A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

30 November 2011

जिकडे तिकडे पाणीच पाणी

जिकडे तिकडे पाणीच पाणी,
खळखळणारे झरे
झुळझुळणारे गवत पोपटी, 
लवलवणारे तुरे ll

नवी लकाकी झाडांवरती
सुखात पाने-फुले नाहती
पाऊसवारा झेलित जाती
भिरभिरती पाखरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी, 
खळखळणारे झरे ll

हासत भिजती निळसर डोंगर
ड्या त्यांतुनी घेती निर्झर
कडेकपारी रानोरानी
नाद नाचरा भरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी, 
खळखळणारे झरे ll

मधेच घेता वारा उसळी,
जरी ढगांची तुटे साखळी 
हिरव्या रानी ऊन बागडे
हरिणापरी गोजिरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी, 
खळखळणारे झरे ll


शंकर वैद्य

फुलपांखरू

(जाति - अंजनी)

जेथें हिरवळ फार विलसते,
लताद्रुमांची शोभा दिसते,
तेथें फुलपांखरू पहा हें
सुंदर बागडतें !

कलिकांवरुनी, पुष्पांवरुनी,
गंधयुक्त अवकाशामधुनी,
पुष्पपरागा सेवित हिंडे –
मोदभरें करुनी !

तरल कल्पना जशी कवीची,
सुंदर विषयांवरुनी साची
भ्रमण करी, गति तशीच वाटे
फुलपांखराची !

वा मुग्धेची जैशी वृत्ति
पतिसहवास स्वप्नावरती
विचरे, फुलपांखराची तशी –
हालचालही ती !

निर्वेधपणें इकडे तिकडे
वनश्रींतुनी अहा ! बागडे;
त्याचा हेवा हृदयीं उपजुनी 
मन होई वेडें !

तिमिरीं आम्हीं नित्य रखडणें,
विवंचनांतचि जिणें कंठणें,
पुष्पपंतंगस्थिति ही कोठुनि
आम्हांला मिळणें !

असे यास का चिंता कांही ?
यास ‘उद्या’चा विचार नाहीं,
अकालींच जो आम्हां न्याया
मृत्युमुखीं पाही !

बहु सौख्याची कुसुमित सृष्टि,
तींत वसे हें, न कधीं कष्टी,
ग्रीष्मांचें खर रुप विलोकी –
नच याची दृष्टि !

‘सर्व विनाशी असती प्राणी,’
ही मज खोटी वाटे वाणी;
फुलपांखरुं मरण पाहिलें
आहे का कोणीं ?

[वसंततिलका]

जें रम्य तें बघुनियां मज वेड लागे;
गाणें मनांत मग होय सवेंचि जागें;
गातों म्हणून कवनीं फुलपांखरातें,
व्हायास सौख्य मम खिन्न अशा मनातें.



केशवसुत

विमान

किति मौज दिसे ही पहा तरी
हे विमान फिरतें अधांतरीं l ध्रु l

खोल नदींतुन कापित पाणी
मत्स्य धांवतों चहुंबाजूंनी,
घारच अथवा फिरते गगनीं,
हुबेहुब हें त्याच परी ll १ ll

रविकररंजित मेघांमधुनी,
स्वच्छ चांदण्यामधें पोहुनी,
घुमघुम नादें दिशा घुमवुनी,
प्रवास करि हें जगावरी ll २ ll

परंतु केव्हा पाउस गारा
प्रांत वेढुनी टाकिती सारा,
त्यांतूनही हें जाइ भरारा,
नवल नव्हे का खरोखरी? ll ३ ll

पहा जाउनी विमानांतूनी,
दिसेल शोभा अपूर्व वरुनी,
डोंगर, रानें, ओहळ, तटिनी
आणि कुठे सागरलहरी; ll ४ ll

ग्रहनक्षत्रें आकाशांतिल
विमान बघुनी मनांत म्हणतिल,
"भेटाया अपणां पृथ्वींतिल
येति माणसें कुणीतरी." ll ५ ll

नको सूर्यचंद्रावर जाया;
नको जगाची सफर कराया,
नेइं विमाना, मज त्या ठायां
जेथ माय मम वास करी ll ६ ll



— गोपीनाथ

29 November 2011

उषा

होतो पुस्तक घेउनि सहज मी दारात त्यांच्या उभा,
बाला तोंच समोरूनि कुणीतरी आली त्वरेने पुढे
वार्‍याने उडुनी पुनःपुनरपी चंद्रास जे झाकिती
मागे सारित-सांवरीत पदरा-ते मोकळे कुंतल,
किंचित हासूनि बोलली मजसि ती अस्पष्ट काही तरी,
किंवा स्पष्ट असेल ते, समजले माते न तेव्हा पण;
होतो स्तब्ध तसाच मी, मजकडे डोळे तिचे लागले;
त्यांचे तेज खुले मुखावरी; रवी जाताच खाली जरा
त्याची मावळती प्रभा पसरूनि रंगे जशी वारूणी,
गोर्‍या, नाजुक या तनूवर तशी शोभे छटा तांबुस;
नाही पार्थीव भाव ज्यास शिवले, स्वर्गीय जे शैशव
त्याची ही रमणीय मूर्तिच उभी माझ्याकडे राहिली.
मी त्यानंतर पाहिले नच तिला, वर्षे किती लोटली?
चित्ताच्या क्षितीजावरून परि ती नाही उषा लोपली.


- ग. त्र्यं. माडखोलकर

अजाण आम्ही तुझी लेकरे

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो, गातो
तुझ्या गुणांच्या कथा

चंद्र-सूर्य हे तुझेच देवा
तुझी गुरे वासरे
तुझीच शेते, सागर, डोंगर,
फळे, फुले, पाखरे

अनेक नावे तुला,
तुझे रे दाही दिशांना घरं
करिसी देवा सारखीच तू
माया सगळ्यांवर

खूप शिकावे, काम करावे,
प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा
हीच एक मागणी


— संजीवनी मराठे

24 November 2011

पाणपोई

येइं भाई, येथ पाही घातली ही पाणपोई
धर्म-जाती कोणती ती भेद ऐसा येथ नाही
संसॄतीचा हा उन्हाळा, तल्खली होई जिवाची
स्वेदबिंदू अश्रुधारा याविना पाणीच नाही II १ II

वायुवीची भोंवतीं आंदोलुनी त्या वंचिताती
झोंबती अंगी झळा अन् मूर्छना ये ठायिंठायीं
सांउली नाही कुठेंही, तापतो मार्तंड डोईं
श्रांत पांथा ! बांधली ही तूझियासाठीं सराई II २ II

आद्य जे कोणी कवी तत्स्फूर्तिच्या ज्या सिंधु गंगा
आणिल्या वाहून खांदी कावडी त्यांतील कांही
पांथसेवासाधनीं हे व्हावयातें गार पाणी
मृत्तिकेचे मात्र माझे कुंभ, ही माझी नवाई II ३ II

ओंजळी, दों ओंजळी, आकंठ घेईं वा पिऊनी
हो जरा ताजातवाना, येऊ दे सामर्थ्य पायीं
पावतां तृप्ती मना, संचारतां अंगीं उमेदी
जो दुवा देशील पांथा तेवढी माझी कमाई. II ४ II


— यशवंत

22 November 2011

आजारीपण (पडुं आजारी)

पडुं आजारी,
मौज हीच वाटे भारी II ध्रु. II

नकोच जाणे मग शाळेला,
काम कुणी सांगेल न मजला,
मऊ मऊ गादी निजावयाला,
चैनच सारी..... मौज हीच वाटे भारी II १ II

मिळेल सांजा, साबुदाणा,
खडिसाखर, मनुका बेदाणा,
संत्री, साखरलिंबू आणा;
जा बाजारी..... मौज हीच वाटे भारी II २ II

भवती भावंडांचा मेळा,
दंगा थोडा जरि कुणि केला,
मी कावुनि सांगेन तयाला,
'जा बाहेरी'..... मौज हीच वाटे भारी II ३ II

कामे करतील सारे माझी,
झटतिल ठेवाया मज राजी,
बसेल गोष्टी सांगत आजी,
मज शेजारी..... मौज हीच वाटे भारी ! II ४ II

असलें आजारीपण गोड
असूनि कण्हती कां जन मूढ ?
हें मजला उकलेना गूढ –
म्हणून विचारी..... मौज हीच वाटे भारी II ५ II



- भानुदास

21 November 2011

देवाजीनें करुणा केली

'देवाजीनें करुणा केली,
भातें पिकुनी पिवळी झालीं'

देवाजीनें करुणा केली,
सकाळ नित्याची ही आली
जणुं पायानें चित्त्याच्या अन
रस्ता झाडी झाडूवाली

घराघरांतिल चूल पेटली;
चहा उकळुनी काळा झाला;
जरा चढवितां दुसरें भांडे,
भातहि शिजुनी होईल पिवळा

देवाजीनें करुणा केली:
रोजचीच पण 'बस' हि आली
जणुं पायानें हरिणीच्या अन
शिरस्तांतलीं कामें झाली

घरी परततां, भाजीवाली
समोर दिसली, भरली थैली;
दो दिडक्यांचीं कडू दोडकीं
जरी पिकूनी झालीं पिवळी

उजाडतां जें उजाड झालें,
झोपीं गेलें, मावळतां तें:
करील जर का करुणा देव
बिचकुनि होतिल हिरवीं भातें !


— बा. सी. मर्ढेकर

निजलेल्या मुलास

उठ मुला, उठ मुला,
बघ हा अरुणोदय झाला !

नवरंगी किरणांनी,
भूषविली बघ ही अवनी

मोदभरें, रान भरें,
मंद सुगंधातें विखरे

किलबिलती, बागडती,
झाडांवरती पक्षि किती !

रव करिती भृंगतती,
पुष्पांचा मकरंद पिती

फुलांवरी, फळांवरी,
पतंग मोदें मजा करी !

झटकन् बसे, पटकन् उठे,
उंच भराऱ्याा घेत सुटे !

शितल हा, वात पहा,
आळस हरण्या, येत अहा !

आनंदे, नभ कोंदे,
हरूनी आळसा तरतरि दे

पूर्वेला, रवि आला,
मुला, उठाया कथित तुला !



बालकवी

19 November 2011

तयास मानव म्हणावे का ?

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का ?

दे रे हरी पलंगी काही
पशूही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का ?

पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का ?

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का ?

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का ?

ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का ?

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव का म्हणावे ?

पशु-पक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वानाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का ?


-- सावित्रीबाई फुले

18 November 2011

पसायदान


आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परे जडो । मैत्र जीवांचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुषी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥


रचना - संत ज्ञानेश्वर

16 November 2011

पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा


 माणिक सी. गोडघाटे उर्फ कवी ग्रेस

वाट

मला आवडते वाट वळणाची
दाट झाडीची नागमोडीची
ही अलिकडची, नदीच्या थडीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
सरघसरणिची पायफसणीची
लवणावरची पानबसणीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
अशी भुलवणिची हुलकावणीची
सागवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
जरा अडचणिची चढउतरणीची
घाटमाथ्याची ती पलिकडची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
इथची तिथची कधी कुणिकडची
क्षितिजाकडची पुढची पुढची
मला आवडते वाट वळणाची

— अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)

15 November 2011

गवताचं पातं

गवताचं पातं वार्‍यावर डोलतं,
डोलतांना म्हणतं खेळायला चला

ऱ्यातलं पाणी खळा-खळा हसतं,
हसताना म्हणतं खेळायला चला

निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला

झिम्मड पावसात गारांची बरसात,
बरसात म्हणते वेचायला चला

छोटासा मोती लपाछपी खेळतो,
धावतांना म्हणतो शिवायला चला

मनीचं पिल्लू पायाशी लोळतं,
लोळतांना म्हणतं जेवायला चला
अहो, जेवायला चला
तुम्ही जेवायला चला


— कुसुमाग्रज

10 November 2011

माझी बाहुली

लहान माझी बाहुली
मोठी तिची साऊली
घारे डोळे फिरवीते
लुकूलुकू हि पहाते

नकटे नाक उडविते
गुबरे गाल फुगविते
दांत काही घासत नाही
अंग काही धूत नाही

इवले घरकुल मांडते
मांडता मांडता सांडविते
पोळ्या केल्या, करपून गेल्या
भात केला कच्चा झाला
वरण केलं पातळ झालं
तूप सगळ सांडून गेलं

असे भुकेले नक्का जाऊ
थांबा करते गोड खाऊ
केळ्याच शिकरण करायला गेली
दोनच पडले दांत
आडाचें पाणी काढायला गेली
धपकन पडली आत !


(अज्ञात कवी)

झुक झुक गाडी

गाडी आली, गाडी आली~~झुक झुक झुक
शिट्टी कशी वाजे बघा~~~~~कुक कुक कुक

ईंजिनाचा धूर निघे~~~~~~~~~~भक भक भक
चाके पाहू तपासून~~~~~~~~~~~~~ठक ठक ठक

गाडीमध्ये बसा चला~~~~~~~~~~~~~~~पट पट पट
सामानही ठेवा सारे~~~~~~~~~~~~~~~~~चट चट चट

तिकिटाचे पैसे काढा~~~~~~~~~~~~~~~~~छन छन छन
गाडीची ही घंटा वाजे~~~~~~~~~~~~~~~~~~घण घण घण

जायाचे कां दूर कोठे~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~भूर भूर भूर
कोठेही जा, नेऊ तेथे~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~दूर दूर दूर

नका बघू डोकावून~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~शुक शुक शुक
गाडी आता निघालीच~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~झुक झुक झुक


— वि. म. कुलकर्णी

(Compiled by : Mr. Pradeep Mandke, Mumbai)

विद्यार्थ्याप्रत

(जाति – महती)

महत्व भारी आहे या पृथ्वीचें,
त्याहुनि अतिशय या सगळ्या विश्वाचें
परि तुजमध्यें महतीचें जें बीज
त्याहुनि कांहीं मोठी नाहीं चीज
ठसव मनीं हें साचें;
बाबा !
हें वच बहु मोलाचें.


अग्नि असे हा तेजस्वी रे फार,
त्याहुनि भारी सूर्य नभीचा थोर;
परि किरण जो तुजमध्यें सत्याचा
प्रकाश सर्वोत्तम तो आहे त्याचा;
घोक सदा हें वाचे,
बाबा !
हें वच बहु मोलाचें.


पृथ्वीमध्यें रत्नें बहु, आहेत;
आकाशी तर असंख्य दिसताहेत;
परि एक रत्न तुजमध्यें जें सच्छील
कोणाला नच सर त्याची येईल;
स्मरण असूं दे याचें,
बाबा !
हें वच बहु मोलाचें.


स्नायूंमध्यें पुष्कळ आहे शक्ति,
नृपवेत्रीं तर फारच आहे म्हणती;
परि एक एक जो नवा शब्द तूं शिकसी
शक्ति तयाची उलथिल सर्व जगासी ! 
पठन तर करीं त्याचें,
बाबा !
जग हें बदलायाचें.



केशवसुत (समग्र केशवसुत)

9 November 2011

आठवणीतील कविता बालभारतीच्या!




मुंबई पाठोपाठ आज लोकसत्ता ठाणे वृत्तान्तने "बालभारती आठवणीतील कविता" ई-पुस्तकाची दखल घेतली.

8 November 2011

बाळ जातो दूर देशा (मातृहृदय)

बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासुन

हात लागेना कामाला, वृत्ति होय वेडयावाणी
डोळ्यांचे ना खळे पाणी

आणा दूध जिन्सा नव्या, आणा ताजा भाजीपाला
माझ्या लाडक्या लेकाला

त्याच्या आवडीचे चार, करू पदार्थ सुंदर
कांही देऊ बरोबर

त्याचे बघा ठेविलें कां, नीट सामान बांधून
कांही राहील मागून

नको जाऊ आतां बाळा, कुणा बाहेर भेटाया
किती शिणविसी काया

वार्‍यासारखी धांवते, वेळ भराभरा कशी !
गाडी थांबेल दाराशी

पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
नाही मायेचे माणूस

उंच भरारी घेवुन, घार हिंडते आकाशी
तिचे चित्त पिलापाशी

बाळा, तुझ्याकडे माझा, जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील

बाळ जातो दूर देशा, देवा ! येऊन ऊमाळा–
लावी पदर डोळ्याला



— गोपीनाथ

झुळुक

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधि रमत गमत वा कधी भरारी थेट

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जातां जातां सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झर्‍यांची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानीं सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुलें बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा


— दामोदर अच्युत कारे

गाणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे.

तळ्याकाठी

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआंतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो कांही
गळून पडत असतां पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारुन मासळी, मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते,
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!



— अनिल (आ. रा. देशपांडे)

7 November 2011

गालबोट

माझ्या छकुलिचे डोळे,
दुध्या कवडीचे डाव
बाई ! कमळ कमळ,
गोड चिडीचं ग नांव !

जरी बोलते ही मैना,
माझी अजून बोबडे
मला लागती ते बाई,
खडीसाखरेचे खडे !

सर्व्या जगाचं कौतुक,
इच्या झांकल्या मुठीत
कुठें ठेवूं ही साळुंकी,
माझ्या डोळ्यांच्या पिंजर्‍यात !

कसे हांसले ग खुदकुन्,
माझ्या बाईचे हे ओंठ
नजर होईल कोणाची,
लावुं द्या ग गालबोट !



— वि. भि. कोलते (विष्णु भिकाजी कोलते)

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिले पाठी

हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान
निरखीशी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय ते? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.

साधता विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसता होसि कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंगवेडी गाथा

मी देह विकुनिया मागून घेते मोल
जगविते प्राण हे अर्पुनीया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान... तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या... निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाहि मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला

हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे


— ग.दि. माडगुळकर

मीच माझा एककल्ली

मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो
आडवाटेने पिसाटाच्यापरी बेहोश झालो

ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता
मात्र पायींच्या बळाला जागता आवेग होता

ना क्षिती होती कशाची, मी मला उधळीत गेलो
अन् धुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो

मज कळेना चालतांना दु:ख कैसे फूल झाले
अन् कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले

अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो
अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो.


— ना. धों. महानोर (रानातल्या कविता)

केवळ माझा सह्यकडा

भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो "एका" हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी; जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकाठीं भावभक्तिची पेठ खुले

रामायण तर तुमचेंमाझे भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
हृदयाच्या हृदयात; परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे ते शब्द अजुनि हृदयामाजीं
बच जायें तो और लढें
पाउल राहिल सदा पुढे
तुम्हांस तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी; राहील गाठीं; मरहट्याचा हट्ट खरा

तुमचें माझें ख्याल तराणे, दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते; परि मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफाची कडकडतां परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासाशी दृढ नातें

कळे मला काळाचे पाउल दृत वेगानें पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणीं अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरुन अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारें माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करुनि झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत


— वसंत बापट (सेतू, १९५७)

(Compiled by - Mr. Unmesh, Mumbai and Corrected by - Mr. Shriniwas Kelkar, Pune)

3 November 2011

बालभारती आठवणीतील कविता - वृत्तपत्रांनी घेतलेली दखल




गुरुवार, ३ नोव्हेंबर २०११ रोजी प्रसिद्ध  झालेली  लोकसत्ता, मुंबई वृत्तान्त मधील बातमी.


सोमवार, १७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध  झालेली  महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी.