A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

25 January 2012

डाव्या हाताचा अर्ज

[साक्या]
सोदर एक्या वेळीं आम्ही बंधु जन्मलों ना हो ?
संगें राहों, रूपगुणांनी एकसारखे आहों II १ II

ऐसे असतां, बुधहो! आम्हा वागवितांना भेद
दावितसां तो पाहुनि मजला वाटतसे बहु खेद II २ II

म्हणतां दक्षिण त्यास, परोपरि शिक्षण देतां त्यातें
उपेक्षूनि परि मूढ ठेवितां, तुच्छ मानितां मातें II ३ II

काय म्हणावें ह्या न्यायाला ? दोघे समान असतां
त्यास मानुनी श्रेष्ठ सर्वदा हीन तुम्ही मज गणतां ! II ४ II

विसरुनि परि तें, करितों त्यातें साह्य सर्व कार्यात;
कीं, न चुकावें निजकर्तव्या हेंचि श्रेष्ठ जगतांत ! II ५ II

पत्र लिहाया बंधु सरे, तइं कोण कागदा धरितो ?
चित्र काढितां रंगपात्र तरि कोण त्यापुढे करितो ? II ६ II

बंधू तुमचें चित्त रंजवी तारा छेडुनि जेव्हां,
सतार धरुनी, पडदे दाबुनि, साथ करितसें तेव्हां II ७ II

शूर बंधु जइं रणांगणामधिं उपसुनि शस्त्रा काढी
कोण शत्रूला केश धरुनी पुढे त्याचिया ओढी ? II ८ II

कार्य कराया एकाकी तो शक्त न जेव्हां दिसतें
दुजाभाव नच ठेवितसें मी साह्य देतसें त्यातें II ९ II

कला शिको, कीं काम करो तो, मजवांचुनि चालेना;
बघतां हें तरि महत्व माझे मुळीं तुम्हां वाटेना ! II १० II

लेखा मज बंधुसम, बुधहो ! वळणा द्या मजलागीं,
शिकवा समदृष्टीनें दोघां सकल कला उपयोगी II ११ II

नम्रपणाने अर्ज करितसें विचार त्याचा व्हावा
काय बघा आश्चर्य ! तोहि मी बंधुकडुनि लिहवावा ! II १२ II



- अज्ञात

19 January 2012

ऊठ गोपाळजी

ऊठ गोपाळजी, जाइं धेनूकडे,
पाहती सौंगडे, वाट तूझी ll धृ. ll

लोपली हे निशी, मंद झाला शशी,
मुनिजन मानसीं, ध्याति तुजला ll १ ll

भानु उदयाचळी, तेज पुंजाळलें,
विकसती कमळे, जळामाजीं ll २ ll

धेनुवत्सें तुला, बाहती माधवा,
ऊठ गा यादवा! उशीर झाला ll ३ ll

उठ पुरुषोत्तमा! वाट पाहे रमा,
दाविं मुखचंद्रमा, सकळिकांसी ll ४ ll

कनकपात्रांतरीं, दीपरत्ने बरीं,
ओवाळिती सुंदरी, तूजलागीं ll ५ ll

जन्मजन्मांतरीं, दास होऊ हरी,
बोलती वैखरी, भक्त तूझे ll ६ ll

कृष्णकेशव करीं, चरणांबुज धरी,
ऊठ गा श्रीहरी मायबापा ! ll ७ ll


- कृष्णकेशव

वासुदेव आला

दान पावलं बाबा दान पावलं
वासुदेव आला हो वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला ll धृ ll

नाही कुणी जागं झोपलं पहारा
दु:खी जीव तुला देवाचा सहारा
तुझ्यासाठी देव वासुदेव झाला ll १ ll

जागा हो माणसा संधी ही अमोल
तुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोलं
घालतील वैरी अचानक घाला ll २ ll

इच्चेच्या झाडाला बांधलाय घोडा
घालूनिया घावं सारे बंध तोडा
नको रे उशीर, वेळ फार झाला ll ३ ll


— मधुसूदन कालेलकर

सिंहान्योक्ति

सिंहान्योक्ति : १
[स्त्रग्धरा]
भुंगे गुंजारवातें करिति शिरिं असे मत्त हत्तीहि जीतें,

डोळां देखोनि होते पळत भयभरें सोडोनीयां धृतीतें,

जेथें मुक्ताफळांचा खच बहु पडला, या गुहेमाजिं आतां

सिंहाच्या, क्षुद्र कोल्हे कलकल करिती मृत्युनें त्यास नेतां.



सिंहान्योक्ति : २
[शार्दूलविक्रीडित]
खाण्यावांचुनि रोडला जरि, जरायोगें बहू वाळला,

रोगानें अतिपीडिला, जरि मरायातेंहि कीं टेकला,

उन्मत्तद्विपगंडभेदन करायाचीच इच्छा करी,

मानी; क्षुद्र जनावरांपरि तृणा स्पर्शेच ना केसरी.



— कृष्णशास्त्री चिपळूणकर

17 January 2012

दिवाळी शके

(वृत्त - शार्दुलविक्रीडित)

विश्वेशे करुनी कृपा सकरुणें दुष्काळदैत्यावरी
पर्जन्यास्त्र नियोजुनी पळविलीं आहेत दु:खे दुरी;
आतां मंगल पातले दिवसही दिपोत्सवाचे भले,
गाणें सुस्वर पाहिजे तर तुवां हे शारदे ! गाइलें. ll1ll

दीनें ज्याविण वाटतात सुदिनें सार्‍याहि वर्षांतलीं
नांवानें जरि दुर्दिनें, सुखद जीं होती पुढें चांगली;
तीं येऊन बरींच, वृष्टि करुनी त्यांही दिली भूवरी,
तेणें सांप्रत पाहतां दिसतसे सृष्टी अहा साजिरी ! ll2ll

सस्यांचा बरवा अनर्घ्य हिरवा शालू असे नेसली,
जाईची जुइची गळां धरितसे जी रम्य पुष्पावली,
ती भाळीं तिलकांकिता शशिमुखी आतां शरत्सुंदरी,
माथां लेउनि केवडा विचरते घेऊनि पद्में करीं ll३ll

जो गोपाल गमे प्रभातसमयीं गाई वनी चारितां,
वाटे रव्युदयी नदीवर मुनी अर्घ्यांस जो अर्पितां,
जो भासे दिवसां कृषीवल शिरीं खोंवूनियां लोंबरे,
तो आतां ऋतु शारदीय बहुधा शेतांतुनी संचरे ll४ll

राज जो धनधान्यदायक असे साचा कुबेरापरी,
त्या श्रीमंडित शारदीय ऋतुची राणी दिवाळी खरी;
रुपैश्वर्यगुणाढ्य ती जवळ ये; द्याया तिला स्वागता
सारेही शुभ योजनांत गढले-कांही नुरो न्यूनता! ll५ll

भिंती रंगविल्या नव्या फिरुनियां, केलीं नवीं आंगणें,
वीथी झाडुनि, रान काढुनि, दिसे सर्वत्र केराविणें;
दारी उंच दिले दिवे चढवुनि, हंड्या घरीं लाविल्या,
लोकीं शक्त्यनुरुप आत्मसदनीं भूषा नव्या जोडिल्या. ll६ll

बाजारांत जमाव फार मिळुनी गर्दी उडाली असे,
गंध्याला निजसंग्रहास विकितां विश्राम कांही नसे;
उंची कापड, दागिने सुबक ही, मेवे, फटाके चिनी,
यांचा विक्रय होतसे धडकुनी-वस्तू न चाले जुनी ! ll७ll

माहेराप्रत कन्यका स्मितमुखी उत्कष्ठिता पातल्या,
त्या मातापितरां सहर्ष दुहिता, भावां स्वसा भेटल्या;
आले सांप्रत भेटण्यास वडिलां दूरस्थ ते पुत्रही,
सोहाळे श्वशुरालयीं अनुभवूं आले नवे जांवई ! ll८ll

बाळांहीं निजपुस्तकांस अवघ्या आहे दिलेली रजा;
काहीं काढुनि खेळ नाचुनि मुलें तीं मारिताती मजा;
तों गेहामधुनी खमंग निघुनी ये वास, तेणें उगीं
तीं होऊन, हळूच आंत शिरती; “दे माउली वानगी !” ll९ll

आतां भौमचतुर्दशी पुढलिया वारीं असे पातली,
तों रात्री निजतां बनी छबुकली मातेप्रती बोलली-
“माला आइ उथीव लौकल बलें, अंगास मी लाविन
दादाच्या, म्हणुनी गले ! उथव तूं हांका मला मालुन" ll१०ll

सारेही पहिल्या दिनीं उठुनियां मोठ्या पहांटे जन
स्नानें मंगल लौकरी उरकिती सौगन्धिकें चर्चुन;
ज्या ठायीं असती दिवाळसण ते, तेथून वाद्यें पहा
निद्रेंतून दिवाळिला उठविण्या तीं वाजताती अहा ll११ll

त्यांच्या मंजुरवें न जागृत झणीं होईल तीं वाटलें.
यालागीं शिवगावुनी जणुं गमे देती फटाके मुलें;
‘ठो, ठो’ आणिक 'फाड फाड’ उठती तों नाद अभ्यंतरी,
त्यांही सत्वर जाहली हंसत ती जागी दिवाळी पुरी ll१२ll

रांगोळ्या रमणीय काढुनि पहा, त्या मांडल्या पंगती !
पक्कान्नें कदलीदलांवरि अहा ! नेत्रांस संतोषिती !
पाटांच्या मधुनी जलार्थ असती पात्रें रुप्याचीं, तिथें
नेसुनी जन मोलवान वसनें होतात कीं बैसते. ll१३ll

घेऊनी घृत, दुग्ध तें, विपुल तें गोधूमही, साकर
प्रेमानें महिलाजनीं बनविली खाद्ये किती सुंदर;
त्यांची सांप्रत रेलचेल अगदीं पात्रांत जी होतसे,
तुष्टी आणि पुष्टी ती वितरुनी प्रीती दुणावीतसे ll१४ll

रांगोळ्या दिसती प्रदोषसमयीं दारापुढें काढिल्या,
दीपांच्या सदनापुढें उजळुनी पंक्ती तशा लाविल्या;
त्यांच्या ज्योति असंख्य त्या बघुनियां वाटे असें अंतरी:-
तारा या गगनांतुनी उतरल्या कीं काय भूमीवरी ! ll१५ll

बाळें सर्व फटाकड्या उडविती चित्तांत आनंदुनी,
जाडे बारहि लाविती, धडधडां त्यांचा उठे तो ध्वनी,
मोठे बाणहि, चन्द्रज्योती मधुनी, त्या फूलबाज्या, नळे,
दारुकाम असें अनेकविध तें दृष्टि पडे, लाविलें ll१६ll

लक्ष्मीपूजन तें द्वितीय दिवशीं रात्रौ जधीं होतसे
सोनें आणि वह्या धनीजन तधीं मांडून अर्चीतसे,
साध्याला विसरुन लोक धरिती भक्ती कसे साधनीं –
ये हा आशय अर्थहीन कविच्या चित्तांत तें पाहुनी ll१७ll

आतां भार नसे कुणास, पण तो शिंक्यास भारी असे,
हातां काम नसे, परंतु पडतें तोंडास तें फारसें;
कोणा मार नसे, तरी पण शिरीं सो सोंगट्यांच्या बसे;
कोणा त्रास नसे, परंतु नयनां तो जागरें होतसे ll१८ll

भ्राते ते भगिनीगृहांप्रत सुखें जाती विजेचे दिनीं,
त्यांचा बेत सुरेख ठेवुनि त्या ओंवाळिती भामिनी,
तेही त्यांस उदार होउनि मनीं ओंवाळणी घालिती,
प्रेमग्रंथिस दाढर्य बंधुभगिनी या वासरीं आणिती ll१९ll

खाणें आणि पिणें, विनोद करणें, गाणेंहि वा खेळणें,
जैसें ज्यांस रुचेल, त्यापरि तुम्हीं या उत्सवीं वागणें;
मी संध्यासमयीं खुशाल गिरणातीरावरी बैसुनी
कालपेक्ष करीन उन्मन असा वेड्यापरी गाउनी ll२०ll


- केशवसुत (शके १८२२)

सौजन्य : केशवसुत डॉट कॉम

16 January 2012

अ आ ई !


मोत्या शीक रे अ आ ई !
सांगु कितीतरि बाई !

दादा आई म्हणताती
अ आ इ ई कठीण किती;
तुजला कधीं न येइल ती.
म्हणु दे कोणी कांही
मोत्या, शीक रे अ आ ई ! ll १ ll

यू यू ये ये जवळ कसा,
गुपचुप येथें बैस असा.
ऐक ध्यान दे शीक तसा;
धडा पहिला घेई
मोत्या, शीक रे अ आ ई ! ll २ ll

म्हणतां तुजला येत नसे,
शिकविन तुज येईल तसें;
अ आ इ ई भुंक कसें,
कां रे भुंकत नाहीं ?
मोत्या, शीक रे अ आ ई ! ll ३ ll


कवी  दत्त

या लाडक्या मुलांनो

या लाडक्या मुलांनो तुम्ही मला अधार
नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार ll १ ll

आईस देव माना, वंदा गुरूजनांना
जगि भावनेहुनी ते कर्तव्य थोर जाणा
गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार ll २ ll

शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे
टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावे
जे चांगले जगी या त्यांचा करा स्विकार ll ३ ll

शाळेत रोज जाता, ते ज्ञानबिंदू मिळवा
हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा
कुलशील छान राखा ठेवू नका विकार ll ४ ll


 – मधुकर निळकंठ जोशी

डोंगरी शेत

डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरीस राबून मी मरावं किती?

कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती,
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
चित्रकार : अशोक जाधव, चिंचोली सांगली
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती,
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?

आलं आलं वरीस जमिन नांगरुन,
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला,
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून गं आम्ही मरावं किती?

म्हागाइनं बाई घातला हैदोस
गळा आवळी बाई सावकारी फास
कुनाचे देऊ आन कुनाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्स जातील किती?

या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरांत पडंना
टीचभर पोटाला, हातभर देहाला जपावं किती?

अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला
तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास,
एकीचं निशाण हाती.


— नारायण सुर्वे