रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

April 18, 2012

वाढदिवस

'दीपका' ! मांडिले तुला, सोनियाचे ताट
जडविला, घडविला, चंदनाचा पाट

घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्याची करू सोपी पायवाट

घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी

घाशिली समई मीही केली तेलवात
दह्यात हा कालविला जिरेसाळ भात

गा रे राघू, गा ग मैने, बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी

कुतु-काऊ, चिऊ-माऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रे

गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये ! कुलदेवी ! –  बा. भ. बोरकर


जिरेसाळ - भाताचा प्रकार

April 10, 2012

भोंवरा

भोंवरा, फिरे गरगरा, पहा हा जरा
विसावा नाही, विसावा नाही,
त्या कितीहि फिरवा, थकवा येइ न काहीं ll १ ll

खिळ्याचे टोंक, तयावर झोंक, पाहुनी रोख
कसा सांभाळी, कसा सांभाळी
शाबास भोंवर्‍या ! कमाल केलिस वेळी ll २ ll

नाचतो, उभा राहतो, अहा डोलतो !
स्तब्ध कधि राही, स्तब्ध कधि राही
मग असे वाटते, मुळि तो फिरतच नाही ll ३ ll

गुंगणे, कोण पण जाणे ! तयाचे गाणे,
जसा की भुंगा, जसा की भुंगा,
करि गुड्गुड् अपुल्याशीच, घालितां पिंगा ll ४ ll

आकार, मनोहर फार, कशी ही आर
रंग किति नामी, रंग किति नामी !
तो खिशात घालुन शाळेतहि नेतो मी ll ५ ll

किति तरी, लोभ त्यावरी ! पहा तर करी,
असा फिरवीतो, तसा फिरवीतो,
वरच्यावर फिरवुन, हातावर तो घेतो ll ६ ll


— के. ना. डांगे

April 9, 2012

कुणकूण


वाळली सारी फुले, उरला तरीपण वास हा
लोपली वनदेवता, पण राहिला वनवास हा

पालवी झडली, तरी उरले जुने पण पान हे
गाव ते उठले, तरी उरले अजून वसाण हे

अग्नि तो विझला जरी, निघतो तरी पण धूर हा
वेदना सरली जरी, सुकतो तरी पण नूर हा

घोर वादळ संपले, पण राहिली हुरहूर ही
चंद्रिका विझली, तरी उरलीच रात्र निसूर ही

वाद ते मिटले, तरी पण राहिलेत विषाद हे
साद ओसरले, तरी पण राहिले पडसाद हे

घाव तो बुजला जरी, उरली तरी पण खूण ही
ते रहस्यच लोपले, पण राहिली कुणकूण ही


- ना. घ. देशपांडे

April 6, 2012

विझता विझता स्वत:ला

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही, असेही नाही


- नारायण सुर्वे

(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

April 5, 2012

बिनभिंतीची शाळा

बिनभिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरु,
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू.

बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया त्या भुंग्यांचा.
फुलाफुलांचे रंग दाखवित
फिरते फुलपाखरू...

हिंडू ओढे, धुंडू ओहळ,
झाडावरचे काढू मोहळ
चिडत्या, डसत्या मधमाश्यांशी
जरा सामना करू...

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
ऐन दुपारी पऱ्ह्यात पोहू.
सायंकाळी मोजु चांदण्या
गणती त्यांची करू.


— ग. दि. माडगुळकर

April 3, 2012

माणूसपण गारठलंय

पूर्वी कसा पाऊसकाळ
चार महिने असायचा,
हिरवंगार रान पाहून
माणूस खुशीत हसायचा.

प्रत्येकाची कणगी भरून
धान्य मोप असायचं,
दुधदुभतं, तूप, लोणी
याला माप नसायचं.

पासाभरून धान्य तर
चिमणीच दारात टिपायची,
पै-पाहुण्यांसाठी माय
दिवसरात्र खपायची.

सणवार जत्रांमधून
किती जल्लोष असायचा,
भजन कीर्तन करीत गांव
आख्खी रात्र बसायचा.

एवढ्या तेवढ्या पावसावाचून
सारं चित्र पालटलंय,
गांवपण हरवल्यानं
माणूसपण गारठलंय.


— शशिकांत शिंदे

देव अजब गारोडी (धरत्रीच्या कुशीमधी)

धरत्रीच्या कुशीमधी
बियबियानं निजली,
ऱ्हे पसरली माटी
जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले वऱ्हे,
गह्यरलं शेत जसं
आंगावरती शहारे

ऊन वार्‍याशी खेयता
एका एका कोंबातून,
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी,
जसे करती कारोन्या
होऊ दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ
रोपं झाली आता मोठी,
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी

कसे वार्‍यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !


— बहिणाबाई चौधरी

April 2, 2012

आपणच आपल्याला

आपणच आपल्याला लिहलेली
पत्रं वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावित वार्‍यावर पानं....
थोडसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधीतरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं.......

आपणच जपावेत मनात;
वार्‍यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी धावणारी पायवाट, अन्
जपावेत काही नसलेले भास......

जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास........


- अनुराधा पाटील

पाऊस

पाऊस असतो तलम पोताचा
कापुरी कायेचा रेशमी हाताचा ...

पाऊस असतो खरा सहोदर
नभात जाऊन गाठतो सागर ...

पाऊस असतो जीवाचा भावाचा
सुख - दु:खांतून डोळ्यात यायचा ...

पावसाची दृष्टी असते सारखी
पहाड असो वा टेकडी बारकी ...

पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी
ट्याची नदीत, नदीची सागरी ...

पाऊस सोसतो विजांचा सुकाळ
तरी अमृताचे ओठांत कल्लोळ ...

पावसासारखं कुठं नातं गोतं?
काहीच न घेता फक्त राही देत ...

पाऊस रिकाम्या हातानं येईना
जाताना काहीही घेऊन जाईना ...

— विठ्ठल वाघ

(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

जनता अमर आहे

जनतेच्या पोटामध्ये
आग आहे, आग आहे;
जनतेच्या डोळ्यांमध्ये
शंकराचा राग आहे ...

जनतेच्या ऐक्यामध्ये
लाव्हाची लाट आहे;
जनतेच्या पायांपुढे
प्रकाशाची वाट आहे ...

जनतेच्या हृदयामध्ये
अन्यायाची कळ आहे;
जनतेच्या बाहूंमध्ये
सागराचे बळ आहे ...

जनतेच्या एच्छेमध्ये
नियतीचा नेट आहे;
जनतेच्या हातांमध्ये
भविष्याची भेट आहे ...

जनतेच्या नसांमध्ये
लाल लाल रक्त आहे;
जनतेच्या सत्तेखाली
पृथ्वीचे तख्त आहे ...

जनतेच्या मुक्तीसाठी
अजून एक समर आहे;
आणि जिचा आत्मा एक
ती जनता अमर आहे ...— विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर)