रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

February 29, 2012

आतां उजाडेल !

खिन्न आंधळा अंधार
आतां ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !

शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !

वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !

आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधांत थरारेल
आतां उजाडेल !

फुलतील नकळत
कळ्यांतले देवदूत
निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल
आतां उजाडेल !

निळें आकाश भरून
दाही दिशा उजळून
प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फुरेल
आतां उजाडेल !

आज सारें भय सरे
उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल
आतां उजाडेल !


— मंगेश पाडगांवकर (१९५०)

माझी आई

नीज न ये तर गीत म्हणावे,
अथवा झोके देत वसावें;
कोण करी हें जीवेंभावें ?
ती माझी आई....।। १ ।।

रडवें माझे वदन बघोनी,
भूक लागली हें जाणोनी,
कोण उगें करि मज पाजोनी ?
ती माझी आई....।। २ ।।

हसतां मजला पाहुनी हसते,
मुके मटामट किति तरि घेते,
परि अंतरिं जी तृप्त न होते,
ती माझी आई....।। ३ ।।

येई दुखणें तेव्हां जपते,
सुखवाया मज अतिशय झटते,
परोपरी करि उपचारांतें,
ती माझी आई....।। ४ ।।

चालत असतां पडलों पाहुनि,
उचलाया मज येई धावुनि,
गोंजारी पोटाशी धरुनी,
ती माझी आई....।। ५ ।।

स्मरण तुझ्या ममतेचे होई,
तव उपकारां सीमा नाहीं,
कैसा होऊ मी उतराई,
गे माझे आई ? ।। ६ ।।


- अज्ञात

थांब पावसा ऊन पडूं दे

उघड पावसा ऊन पडूं दे
उडूं बागडूं हंसूं खेळूं दे !

कळी उमलुं दे फुला फुलूं दे,
पानें वार्‍यामध्यें डुलूं दे
टपटप खालीं थेंब पडूं दे
तालावर त्या मला नाचुं दे II १ II

पाय उठवुं दे वाळूवरती
समुद्र झाला ! आली भरती,
आभाळ पडे खोल खालती
डोकावुनि ढग आंत पाहुं दे ! II २ II

उंच चालल्या घारी वरतीं
बगळे रांगा धरुनी उडती;
ढगांत भरभर रंग बदलती
पाठशिवणिचा खेळ बघू दे ! II ३ II

चिमणी ओले पंख सुकविते
घरट्यामधुनी पिलू पहातें
मुंगी रांगेमधें धांवते
साखर-खाऊ तिला घालुं दे ! II ४ II

जाळीं कोळ्यांचीं बघ भिजती
हिर्‍यासारखे थेंब चमकती;
रंग त्यांवरी सुंदर खुलती
थांब पावसा हार करुं दे ! II ५ II

बसे फुलावर फूलपांखरुं
मला सांगतें मौज चल करुं
थांब पावसा ऊन पडूं दे
गातां गातां मला खेळूं दे ! II ६ II


- श्रीधर बाळकृष्ण रानडे

February 27, 2012

आम्ही तर जंगलची पांखरें

शेत-माउली आमुच्यासाठी, आम्ही तिची लेंकरें
आम्हांला कमी कोणते बरें ?
उजाडतां दिन खावा भाजुन रोज तुरीचा हुळा,
जरा का जठराग्नी कावला
वाणीच्या कसदार नारळी हुरड्याची ती चवी
पांचही पक्वान्नां लाजवी
माघातिल चवदार हरभरा ऐन रकाण्यावरी
थोडकी काय मजा दे तरी
खुडुनि मुगाच्या शेंगा कधि कोंवळ्या
जातां येतां खाव्या पाट्यांतल्या
गुळचट शेंगा चवळीच्या वां जरठ पोपटी भल्या
लागती भाजुनि किती चांगल्या ! II १ II


तोडावी कधिं बोरें कांटे काठीने दाबुनी
हिंडतां काष्ठी रानीं वनीं
मध चाखावा गोड मोहळा वरच्यावर झाडुनी
फिरकतां दाट चिलाटींतुनी
किति सेवावी जंगलच्या या मेव्याची माधुरी
फळे तशिं खावीं तीं कितितरी
पसरुनि पानावरी शिदोऱ्या सोडाव्या तरुतलीं
करावी दुपारची न्याहरी
बाजरिची ती गोड शिळी भाकरी
लसूण कांदा चटणी मग ती वरी
मारित मिटक्या येथेच्छ खातां सुधा तुच्छ बापुडी
सुरांची पडेल नवल न उडी ! II २ II


स्फटिकासम हा निर्मळ झुळझुळ जवळ वाहता झरा
ओंजळी भरून प्यावें जला
गुरें पोहणी द्यावीं काळेशार डोह पाहुनी
डुबावें तुडुंब जली मागुनी
गर्द सांवली आंब्याखाली काय मजा लोळतां
वायुची झुळुक गार लागतां
फुंकुनि पावा नाद भरावा गोड वनीं सुस्वरीं
चढोनी रातीं माळ्यावरी
धनवंता-घरिं काय कुणा यासम
लाभतील ही गोड सुखें निरुपम
महाल-माडी आम्हां झोपडी रान सदा मोकळे
आम्ही तर जंगलची पांखरें ! II ३ II


- पांडुरंग श्रावण गोरे

(Compiled by Ms. Sushama Sahasrabuddhe)

February 25, 2012

पहा टाकले पुसुनी डोळे

पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका,
रणांगणी जा सुखे राजसा परतुनि पाहू नका !

झडे दुंदुभी झडे चौघडा
रणरंगाचा हर्ष केवढा
एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका !

शकुनगाठ पदरास बांधुनी
निरोप देते तुम्हां हासुनी
आणि लाविते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका !

या देशाची पवित्र माती
इथे वीरवर जन्मा येती
तोच वारसा तुम्ही पोचवा येणाऱ्या शतका !  शांता शेळके

February 23, 2012

श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन

स्वच्छ निळसर रिकामे अंबर
नारद तुंबर अभ्र विरे

कधी केले होते गंधर्वांनी खळे
स्वत:शीच खेळे चंद्रबिंब

पांगले अवघ्या वैष्णवांचे भार
ओसरला ज्वर मृदुंगाचा

मंदावली वीणा विसावले टाळ
परतूनी गोपाळ घरी गेले

स्थिरावला हार वाळली पाकळी
गुंतली फासळी निर्माल्यात


- अरुण कोलटकर


(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

February 18, 2012

भिल्लाचा पोर

उंच उंच डोंगर भवती I चढले नील नभांत
भिरभिर वारा व्यापुनियां I टाकी सारा प्रांत II १ II

तरुवेलींनीं फुललेल्या I त्या खोऱ्यांत सुरेख
झुळझुळ वाहे निर्झरिणी I स्फटिकावाणी एक II २ II

तोंच कुणी चपळाईनें I डोंगर वेधुन थोर
करवंदे विकण्यासाठी I ये भिल्लाचा पोर II ३ II

शाळिग्रामासम काळा I देह कसा घोटींव
तेजदार नागावाणी I दिसे कोवळा जीव II ४ II

स्वच्छ गोल डोळ्यांत नसे I भीतीचा लवलेश
साधा भोळा भाव मुखी I आणि दिसे आवेश II ५ II

ओठ चिमुकले विलग जरा I होती मधुन मधून
शुभ्र हिरकण्यांसम दिसती I दंत किती शोभून II ६ II

एक करीं घेऊनि परशू I दुसऱ्या हातीं द्रोण
"करवंदे घ्या करवंदे" I सांगतसे गर्जून II ७ II

असेल याची पर्णकुटी I जवळच रम्य निवांत
मातापितरांसह तेथे I रहात हा सौख्यांत II ८ II

स्वातंत्र्याचा खराखुरा I शाहिर आहे हाच
नागरवस्तीचा नाही I या जीवाला जाच II ९ II

पक्ष्यांची ऐकत गाणी I देत तयांना ताल
हिंडावे रानोरानीं I आनंदांत खुशाल II १० II

घाट सोडुनी कधीच ये I गाडी निघुनी दूर
परि न हले डोळ्यांपुढुनी I तो भिल्लाचा पोर. II ११ II— गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर)

सात रंग

रंग जांभळी कोणाचा ?
रंग बैगणी वांग्याचा ll १ ll

रंग निळा आकाशात
हिरवा नांदे गवतांत ll २ ll

पिवळा झेंडू कां डोले ?
नारंगी संत्रे खेळे ll ३ ll

लाल रंग तो रक्ताचा
तसा इंग्रजी राज्याचा ll ४ ll

सात रंग हे मिसळून
लख्ख पांढरे हो ऊन ll ५ ll


- ना. के. बेहेरे

विटीदांडूचा खेळ (तिथें असणार नाहीं आई)

विटीदांडूचा खेळ मजेदार
धूम चालुनियां लोटली बहार
गुंग झालेला बाळ खेळण्यांत
एक बाई मोटारींतुनि पहात II १ II

बघाया त्या गुटगुटित बालकास
झणीं थांबवि आपुल्या मोटारीस
तोंच मुलगा मोटारीवर चढून
म्हणे 'गाडी कां दिली थांबवून' ? II २ II

'तुला न्याया ही थांबविली पाहीं
झणीं बाबांना विचारून येईं'
'आई म्हणते, बाबांस असे नेलें
वरी देवानें त्यांस बोलाविलें' II ३ II

'बरें, जाउनियां कोट तुझा आण.'
'आई आहे शिवणार हो अजून.'
'बरें, चल तूं ऐसाच मोटारींत
घरीं अमुच्या देईन तुला कोट II ४ II

खेळ, खाऊ देईन तिथें राहीं '
बाळं उतरे मोटारीवरुनीही.
'घरीं अमुच्या कां सांग येत नाहीं' ?
'तिथें माझी असणार नाहीं आई' ! II ५ II- वा. गो. मायदेव

February 16, 2012

महाराष्ट्रलक्ष्मी

महाराष्ट्र-लक्ष्मी मातें जगी धन्य वाटे,
यशोगीत तीचें गातां मनी हर्ष दाटे. ll ध्रु. ll

पुन: पुन्हां परचक्रानें ताडिली बिचारी,
दिर्घकाल खचली होती पारतंत्र्यभारी,
द्वादशब्द दुष्काळाने जाहली भिकारी,
संकटात तीच म्हणोनी करी उंच माथे. ll १ ll

मावळांत वास, न ठावें जया बाह्य वारें,
नेमधर्म ज्यांचे लोकी कृषीकर्म सारें,
विळा कोयतींच जयांची काय तीं हत्यारें,
तेच वीर बनले समयीं मावळे मराठे. ll २ ll

न ये नीट धरितां ज्याला लेखणी करांनीं,
कृपादृष्टि संपत्तीची न ज्याचे ठिकाणी,
परी यवनसत्तेची जो करी धूळधाणी,
कोण तया शिवरायाच्या पावला यशातें ? ll ३ ll

साधुसंत झाले, असती, तयांची न वाण,
मात्र रामदासा लाधे समर्थाभिधान,
जो मनीं स्वदेशहिताचें धरोनी निशाण
ध्वजा कौपिनाची मिरवी भारतात थाटे. ll ४ ll

कढीभातखाऊ म्हणती ब्राम्हणां जगांत,
ढिली कांस ज्यांची म्हणुनी हांसती, हंसोत,
तयांनीच करणी केली प्रसंगी अचाट,
खोल गढे परसत्ता ती ढासळली लाथें. ll ५ ll

पुर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भाविकाळ,
बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ,
कासया वहावी चिंता मनीं मग जहाल,
रात्र सरे तेव्हां उगवे दिनहि पूर्ववाटे. ll ६ ll


- विनायक

निर्धार (उत्तेजनाचे दोन शब्द)


[दोहा]

जोर मणगटांतला पुरा
घाल घाल खर्ची;
हाण टोमणा, चल ना जरा
अचूक मार बर्ची ! ll १ ll

दे टोले जोंवरी असे
तप्त लाल लोखंड;
येईल आकारास कसें
झाल्यावर ते थंड ? ll २ ll

उंच घाट हा चढूनियां
जाणें अवघड फार;
परि धीर मनीं धरुनियां
न हो कधीं बेजार ! ll ३ ll

यत्न निश्चयें करुनी तूं,
पाउल चढतें ठेव;
मग शिखराला पोंचुनि तूं,
दिसशिल जगासि देव ! ll ४ ll

ढळूं कधींही देउं नको
हृदयाचा निर्धार;
मग भय तुजला मुळीं नको,
सिद्धि खास येणार ! ll ५ ll

झटणें हें या जगण्याचें
तत्त्व मनीं तूं जाण;
म्हणून उद्यम सोडूं नको,
जोंवरि देही प्राण ! ll ६ ll


- केशवसुत

हे कोण गे आई?

नदीच्या शेजारी I गडाच्या खिंडारी
झाडांच्या ओळीत I वेळूंच्या जाळीत
दिवसा दुपारी I जांभळी अंधारी
मोडके देऊळ I त्यावरी पिंपळ
कोण गे त्या ठायी I राहते गे आई ? ll १ ll
चिंचांच्या शेंड्यांना I वडांच्या दाढ्यांना
ओढोनी हालवी I कोण गे पालवी ?
कोण गे जोरानें I मोठ्याने मोठ्याने
शीळ गे वाजवी I पांखरां लाजवी ?
सारखी किती वेळ I ऐकू ये ती शीळ ? ll २ ll

वाळली सोनेरी I पानें गे चौफेरी
मंडळ धरोनी I नाचती ऐकोनी !
किती मी पाहिलें I इतकेची देखिलें --
झाडांच्या साउल्या I नदीत कांपल्या !
हांका मी मारिल्या I वांकोल्या ऐकिल्या ll ३ ll

उरांत धडधडे I धांवतां मी पडे
पळालो तेथून I कोण गे ये मागून ? ll ४ ll


- भा. रा. तांबे

February 13, 2012

अजुनि चालतोंचि वाट

अजुनि चालतोंचि वाट ! माळ हा सरेना !
विश्रांतिस्थल केव्हां यायचें कळेना !

त्राण न देहांत लेश, पाय टाकवेना,
गरगर शिर फिरत अजी होय पुरी दैना !

सुखकर संदेश अमित पोंचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलों दिवाणा !

कांटयांवरि घातलाचि जीव तयासाठीं
हंसवाया या केली किति आटाआटी !

हेंच खास घर माझें म्हणुनि शीण केला,
उमगुनि मग चूक किती अश्रुसेक झाला !

दिन गेले, मास तसे वत्सरेंहि गेलीं,
निकट वाटतें जीवनसंध्या ही आली !

कुठुनि निघालों, कोठें जायचें न ठावें,
मार्गांतच काय सकल आयु सरुनि जावें !

काय निरुद्देश सर्व जीवन मम होतें
मरुसरितेपरि अवचित झरुनि जायचें ते?

पुरे ! पुरे ही असली मुशाफरी आतां,
या धूळिंत दगडावर टेकलाच माथा !


- ए. पां. रेंदाळकर (एकनाथ पांडुरंग रेंदाळकर)

नवा शिपाई

(जाति-हरिभगिनी)
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,
तेच पतित कीं जे आखडिती प्रदेश साकल्याचा !
खादाड असे माझी भूक,
चतकोरानें मला न सुख;
कूपातिल मी नच मंडूक;
मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !


जिकडे जावें तिकडे माझी भावंडे आहेत,
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;
कोठेंही जा–पायांखालीं तृणावृता भू दिसते,
कोठेंही जा–डोईवरतें दिसतें नीलांबर तें;
सांवलींत गोजिरीं मुलें,
उन्हांत दिसती गोड फुलें,
बघतां मन हर्षून डुलें;
ती माझीं, मी त्यांचा, एकच ओघ अम्हांतुनी वाहे !
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें !


पूजितसें मीं कवणाला – तर मी पूजीं अपुल्याला,
आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला:
‘मी’ हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक
आणुनी तो, निजशिरी ओढिती अनर्थ भलते देख !
लहान-मोठें मज न कळे,
साधु-अधम हें द्वयहि गळे,
दूर-जवळ हा भाव पळे;
सर्वच मोठें-सांधु जवळ, त्या सकलीं मी भरुंनी राहें !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें!


हलवा करितां तिळावरी जसे कण चढती पाकाचे,
अहंस्फूर्तिच्या केंद्राभवतें वेष्टन तेंवि जडाचें;
आंत समचि निर्गुण तिलक, वरी सद्दश सगुण तो पाक,
परी अन्यां बोंचाया धरीती कांटे कीं प्रत्येक !
अशी स्थिती ही असे जनीं!
कलह कसा जाइल मिटुनी?
चिंता वाटे हीच मनीं.
शांतीचे साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे,
प्रेषित त्याचा, नव्या दमाचा शूर शिपाई आहें !—   केशवसुत


टीप : पाठ्यपुस्तकात शेवटची दोन कडवी समाविष्ट नाहीत.

(Compiled by Ms. Bhakti Parab, Mumbai)

February 10, 2012

मुक्त पक्षी

वेड आधी सांग कोणी लाविले ?
आणि डोळा गुज कोणी दाविले?

नेणता पक्षी मला पाहूनि तू
भोवती जाळे खुबीने टाकिले.

शीळ ती अद्यापि या कानी घुमे
ज्या शिळेने प्राण माझे ओढीले.

पार गेली मोकळीकीची स्मृती
पाठ दास्याचे तूवां जेव्हा दिले.

मी ममत्वे रंगलो गेही तुझ्या
मी न जाई पाश होताही ढिले.

आणि आता पारख्या सृष्टीत या
का मला वाऱ्यावरी तू सोडिले ?

काय राने पाचूची आता मला ?
काय हे आकाश मौजेचे निळे ?- माधव जूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)

(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

February 9, 2012

श्रीरंग

दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग
उधळित पिंजर तरल धुक्याची... झाडांवरती रंग
सूर्यबिंब झाकले ढगांनी झरझरतो पाऊस
किरणांच्या छायेत अनामिक कलाबतूंचे भास
उगवाईचा कळस दडाला ढग आले रांगांनी
सह्याद्रीला कुणी फाशिले भस्म नवे शैवांनी

हिरव्या शेतांवरी सावळा रंग रुळे आकाशी
तृप्तीच्या पंखात पोपटी तृणपात्यांच्या राशी
सारणीच्या पाण्यात रंगली जळस्वप्नांचीं गाणी
ही सृष्टीची हिरवी गौळण भरली कटिखांद्यांनी
दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग
उधळित पिंजर तरल धुक्याची... झाडांवरती रंग...— डॉ. वसंत लाडोबा सावंत


टीप : उगवाई देवीचे मंदिर कोकणात फोंडाघाटात आहे.

February 4, 2012

ऐकव तव मधु बोल

ऐकव तव मधु बोल, कोकिळे,
ऐकव तव मधु बोल ॥धु.॥

नकोत मजला मैना, राघू,
साळुंकी, चंडोल
नकोत मजला विविध सुरांचे
कृत्रिम हे हिंदोल ॥१॥

एक तुझा स्वर आर्त खरोखर
वाटे मज बिनमोल,
वसंत नाहीं अजूनि संपला,
कां झालीस अबोल? ॥२॥

सुखें वसंतासंगें जा मग
पहावया भूगोल,
गा शेवटचा बोल लपूनहि
पर्णांमाजीं खोल. ॥३॥

पाहिन नंतर वाट वर्षभर
दाबुनि चित्त विलोल
नको करुं पण आस एवढी
जातां जातां फोल ! ॥४॥


- माधव जूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)