------- ठेवीं देवा II २ II

अपवित्र वाणी ---------नको माझ्या मुखा I
त्याजहुनि मुका ------ बराच मी II ३ II

नको मज कधी -------परस्त्री संगति I
जनातुन माती ------ उठतां भली II ४ II

तुका म्हणे मज ------अवघ्याचा कांटाळा I
तू एक गोपाळा -------आवडसी II ५ II


- संत तुकाराम (तुकाराम बोल्होबा मोरे (आंबिले)

13 August 2012

जो जो रे (अंगाईगीत)

[जाति : चंद्रभागा]

जो जो जो जो रे !ll ध्रु० ll

निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा,
निज रे लडिवाळा !
बाळ गुणी, झोंप नेलि रे कोणी?
जो जो जो बाळा ! ll १ ll

घरटीं ती फांद्यांमधुनी झुलती,
निजले चिउकाऊ;
निजवीती, झुळका गाउनि गीती;
गाणीं किति गाऊं ? ll २ ll

हम्मा ही, दूदू देउनि पाहीं
निजली गोठ्यांत;
रे छबिल्या, राघूमैना निजल्या
अपुल्या पिंजर्यात. ll ३ ll

या वेळीं, निजलीं झाडें वेली;
निजला चांदोबा;
रात्र किती, चढली काळी भवतीं
आला बागुलबा ! ll ४ ll

शुक्क गडे, झालें जिकडे तिकडे;
झोंप न तुज बाळा !
खिंदळशी, खुदुखुदु खुदुखुदु हंसशी,
एकच हा चाळा ! ll ५ ll

लडिवाळा, रुणुझुण घुंगुरवाळा
पायीं वाजविशी,
कशि बाळा, झोंप शिवेना डोळां ?
अफु आली तुजशीं ! ll ६ ll

सटवाई, षष्ठिदेवि, जोखाई,
सांभाळा याला.
न शिवो तें, पाप अमंगल भलतें
माझ्या छबिल्याला ! ll ७ ll


— भा. रा. तांबे

मरणांत खरोखर जग जगतें


[जाति: नववधू]

मरणांत खरोखर जग जगतें;
अधि मरण, अमरपण ये मग तें. ll ध्रु० ll

अनंत मरणें अधीं मरावीं,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें. ll १ ll

सर्वस्वाचें दान अधीं करिं,
सर्वस्वच ये स्वयें तुझ्या घरिं,
सर्वस्वाचा यज्ञ करीं तरि,
रे ! स्वयें सैल बंधन पडतें. ll २ ll

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा;
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा !
का यज्ञाविण कांहीं मिळतें ? ll ३ ll

सीता सति यज्ञीं दे निज बळि,
उजळुनि ये सोन्याची पुतळी,
बळी देउनी बळी हो बळी,
यज्ञेंच पुढें पाउल बढतें. ll ४ ll

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो,
स्वसत्त्वदानें पाश छेदितो,
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो,
रे स्वभाव हा ! उलटें भलतें. ll ५ ll

प्रकृति-गती ही मनिं उमजुनियां
उठा वीर, कार्पण्य त्यजुनियां;
'जय हर !' गर्जा मातेस्तव या !
बडबडुनी कांहीं का मिळतें ? ll ६ ll


— भा. रा. तांबे

कां रे नाठविसी

कां रे नाठविसी कृपाळु देवासी ।
पोसितो जगासी एकला तो ॥१॥

फुटे तरुवर उष्ण-काळ-मासीं ।
जीवन तयांसी कोण घाली ॥२॥

बाळा दुधा कोण करितें उप्तत्ति ।
वाढवी श्री-पति सवें दोन्हीं ॥३॥

तेणें तुझी काय नाहीं केली चिंता ।
राहें त्या अनंता आठवूनी ॥४॥

तुका म्हणे ज्याचे नांव विश्वंभर ।
त्याचे निरंतर ध्यान करीं ॥५॥


- संत तुकाराम

11 August 2012

सारीं फुलेंच फुलें!


[शार्दुलविक्रीडीत]
आकाशांत फुलें, धरेवर फुलें, वार्‍यावरीही फुलें,
माझ्या गेहिं फुलें, मनांतहि फुलें, भूगर्भि सारीं फुलें !!
माझें चित्त भुले, सुगंध सुटले! हें विश्व आनंदलें !
कोणी अकळिलें? कुणास कळलें उद्यान विस्तारलें ! १

नक्षत्रें, सुमनें, विहंगम, मुलें, काव्यें, मणी! हीं जरी
नांवें भिन्न, खरोखरी मज फुलें हीं रम्य सारीं तरी !
घेतों ह्यांतुन थोडका रस! पुन्हां त्यांच्याकडे धांवतों,
धांवाधांव म्हणा, परी हिजमध्यें कैवल्य मी पावतों ! २

जातीच्या भ्रमरास 'सोडुन फुलें ये फोड हीं लांकडें ! '
ऐसें कोण म्हणेल? कोण भलतें घालील हें सांकडें ?
देवानेंच जयास पुष्प-हृदयीं खेळावया निर्मिलें,
त्याला वृत्ति दुजी सुचेल कुठुनी? प्राणा जरी घेतलें ! ३

बोला "चंचल हा क्षणांत गगनीं धांवे क्षणे भूवरीं !
हा वार्‍यावर! हा गृहीं! निज मनीं! हा भूमिच्या भीतरीं ! "
हांसा मानुनियां निरर्थ मम हो ह्या गोड गुंजारवा !
माझे जन्मच हे फुलां निरविले! भीतों नमी मानवा ! ४

[द्रुतविलंबित]

मज गमे मजसाठिं जगत्पती,
फुलवितो अवघ्या जगताप्रती !
भ्रमर मी रस सांठविं चाखुनी,
मजसमान रसज्ञ न हो जनीं ! ५


[पादाकुलक]

जाइन सोडुन ह्या जगताला,
ठेवुन हा मधुकोश तुम्हांला,
तोंवर आड नका मज होऊ !
पाप नका कुणि हें शिरीं घेऊ ! ६



— नारायण वामन टिळक